You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीडमध्ये ऑनर किलिंगची घटना; बहिणीचा भावावर आरोप
- Author, शशी केवडकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
"त्याला आमचा संसार हा बघवला नाही म्हणूनच त्याने त्याच्यावर वार करताना 'कशी जिरवली' असं म्हणून वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुमित मला सॉरी म्हणून गेला" पतीच्या हत्येनं शोकात बुडालेल्या भाग्यश्री अश्रू आवरत सांगत होत्या.
बहिणीने प्रेमविवाह केल्याचं शल्य मनात ठेऊन भावानेच पतीची हत्या केल्याचा आरोप भाग्यश्री लांडगे यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील ऑनर किलिंगच्या घटनेनं सारेच हादरले आहेत.
बीडच्या आदित्य इंजिनियरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात भाग्यश्री लांडगे आणि सुमित वाघमारे हे दोघे शिक्षण घेत होते. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची ओळख झाली. मग ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनीही आपल्या घरी याविषयी सांगितलं.
दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे सुमित आणि भाग्यश्रीने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन लग्न केलं.
नेमकं काय झालं?
25 वर्षाचा सुमित मूळचा माजलगाव तालुक्यातील तालखेडचा होता. अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी तो बीडमध्ये राहात होता.
या घटनेविषयी माहिती देताना भाग्यश्री यांनी सांगितलं की, "आम्ही लग्न केल्याची बाब घरच्यांना पटली नाही. भाऊ बालाजी लांडगे तर आमच्या लग्नामुळे खूपच चिडला होता. तो अधिक दुखावला गेला आणि या रागाच्या भरात त्याने अभियांत्रिकीची परीक्षा देऊन येत असताना आम्हा दोघांना महाविद्यालयाच्या गेट पासून काही अंतरावरच गाठलं. त्याचा मित्र संकल्प वाघ याच्या मदतीने त्यांनी सुमितवर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात सुमित गंभीर जखमी झाला. काही मित्रांच्या मदतीनं सुमितला दवाखान्यात नेलं. पण त्याचा मृत्यू झाला होता."
या घटनेनंतर बालाजी लांडगे आणि त्याचा मित्र फरार असून त्यांच्या शोधासाठी सात पथकं स्थापन करण्यात आल्याचं बीड पोलिसांनी सांगितलं आहे.
सुमितची हत्या करण्यापूर्वीही भाऊ बालाजीनं आम्हाला दहशतीतच ठेवलं होतं. कारण, "दोन महिन्यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये आमचं लग्न झालं होतं. या लग्नानंतर बालाजी याने सुमित यास अनेकदा धमक्या दिल्या होत्या. एवढंच नाही तर एक-दोन वेळेस मोटरसायकलने धक्काही दिला होता," असं भाग्यश्री यांनी सांगितलं.
"आमच्या जीविताला धोका असल्याने आम्ही बीडमधील शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी या तक्रारीची कुठलीही गंभीर दाखल घेतली नाही. पोलिसांनी वेळीच तक्रारीची दाखल घेतली असती तर आज सुमित वाचला असता." असं भाग्यश्री सांगतात.
भाग्यश्री यांच्या आरोपावर बीबीसीने बीडचे पोलीस उप-अधीक्षक सुधीर खिरवडकर यांना विचारलं असता, "हा गंभीर आरोप आहे, आम्ही याबाबत चौकशी करु" असं त्यांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी काय कारवाई केली?
"प्रेमविवाह करण्याची एवढी मोठी शिक्षा मिळत असेल तर ही शिक्षा मला देखील मिळालीच पाहिजे. माझ्या भावाने माझ्या पतीची हत्या केली आहे. भावापासून सुमितला धोका आहे, असं सांगूनही पोलिसांनी काहीच केलं नाही. माझा सुमित माझ्या पासून दूर गेला."
पेठ बीड पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी माहिती दिली की, "या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार मिळाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि त्याचा साथीदार संकल्प वाघ मात्र अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही सात पथकं तयार केली आहेत. ही घटना बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून घडली आहे असं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे."
या घटनेनं सुमित वाघमारे याच्या तालखेडा गावावर शोककळा पसरली आहे. गावातील एक हुशार आणि कर्तबगार मुलाचा प्रेम विवाह केल्यानं झालेला अंत पाहून संपूर्ण गाव आणि परिसर सुन्न झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)