प्रियकराच्या हत्येचं शूटिंग करणारी 'स्नॅपचॅट क्वीन'

फातिमा खान ही 21 वर्षांची महिला 'स्नॅपचॅट क्वीन' म्हणून ओळखली जाते. तिनं प्रियकराच्या हत्येचा कट रचला होता. त्या प्रकरणात तिला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

खालिद सफी या प्रियकराच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं फातिमानं म्हटलं होतं. शिवाय, मरणाच्या दारात असलेल्या खालिद सफी यांचा व्हीडिओ करण्याच्या कृतीची आपल्याला लाज वाटते असंही तिनं म्हटलं होतं.

तिचं म्हणणं ऐकून घेतल्यावर कोर्टानं तिला हत्या करणाऱ्या बरोबरच दोषी ठरवलं.

काय झालं होतं हत्येच्या दिवशी?

ही घटना आहे 1 डिसेंबर 2016ची. लंडनच्या नॉर्थ अॅक्टन परिसरात फातिमाचा प्रियकर खालिद सफी वर फातिमाचा एक चाहता असलेल्या रझा खान यानं चाकूनं हल्ला केला.

रझानं खालिदच्या छातीवर अनेक वार केले, एकदा तर चाकू त्यांच्या छातीच्या आरपारही गेला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला खालिद जेव्हा अखेरचे श्वास घेत होता, तेव्हा त्याची मदत करायचं सोडून फातिमानं खिशातून मोबाईल काढला आणि त्याचं व्हीडिओ शूटींग सुरू केलं. नंतर तो व्हीडिओ आणि एक मेसेज लिहून स्नॅपचॅट या सोशल मिडियाच्या साईटवर टाकला.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, ते खालिदला सावरण्यास गेले तेव्हा त्यातल्याच एकानं फातिमाला विचारलं की, तुझा इरादा काय आहे? मरणाच्या दारात असलेल्या या माणसाचा व्हीडिओ सोशल मिडियावर टाकणार आहेस का?

सोशल मिडियावर मृत्यूचा व्हीडिओ

काही तासातच फातिमानं खालिदचा तो व्हीडिओ स्नॅपचॅटवर पोस्ट केला. त्यावर लिहिलं होतं की, "माझ्याशी पंगा घेणाऱ्याची अशी अवस्था होते."

सोशल मिडियावर व्हीडिओ पोस्ट करण्याबरोबरच तिनं वापरलेली 'पंगा' घेण्याची भाषा कोर्टानं अपमानकारक ठरवली.

पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी धक्कादायक माहिती उजेडात आली.

एका CCTV फुटेजमध्ये दिसलं की, 18 वर्षांचा खालिद रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तेव्हा फातिमा एका फोनमध्ये शूटींग करत होती आणि त्याचवेळी दुसऱ्या फोनवर बोलत होती.

तपासात कळलं की ती रझा खानशी बोलत होती. खालिदवर हल्ला करून रझा फरार झाला होता.

असा मिळाला पुरावा

या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हीडिओ स्नॅपचॅटवरून 24 तासात हटवण्यात आले.

तेवढ्या काळात फातिमाच्याच मित्रांनं स्नॅपचॅटवरच्या त्या मेसेजची कॉपी केली होती. तेच नंतर कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आले.

फातिमाला तिच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सोशल मिडियावर पोस्ट करण्याचं व्यसनं लागलं होतं असं तिच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.

काही लोकांनी असंही सांगितलं की फातिमा स्नॅपचॅटवर लोकप्रिय होती आणि स्वत:ला 'स्नॅपचॅट क्वीन' म्हणत असे.

कोर्टानं या प्रकरणात सोशल मिडियातल्या जाणकारांशीही चर्चा केली.

फातिमाचा बचाव करणाऱ्या करीम फौद या वकिलांनं सांगितलं, "ज्याचं जगणं हेच सोशल मिडिया आहे, अशा तरुणांपैकीच फातिमा एक आहे. ते त्या माध्यमाप्रमाणे स्वत:त बदल घडवतात. ही स्थिती फार चांगली नाही."

रझा खान फरारच...

सुनावणीत हेही स्पष्ट झालं की रझा खान खालिदची हत्या करणार आहे आणि ते फातिमाला आधीपासूनच माहिती होतं. त्याला तिची संमतीही होती.

खालिदबरोबर त्याची काही काळ झटापटही झाली. त्यानंतर वार करून तो पळाला. तो अजूनही फरारच आहे. पोलीस त्याचा शोध घेऊ शकलेले नाहीत.

खालिद आणि फातिमा यांचं प्रेम प्रकरण अनेक वर्षं सुरू होतं. पण त्या नातेसंबंधात दुरावा येऊ लागला होता. खालिदच्या आधीही फातिमाचा एक प्रियकर होता. 19 वर्षांचा रझा खानही तिच्या प्रेमात होता आणि तिला स्नॅपचॅटवर फॉलोही करत होता.

तो तिचं सगळे मेसेज पाहायचा. खालिद आणि रझा यांच्यात फातिमावरून त्यापूर्वीही एकादा झटापट झाली होती.

सरकारी पक्षानं युक्तिवाद करताना सांगितलं की, "फातिमाच्या डोळ्यादेखत हत्या झाली. पण तरीही त्यांनी कोणाकडे मदत मागितली नाही आणि स्वत:ही मदत केली नाही. काही काळानं तिनं टॅक्सी थांबवली आणि तिथून निघून गेली."

"तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यांनी तो व्हीडिओ मदत मागण्यासाठीच तयार केला होता," असा दावा फातिमाच्या वकिलानं केला.

त्या रात्री घरी परतल्यावर फातिमानं जो शेवटचा व्हीडिओ बनवला त्यात ती हसतखेळत कुटुंबीयांशी बोलताना दिसत होती. तो व्हीडिओ पाहिल्यावर, काही तासांपूर्वी डोळ्यादेखत एक हत्या पाहून आल्याचा कोणताही भाव फातिमाच्या चेहऱ्यावर नव्हता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)