You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑनर किलिंग : जातीमुळं नवरा गमावलेल्या कौशल्याची गोष्ट
मार्च 2016. 22 वर्षांच्या शंकरचा तामिळनाडूत भरदिवसा गळा चिरून खून करण्यात आला. कारण होतं त्याने सवर्ण जातीतील मुलीशी लग्न केलं होतं.
सप्टेंबर 2018. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात आणखी एक ऑनर किलिंगची घटना घडली आहे. इथल्या मिरयालागुडा शहरात एका हॉस्पिटलबाहेर 24वर्षांच्या पेरुमल्ला प्रणय या तरुणाचा त्याच्या गरोदर पत्नीसमोरच खून करण्यात आला.
घटना दोन. पण कारण एकच - आंतरजातीय विवाह.
तामिळनाडूतील घटनेत 22 वर्षांच्या शंकरने कौशल्याशी लग्न केलं होतं. कौशल्या सवर्ण जातींतील असल्याने तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. यातूनच शंकरचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला.
प्रणयच्या हत्येच्या बातमीने कौशल्याच्या मनात तिच्या नवऱ्याच्या खुनाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. बीबीसीशी बोलताना कौशल्याने तिच्या भावनांना वाट करून दिली.
"मी जेव्हा जेव्हा टीव्हीवर प्रणयच्या ऑनर किलिंगची बातमी बघते तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यासमोर शंकरच्या आठवणी ताज्या होतात. शंकरचाही असाच गळ चिरून खून करण्यात आला होता," ती सांगते. हे सांगत असताना तिची नजर शून्यात गेलेली असते.
तामिळनाडूतील उदुमलपत्तईमध्ये राहणाऱ्या कौशल्यानेही आपल्या नवऱ्याला अशाच एका घटनेत गमावलं. शंकरसुद्धा दलित होता आणि त्याला कुणी परक्याने नाही तर कौशल्याच्या कुटुंबीयांनीच ठार केलं होतं.
त्या खटल्यात स्वतः कौशल्याने साक्ष दिल्याने तिच्या कुटुंबीयांना शिक्षा झाली.
या हत्येत सामिल सहा जणांविरोधात गेल्यावर्षी कोर्टाने शिक्षा सुनावली. त्यात एक कौशल्याचे वडीलही आहेत.
'मी अमृतासोबत आहे'
कौशल्या म्हणते हा आघात कधीही भरून निघणार नाही. "आपण कितीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी प्रणयच्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ आहे. मात्र मला खात्री आहे अमृता लवकरच या दुःखातून स्वतःला सावरेल."
"प्रणय आणि अमृताचं एकमेकांवर फार प्रेम होतं. हे प्रेमच अमृताल पुन्हा उभं राहाण्याची ताकद देईल."
ती म्हणते, "अमृता जातिव्यवस्थेविरोधात लढेल आणि प्रणयला न्याय मिळवून देईल. तिच्या या प्रयत्नात आम्ही तिच्या सोबत आहोत."
"मला अमृताला फक्त एवढंच सांगायचं आहे की तिने पेरियार आणि आंबेडकरांविषयी जास्तीत जास्त वाचन करावं. यातून तिला धैर्य आणि ताकद मिळेल."
एका मुलाखतीत अमृताने हा आरोपही केलाय की ती गरोदर असल्यामुळेच तिच्या आईवडिलांनी प्रणयला मारून टाकलं.
"तिच्या कुटुंबीयांच्या मनात खालच्या जातींबद्दल किती द्वेष आहे, हेच यातून दिसून येतं. बाळचा जन्म झाला तर जातीतील आपला आदर कमी होईल, या भावनेतून त्यांनी प्रणयला इतक्या निर्दयीपणे मारलं," असं कौशल्या सांगते.
इतर कुठल्याच अमृताची कौशल्या न होवो
कौशल्या म्हणते, "मी किंवा अमृता रस्त्यावर उतरलो, आंदोलन केलं तर ही समस्या संपेल का? आम्हाला आमच्यासाठी न्याय पाहिजे. याव्यतिरिक्त इतर कुठलाच पर्याय आम्हाला नको."
"ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वांत जास्त प्रेम करता, तिला गमावण्याचं दुःख काय असतं, ते आम्ही सोसत आहोत. यापुढे कुणीही कौशल्या किंवा अमृता होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे."
ऑनर किलिंगविरोधी सक्षम कायद्याची गरज
कौशल्या म्हणते, "आपल्या देशात ऑनर किलिंगविरोधात सक्षम कायदा नाही, म्हणून अशा घटना घडत आहेत. अशा घटना थांबवायच्या असतील तर भारतात कायदा असलाच पाहिजे."
त्या म्हणतात, "जे अमृताच्या बाबतीत घडलं तेच माझ्याबाबतीतही घडलं. ज्यांनी माझ्या शंकरला ठार केलं कोर्टाने त्यांना फाशी सुनावली आहे. अमृताच्या गुन्हेगारांनी वृत्तपत्रात हे वाचलंही असेल. तरीही प्रणयचा खून झाला."
कौशल्या म्हणते, "प्रणय आणि अमृताने सहजीवनाचं स्वप्न बघितलं होतं. अमृता गरोदर होती, पहिलं बाळ जन्माला येणार होतं. बाळाच्या जन्मापासून ते तो मोठा होईपर्यंतची किती स्वप्न दोघांनी रंगवली असतील?"
"अमृताने प्रणयला आपलं आयुष्य मानलं होतं. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून सर्वकाही सोडून ती आली होती. पण आता तो प्रणयचं तिच्या आयुष्यात नाही."
"एक ना एक दिवस अमृता या सर्वांतून बाहेर पडेल. जातिव्यवस्थेविरोधात लढण्यासाठी खूप धैर्य लागतं. तिचं प्रेमच तिला या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल," असं ती सांगते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)