You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑनर किलिंग : गरोदर पत्नीसमोरच पतीची निर्घृण हत्या
ती 5 महिन्यांची गरोदर होती. ती आणि तिचा नवरा, सासू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते. डॉक्टरना भेटून ते बाहेर पडले. हॉस्पिटलच्या गेट बाहेर येताच मागून आलेल्या एका व्यक्तीने नवऱ्याच्या मानेवर दोन वार केले. काही कळण्याच्या आतचं नवरा जागीच गतप्राण झाला.
तेलंगणाच्या नालगोंडाच्या जिल्ह्यात ऑनर किलिंगचं हे प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील मिरयालागुडा शहराच्या बाहेर 24 वर्षीय पेरुमल्ला प्रणय या युवकाची त्याच्या गरोदर पत्नीसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
डॉक्टरकडून पत्नीची तपासणी करून ते दोघं हॉस्पिटलमधून बाहेर पडले होते. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी प्रणयच्या मानेवर जोरदार प्रहार केले. त्यात प्रणयचा जागच्या जागीच मृत्यू झाला.
प्रणय आणि अमृता यांचं यावर्षी 31 जानेवारीला लग्न झालं होतं. त्यांचा प्रेमविवाह होता आणि त्यामुळेच दोघांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होते. दरम्यान प्रणयच्या घरच्यांनी अमृताला स्वीकारलं होतं. अमृताच्या घरचे मात्र नाराज होते.
हे सगळं प्रकरण ऑनर किलिंगचं असावं, असा पोलिसांना संशय आहे.
"हे प्रकरण ऑनर किलिंगचं आहे असं समजूनच या प्रकरणाचा तपास करत आहोत," अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंगनाथ यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना दिली.
अमृताच्या वडिलांवर संशय
प्रणय दलित समाजाचा तर अमृता आर्य वैश्य समुदायाची आहे. अमृताच्या वडिलांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. पोलिसांना अमृताच्या वडिलांवर हत्या केल्याचा संशय आहे. कारण दोघांनी कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं होतं.
त्या दोघांची मैत्री झाली तेव्हा प्रणय 10वीत आणि अमृता 9वीत शिकत होती. दोघांचं शिक्षण बी.टेक.पर्यंत झालं आहे. दोघांनी आपल्या कुटुंबीयांकडे लग्नाची परवानगी मागितली होती. अमृताचे वडील मारुती राव यांनी लग्नाला ठाम नकार दिला होता.
मुलीला परत बोलावण्याचे प्रयत्न
त्यानंतर दोघांनी हैद्राबादमध्ये जाऊन आर्य समाजाच्या विधींनुसार लग्न केलं. दोघं परत आले आणि प्रणयच्या घरात राहू लागले.
लग्नानंतर मारुती राव यांनी मुलीला परत बोलावण्याचा प्रयत्न केला मात्र तिने याला नकार दिला.
प्रणयच्या लग्नानंतर दोनच महिन्यात त्यांना प्रणयची हत्या करायची होती आणि त्यामुळे प्रणयसुद्धा काळजीत होता, असं सांगण्यात येतं.
त्यातच अमृता गरोदर राहिली.
शुक्रवारी प्रणय आणि त्याची आई अमृताला घेऊन मिरयालागुडाच्या खासगी इस्पितळात तपासणीसाठी घेऊन गेली आणि तिथेच ही घटना घडली.
सीसीटीव्हीत कैद झाली घटना
ते दुपारी 12 वाजता आत गेले. 1.30 वाजता तपासणी झाल्यावर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा एका व्यक्ती त्यांचा पाठलाग करू लागली. ते काही अंतरावर गेले होते तोवर या व्यक्तीने प्रणयच्या मानेवर धारदार शस्त्राने दोनदा वार केले आणि त्यात प्रणयचा जागीच मृत्यू झाला.
हल्लखोराने घटनास्थळी हत्यार टाकून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्याच्या मदतीने खुन्याची ओळख पटली आहे. मात्र अजून त्याला अटक झालेली नाही.
पोलिसांनी बीबीसीला सांगितलं, "लग्नानंतर काही दिवसांनी पोलीस महानिरीक्षकांना भेटून सुरक्षेची मागणी केली होती. कारण त्यांना अमृताच्या वडिलांकडून धोका वाटत होता. पोलीस अधीक्षकांनी मारुती राव यांना बोलावलं. तेव्हा त्यांनी काहीही वेडंवाकडं न करण्याची शाश्वती दिली होती."
ही हत्या भाडोत्री गुंडांकडून केली असावी असा पोलिसांना संशय असून हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी 2 पथकं बनवली आहेत.
शहरापासून दूर जाण्याचा सल्ला
प्रणयचे वडील म्हणाले, "मारुती राव कोट्यधीश माणूस आहे. ते पैशाच्या बळावर काहीही करू शकतात. म्हणून मी माझ्या मुलाला आणि सुनेला शहरापासून दूर जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र माझ्या सुनेने त्याला नकार दिला. माझ्या वडिलांचं मन वळवेन तसंच आम्ही दोघं काही ना काही काम करू असं ती म्हणायची."
"अमृताची तिच्या आईवडिलांशी अनेकदा बोलणं व्हायचं. त्यांनी अमृताला त्यांचे विचार बदलल्याचं सांगितलं आणि आता त्यांनी माझ्या मुलाची हत्या केली," असं ते सांगतात.
दलित संघटनांनी मिरयालगुडाला या हत्येच्या विरोधात शनिवारी बंद पुकारला होता.
सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया
राज्याच्या राजधानीपासून अवघ्या 150 किमी अंतरावर असलेल्या या गावात दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे लोक सुन्न झाले आहेत. हत्येची बातमी सोशल मीडियावरही व्हायरल झाली आणि लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आपली श्रद्धांजली वाहिली.
अमृताने या घटनेच्या एक दिवस आधी फेसबुकवर गणेश चतुर्थीच्या पूजेचा फोटोही अपलोड केला होता.
प्रणयच्या हत्येनंतर या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहेत. अनेक लोकांनी अमृताचा ताई असा उल्लेख करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
दुष्यंत कुमार लिहितात, "देव कुठे आहे? त्याने असं का केलं? हा प्रश्न तुम्ही देवाला विचारला तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. तुम्ही धीर सोडू नका."
एकाने "आपल्याकडे जातीमुळे अहंकार,पैसा आणि ताकद आहे म्हणून काहीही करू शकतो अशी विचारसरणी रुजली आहे. समाजातून ही विचारसरणी घालवण्यासाठी मारुती राव यांना मृत्युदंडाची शिक्षा व्हायला हवी."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)