मुंबई ट्रेन : 168 वर्षांपूर्वी नोंदवलेल्या पहिल्या भारतीय रेल्वेच्या आठवणी

भारतात पहिली रेल्वेगाडी धावण्याच्या घटनेला यंदा 168 वर्षं पूर्ण होत आहेत. रेल्वे अभ्यासक, इतिहासकार आणि ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांच्या 'हॉल्ट स्टेशन इंडिया' या पुस्तकातून रेल्वेच्या या पहिल्या दौडीचे साक्षीदार असलेल्या 'मुंबईकरां'नी नोंदवलेल्या काही आठवणी...

भारतात रेल्वेमार्ग सुरू होण्याची घटना ही भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ब्रिटिशांनी बोरिबंदर ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी पहिली गाडी चालवली आणि त्या गाडीच्या चाकांबरोबरच भारताच्या प्रगतीची दौड सुरू झाली.

पण ही गाडी मुंबईत चालली, हे त्या वेळी अनेक एतद्देशीयांसाठी अप्रुपच होतं. त्या वेळच्या अनेक प्रतिष्ठित मुंबईकरांनी आणि सामान्य भारतीयांनीही या पहिल्यावहिल्या रेल्वे प्रवासाच्या, मुंबईत रेल्वे सुरू होण्यासाठी चाललेल्या कामांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

त्यापैकी काही जण प्रत्यक्ष या ऐतिहासिक गाडीतून प्रवास करत होते, तर काही हा प्रवास पाहण्यासाठी गर्दी करून ठिकठिकाणी थांबले होते.

या पहिल्यावहिल्या गाडीला तीन इंजिनं आणि 14 डबे जोडले होते. त्यात 400 प्रवासीही होते.

'मी पाहिली पहिलीवहिली रेल्वे'

सर दिनशा वाच्छा हे मुंबईतील समाजसुधारक, राजकारणी आणि व्यावसायिक म्हणून गणले जातात. ही पहिली ट्रेन धावली, तेव्हा ते जेमतेम नऊ वर्षांचे होते.

भायखळ्याजवळ ही गाडी पाहण्यासाठी जमलेल्या हजारो जणांच्या गर्दीत तेदेखील सहभागी होते. या आठवणीबद्दल त्यांनी लिहिलं आहे.

"1850 ते 1860 हे दशक इथल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं दशक होतं. वाफेवर चालणारं इंजिन, त्या इंजिनातून बाहेर पडणारा धूर आणि लोखंडी रूळांवरून त्या इंजिनामागून धावणारे डबे ही नवलाई याच दशकातली!'

"बॉम्बेच्या जगतात हे आश्चर्य होतं. तो दिवस मला लख्खपणे आठवतो आहे. भायखळ्याजवळच्या जुन्या रेल्वे फाटकाजवळ जमलेल्या हजारोंच्या गर्दीत मीदेखील उभा होतो. खाशा प्रवाशांना घेऊन जाणारी पहिलीवहिली गाडी तिथून जाणार होती. लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. ती गाडी जाताना काहीतरी नवलाईची गोष्ट जात आहे, अशीच लोकांची भावना होती."

'लॉर्ड फॉकलंड'चं आगमन

भारतात आलेलं पहिलं रेल्वे इंजिन मुंबईत आलं नसलं, तरी प्रवासी वाहतुकीसाठीचं पहिलंवहिलं इंजिन मात्र मुंबईच्या बंदरावरच उतरलं. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर ल्युसियस बेंटिंक कॅरी म्हणजेच लॉर्ड फॉकलंड यांच्या नावावरून या इंजिनालाही लॉर्ड फॉकलंड असंच नाव पडलं.

मुंबईकरांना एकाच जागी उभ्या असलेल्या वाफेच्या इंजिनांची सवय होती. पण रूळांवर धावणारं हे वाफेचं इंजिन म्हणजे मुंबईकरांसाठीही नवलाई होती. तब्बल 200 मजुरांनी हे इंजिन बंदरावरून भायखळ्याच्या रेल्वे परिसरात खेचत नेलं होतं.

हे इंजिन पाहण्यासाठी लोकांनी भायखळ्याला गर्दी केली होती. 17 फेब्रुवारी 1852 रोजी 'बॉम्बे टेलिग्राफ' या वर्तमानपत्रात याचं वर्णनही छापलं होतं.

