You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अत्यानंदामुळेही येऊ शकतो का हृदय विकाराचा झटका?
- Author, प्रविण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
रेल्वेनं नियमित प्रवास करणारे प्रवासी आणि रेल्वे यांचं एक अतुट नातं तयार होतं. पण आपल्या लाडक्या गाडीमधल्या सोयी सुविधांसाठी थेट रेल्वे मंत्रालयापर्यंत लढा देणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यूदेखील रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्याच गाडीची प्रतीक्षा करताना व्हावा, हा प्रकार अजबच!
नाशिकरोड स्टेशनवर बुधवारी सकाळी नेमकं असंच काहीसं घडलं आणि नाशिक-मुंबई असा रोजचा प्रवास पंचवटी एक्स्प्रेसनं करणाऱ्या प्रवाशांना धक्का बसला.
पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श कोचचा दर्जा मिळवून देण्यासाठी झगडणारे रेल्वे परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी (68) यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
त्यांना जवळच्याच जयराम रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.
विशेष म्हणजे पंचवटी एक्स्प्रेसचं नूतनीकरण व्हावं, यासाठी त्यांनी अनेक वर्षं रेल्वे मंत्रालयापासून ते मध्य रेल्वेच्या मुख्यालयापर्यंत सगळ्या पातळीवर लढा दिला होता. या नव्या रुपातल्या पंचवटी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठीच गांधी रेल्वे स्थानकावर आले होते.
झेंडा दाखवण्याच्या काही मिनिटं आधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले.
शेवटची मुलाखत
नव्या रुपातली गाडी बुधवारी पहिल्यांदा नाशिक-मुंबई मार्गावर धावली. या पार्श्वभूमीवर बिपीन गांधी यांची मुलाखत घेण्यासाठी वृत्तवाहिन्याही पुढे होत्या. त्यांची शेवटची मुलाखत त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिली.
त्यानंतर काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
"बिपीन गांधी यांच्या कामाचा आवाका मोठा होता. सकाळी ते आमच्याशी बोलले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक काम तडीला नेल्याचं समाधान होतं. आपल्या घरचा कार्यक्रम असल्यासारखंच ते प्रत्येकाचं स्वागत करत होते. आमच्याशी बोलल्यावर ते काही लोकांकडे गेले आणि लगेच तिथेच कोसळले," एबीपी माझाचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी सांगितलं.
गांधी यांनी बुधवारी सकाळी न्याहारीही केली नव्हती, अशी माहिती त्यांचे मित्र आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र फेकणे यांनी दिली.
अत्यानंदामुळेही हृदयविकाराची शक्यता
बिपीन गांधी यांच्या अकस्मात मृत्युबद्दल नाशिकमधल्या साईबाबा हार्ट इन्स्टिट्युटच्या डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितलं, "बिपीन गांधी यांना सहा महिन्यांपूर्वी बायपासचा सल्ला देण्यात आला होता. गेले पाच-सहा महिने ते रेल्वेच्या नव्या स्वरूपासाठी प्रयत्न करत असतील, तर अशावेळी एक दडपण असतं. काम करताना त्यांनी पथ्यपाणी पाळलं नसेल किंवा खूप दडपण घेतलं असेल, तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते."
"अती आनंद, अती दु:ख आणि अती तणाव यांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो," ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागाचे हृदयरोग तज्ज्ञ विजय सुरासे यांनी सांगितलं.
सुरासे पुढे सांगतात, "30 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. आजकाल लोक खूप काम करतात आणि सतत तणावाखाली असतात. तरुणांनाही टार्गेट पूर्ण करायची असतात. मग त्यासाठी रात्रंदिवस काम चालतं. या सगळ्याचा परिणाम शरीरावर होत असतो. ही प्रक्रिया सातत्यानं चालू असते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला, तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो."
'राज्यराणी'साठी उपोषण
नाशिकहून मुंबईला रोज अप-डाउन करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेसबरोबरच राज्यराणी ही गाडीही महत्त्वाची आहे. ती गाडी सुरू करण्यात आणि निर्धारित वेळेत चालवण्यातही बिपीन गांधी यांचे प्रयत्न मोलाचे होते.
"मंगळवारीच त्यांनी मेसेज करून पंचवटी एक्स्प्रेसच्या लोकार्पणासाठी बोलावलं होतं. त्यांच्या निधनानंतर एका सच्च्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्याची उणीव जाणवेल," असं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं.
"ही गाडी त्यांच्या मर्मबंधातली ठेव होती. त्यांनी सतत या गाडीच्या आणि त्यांच्या डब्याच्या चांगल्यासाठी संघर्ष केला. आता या गाडीला मिळालेलं नवीन रुपडं बिपीन गांधी यांच्यामुळेच लाभलं," असं गांधी यांचे सहकारी आणि रेल परिषदेचे सचिव देविदास पंडित यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)