You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'घर वापसी' : म्यानमारमध्ये पहिल्यांदाच परतलं रोहिंग्या कुटुंब!
रोहिंग्या मुस्लिमांचं एक कुटुंब मायदेशी म्यानमारला परतलं आहे. ही रोहिंग्यांच्या 'घर वापसी'ची पहिलीच घटना असून, संयुक्त राष्ट्र महासंघाने म्यानमार रोहिंग्यांसाठी अजूनही सुरक्षित नसल्याचा इशारा दिला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये म्यानमारमध्ये सैन्याची घातक मोहीम सुरू झाल्यावर जवळजवळ 7 लाख रोहिंग्यांनी सीमेपार पलायन केलं होतं.
संयुक्त राष्ट्राने म्यानमारवर 'वंशसंहार' करत असल्याचा आरोप ठेवला आहे. म्यानमारने हा आरोप फेटाळून लावला आहे
पाच जणाचं एक कुटुंब निर्वासितांच्या शिबिरात परतल्याचं म्यानमारने सांगितलं. त्यांना आवश्यक वस्तू आणि ओळखपत्र देण्यात आलं आहे.
जर या प्रक्रियेला दुजोरा मिळाला तर हा संघर्ष सुरू झाल्यापासून मायदेशी परतणारं हे पहिलंच कुटुंब ठरणार आहे.
पण राखीन प्रांतात आपण रोहिंग्या कट्टरवाद्यांच्या विरोधात करत असलेली कारवाई योग्य असल्याचं म्यानमारचं ठाम मत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला 10 रोहिंग्यांची हत्या करण्याच्या आरोपांखाली म्यानमारने सात सैनिकांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
शेजारच्या बांगलादेशात आश्रय घेणाऱ्या अनेक निर्वासितांनी मात्र म्यानमारच्या सैन्याने नरसंहार, बलात्कार आणि गावंच्या गावं जाळण्यासारखी कृत्यं अनेकदा केल्याचं सांगितलं आहे.
म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लीम अल्पसंख्याक समुदायात मोडतात. ते बांगलादेशातून बेकायदेशीरपणे आलेले निर्वासित आहेत, असं म्हणून म्यानमार त्यांना नागरिकत्व नाकारत आलं आहे.
म्यानमार प्रशासनाने शनिवारी एका "मुस्लीम कुटुंबाला" ओळखपत्रं देतानाची काही छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. हे कार्ड म्हणजे ओळखपत्रासारखं आहे आणि त्यामुळे नागरिकत्व मिळत नाही.
बांगलादेशातील आश्रय शिबिरांमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या नेत्यांनी हे ओळखपत्र स्वीकारण्यास नकार दिला आहे.
म्यानमारने हे कुटुंब मायदेशी परतल्याची घोषणा करण्याच्या आदल्या दिवशीच संयुक्त राष्ट्रमहासंघाने म्यानमारमधील परिस्थिती कोणत्याही रोहिंग्यांसाठी परतण्यासाठी योग्य नसल्याचं जाहीर केलं होतं.
"बांगलादेशातल्या स्थलांतरितांनी म्यानमारमध्ये परतण्याआधी त्यांच्या राखीनमधली कायदेशीर परिस्थिती, त्यांचं नागरिकत्व, सुरक्षा आणि मूलभूत हक्कांशी निगडीत कामांमध्ये पुरेशी प्रगती झाल्याचं तपासून घ्यावं," असं संयुक्त राष्ट्र महासंघानं म्हटलं आहे.
अनेक प्रश्नांची मालिका
या परिस्थितीचं विश्लेषण करताना बीबीसीचे म्यानमारमधील प्रतिनिधी निक बेक सांगतात - पहिलं कुटुंब म्यानमारमध्ये परतणं एक सुचिन्ह आहे. पण या लोकांचे आतापर्यंत फक्त फोटो समोर आले आहेत. त्यामुळे त्यांची नक्की परिस्थिती काय आहे, याची सध्या कुणालाच कल्पना नाही.
बांगलादेशातील कॉक्स बाझारमधील मुस्लिमांनी म्यानमारच्या सैनिकांच्या कृत्याचं ज्या प्रकारे वर्णन केलं त्यावरून तिथे परत जाण्याची कुणाची किती इच्छा असेल, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली.
हे कोणतं कुटुंब आहे? ते का परतले? त्यांच्या सुरक्षेची हमी काय? अशा अनेक प्रश्नांची मालिका आ वासून उभी आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)