"स्थानिकांना या अग्निरथात फारच रस असल्याचं दिसतं. या इंजिनाला लोकांनी नावही दिलं आहे आणि ते बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. या इंजिनाचं वजन, त्याचं आकारमान यामुळे लोकांना त्याच्या वेगाचा अंदाज बांधणं कठीण आहे.'

"हे इंजिन 200 लोकांनी रस्त्यावरून खेचत आणल्यामुळे लोकांना या इंजिनाच्या वेगावर विश्वास ठेवणं जड जात आहे. काही दिवसांतच हे इंजिन रेसकोर्सवरच्या अरबी घोड्यांपेक्षा जास्त जोरात धावेल, हे सांगितल्यावर तर त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवणंही त्यांना कठीण जातं."

लहान मुलं खाणारा 'लोखंडी राक्षस'

जसजशा या इंजिनाच्या आणि गाड्यांच्या चाचण्या सुरू झाल्या, तसतशी लोकांच्या मनात या इंजिनाबद्दल भीती निर्माण झाली. काहीही न जोडता ही महाकाय गोष्ट कशी काय एवढ्या जोरात धावू शकते. यामागे नक्कीच काहीतरी दैवी किंवा सैतानी शक्ती असावी. बहुधा सैतानीच! असा एक विचार बळावू लागला.

याच दरम्यान आणखी एक अंधश्रद्धा जोर धरू लागली. 'या इंजिनाला शक्ती पुरवण्यासाठी रूळांखाली लहान मुलं आणि तरुण जोडपी पुरली जातात, त्यासाठी ब्रिटिश सैनिक रस्त्यावरच्या लहान मुलांना पकडत आहेत. त्यांना पकडून लोखंडी राक्षसाला खायला देतात', असं लोक मानत होते.

रेल्वेने प्रवास केल्याने आयुष्य कमी होतं, असाही एक समज बळावला. एखादा माणूस एखाद्या ठिकाणी नेहमीपेक्षा लवकर पोहोचतो, म्हणजेच त्याचा मृत्यूही नेहमीपेक्षा लवकर होईल, असं काहींचं मत होतं.

पहिली दौड

165 वर्षांपूर्वी 16 एप्रिल 1853 रोजी, दुपारी साडेतीन वाजता गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांच्या पत्नी लेडी फॉकलंड आणि इतर 400 प्रवासी गाडीत चढले. या 400 प्रवाशांमध्ये ब्रिटिश अधिकारी, स्थानिक जमीनदार, मुंबईतील प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश होता.

बरोबर 3 वाजून 35 मिनिटांनी 21 तोफांच्या सलामीत सिंध, सुलतान आणि साहिब ही तीन इंजिनं जोडलेली गाडी बोरीबंदरहून ठाण्यासाठी रवाना झाली. सायन येथे पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी थांबत हा 32 किलोमीटरचा प्रवास या गाडीने 57 मिनिटांत पूर्ण केला.

कृष्णशास्त्री भाटवडेकरांनी या अग्निपथाच्या पहिल्या प्रवासाची आठवण लिहिली आहे.

ते म्हणतात, "डोंगरी किल्ल्यावरून दुपारी साडेतीन वाजता तोफांची सलामी झाली आणि रेल्वेच्या डब्यांपैकी एका डब्यात असलेल्या गव्हर्नर साहेबांच्या बँडवर राष्ट्रगीत वाजू लागलं. ही नवलाई बघण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

"गाडीच्या मार्गावरील घरांच्या छतांवर, गच्चीवर, उंच टेकड्यांवर, पुलांवर लोक जमले होते. डब्यांची माळ ओढत इंजिनांनी सायन ओलांडलं आणि ही गाडी बघण्यासाठी गर्दी वाढली."

विशेष म्हणजे 165 वर्षांपूर्वी बोरीबंदर ते ठाणे हे अंतर कापण्यासाठी 57 मिनिटं लागली होती. आता 165 वर्षांनंतरही हे अंतर पार करण्यासाठी स्लो लोकलने साधारण तेवढाच वेळ लागतो.

संकलन : रोहन टिल्लू

(रेल्वे अभ्यासक, रेल्वे इतिहासकार आणि ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांच्या 'हॉल्ट स्टेशन इंडिया' या पुस्तकातून साभार. )

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)