You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोमालिया : '9 नवरे असलेल्या' महिलेची दगडानं ठेचून हत्या
तुम्ही एक नवरा, अनेक बायका, या संकल्पनेबद्दल ऐकलं असेल. जगभरात अनेक ठिकाणी ते प्रचलित आहे. पण जर एखाद्या महिलेचे अनेक पती असतील तर? तुम्हाला थेट द्रौपदी आठवली असेल कदाचित.
सोमालियात अशाच एका महिलेला दगडानं ठेचून ठार करण्यात आलं. तिचा गुन्हा काय? तिच्यावर आधीच्या पतींना घटस्फोट न देता 11 वेळा लग्न करण्याचा आरोप होता.
सोमालियाच्या अल-शबाब या कट्टरवादी संघटनेनं अखेर शुक्री अब्दुल्लाही वार्सामे या महिलेवर खटला चालविला आणि त्यांना बहुसंख्य पती असल्याच्या आरोपांखाली दोषी ठरवलं.
"शुक्री यांना गळ्यापर्यंत मातीत पुरण्यात आलं आणि नंतर दगडफेक करून त्यांना ठार करण्यात आलं," असं सॅबलेल गावातल्या रहिवाशांनी सांगितलं.
अल-शबाब ही संघटना शरिया कायद्याचं कठोरपणे पालन करते. सोमालियातल्या मोठ्या भागावर या संघटनेचं नियंत्रण आहे. तसंच सोमालियातलं केंद्र सरकार उलथवून टाकण्यासाठी ही संघटना अनेकदा सोमालियाची राजधानी मोगादिशूवर हल्ला करते.
अल-शबाब संघटनेच्या सॅबलेल भागाचे नियंत्रक मोहम्मद अबु उसामा यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "शुक्री अब्दुल्लाही यांना त्यांचे कायदेशीर पती मिळून एकूण 9 पतींसह न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यातल्या प्रत्येकानं शुक्री त्यांची पत्नी असल्याचं सांगितलं."
मुस्लीम कायद्यानुसार एखाद्या महिलेला एकापेक्षा अधिक पती असणं बेकायदेशीर आहे. पण पुरुष मात्र 4 महिलांशी लग्न करू शकतात.
महिला आणि पुरुष दोघांनाही घटस्फोट घेता येतो. पुरुषाला घटस्फोट हवा असेल तर तो पत्नीपासून वेगळा होऊ शकतो. पण महिलेला घटस्फोट हवा असेल तर पतीची संमती घेणं आवश्यक असतं. पतीकडून नकार मिळाल्यास घटस्फोटासाठी मंजुरी मिळवण्यासाठी महिला धार्मिक न्यायालयात धाव घेऊ शकते.
हे कट्टरवादी चालवत असलेल्या एका वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार, अब्दुल्लाही यांची "तब्येत उत्तम होती". मोगादिशापासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या सॅबलेल गावातल्या न्यायालयात त्यांना दोषी ठरवण्यात आलं.
घटस्फोट घेणं ही सोमालियात सामान्य गोष्ट आहे, पण या घटनेचे तपशील असमान्य असे आहेत, असं बीबीसीच्या सोमाली सेवेचे प्रतिनिधी मोवलिद हाजी अब्दी यांनी म्हटलं आहे.
धर्माचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत अल-शबाब ही कट्टरवादी संघटना कठोर शारीरिक शिक्षा सुनावते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)