कॉमनवेल्थ गेम्स : मनू, तेजस्विनी, साईना, मेरी कोम कशा ठरल्या भारताच्या सुपरगर्ल्स?

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, बीबीसी भारतीय भाषा

कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या घटना सध्या संपूर्ण भारतात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. कोण जाणे तिची स्वप्नं काय होती? कदाचित ती मोठी झाली असती तर तिला तिची स्वप्नं पूर्ण करता आली असती. भारतातल्या या पार्श्वभूमीवर दूर ऑस्ट्रेलियात वातावरण मात्र काहीसं वेगळं आणि चांगलं आहे. इथे होत असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिलांनी उत्तम कामगिरी केली आहे.

माझ्या लहानपणी प्रसिद्ध गायक गुरुदास मान यांचं पारंपरिक पंजाबी भाषेतलं गाणं मी नेहमी ऐकायचे. आपलं हृदय जर तरुण असेल तर वय हे केवळ एक आकडाच ठरतं, असा त्या गाण्याचा भावार्थ होता.

जेव्हा ३५ वर्षीय भारतीय बॉक्सर मेरी कोम हिला कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल मिळवताना पाहिलं, तेव्हा हे गाणं या मणिपुरी बॉक्सरसाठीच लिहिलं असावं असा मला भास झाला.

या स्पर्धेत मेरी कोमपेक्षा अर्ध्या वयाची भारतीय शूटर मनू भाकर हिनं देखील सुवर्णपदक मिळवलं आहे. मनू केवळ १६ वर्षांची असून हे तिचं कॉमनवेल्थ गेम्समधलं पहिलं मेडल आहे.

भारतीय खेळाडूंनी अनपेक्षितरित्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ६६ पदकांची कमाई केली. या ६६ पदकांपैकी २६ पदकं ही सुवर्ण आहेत. या २६ पदकांपैकी १२ पदकं ही महिलांनी मिळवली आहेत. तर मिक्स्ड-डबल्समध्येही त्यांच्यामुळे सुवर्ण पदक खेचून आणलं आहे.

ईशान्य भारतातल्या मणिपूरपासून, महाराष्ट्रातल्या तेजस्विनीपर्यंत आणि उत्तरेतल्या वाराणसीपासून दक्षिणेतल्या सिंधूपर्यंत शहर- गावांमधून आलेल्या महिलांची ही कामगिरी आहे. हरयाणातल्या दूरच्या खेड्यांमधून आलेल्या मुलींची गोष्ट तर प्रेरणादायी आहे. प्रत्येकीच्या यश आणि विजयामागे एक खडतर प्रवास आहे.

यात काहींनी गरिबी आणि अपुऱ्या संधींमधून वाट काढली, तर काहींनी लैंगिक भेदाचे जोखड दूर सारत आपला विजय साकार केला.

ट्रेनिंगसाठी 40 किमी सायकल प्रवास

या गेम्समध्ये पहिलं सुवर्ण मिळवणारी मीराबाई चानू मणिपूरमध्ये आपल्या ट्रेनिंग सेंटरपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वी ४० किलोमीटरचा प्रवास सायकलने करायची.

त्यावेळी मीराबाईकडे वेटलिफ्टिंग करण्यासाठी लोखंडी रॉड देखील नसायचे. त्यामुळे ती बांबूचा वापर करत असे. रोजच्या आहारात लागणारं चिकन आणि दूध हे तिच्यासाठी तर दुरापास्तच होतं.

मेरी कोमला केवळ गरिबीचा सामना करावा लागला नाही तर, जेव्हा सन २०००मध्ये तिनं महिला बॉक्सर होण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला स्वतःच्या लोकांकडूनच विरोध सहन करावा लागला होता.

बॉक्सिंगमुळे इजा झाली तर लग्न कोण करेल?

मेरी कोमच्या पालकांचाच मुळात तिला विरोध होता. कारण, बॉक्सिंगमुळे तिच्या नाकाला किंवा चेहऱ्याला इजा झाली तर तिच्याशी लग्न कोण करेल हा प्रश्न तिच्या पालकांना पडला होता.

सरिता देवी आणि मेरी कोम या मणिपूरच्या बॉक्सर महिलांनी आता अन्य महिलांसाठी बॉक्सिंग खेळाचा मार्ग सोपा केला आहे. तर, हरयाणामधल्या महिलांनी पुरुषांचा अजून एक बालेकिल्ला सर केला आहे.

या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि रियो ऑलिंपिकमध्येही पदक मिळवलेल्या साक्षी मलिकची कहाणीही अशीच काहीशी आहे. जेव्हा तिनं कुस्तीचा सराव सुरू केला होता तेव्हा तिच्यासोबत सरावासाठी एकही महिला किंवा तरुणी उपस्थित नसायची.

याचप्रमाणे या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक मिळवणारी १९ वर्षीय दिव्या तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये गावा-गावात जाऊन मुलांना कुस्तीच्या स्पर्धेत चितपट करीत असे. यामुळे तिला गावातल्या लोकांच्या टोमण्यांना सामोरं जावं लागलं, पण तिनं इतरांपेक्षा पैसे मात्र जास्त मिळवले. तिच्या या प्रवासानं तिच्या सारख्या अनेक जणींना ताकद मिळाली आहे.

या महिला खेळाडूंवर केवळ देशाचं नाव मोठं करण्याचं दडपण नसून त्यापेक्षा मोठं दडपण त्यांच्या शिरावर आहे.

मोठं दडपण पण ते कशाचं?

या गेम्समध्ये वाराणसीची २२ वर्षीय कुस्तीपटू पूनम यादवनं २२२ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. तिच्या दोन बहिणींना देखील क्रीडा क्षेत्रातच नशीब आजमवायचं आहे.

तिच्या वडिलांकडे मात्र आपल्या तिन्ही मुलींना या क्षेत्रात आणण्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे हा विजय त्यांच्या कुटुंबासाठी खूप वेगळ्या पातळीवरचा आहे.

या कॉमनवेल्थ गेम्समधला भारतीय महिलांचा टेबल टेनिस संघाचा फोटोही विशेष बोलका आहे. तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा फोटो महिलांच्या या यशाची कहाणी सांगून जातो. कारण, पूर्वी भारतीय संघानं हे पदक कधीच मिळवलं नव्हतं.

आजही भारतात क्रीडा प्रकारांना अनेक कुटुंबांमध्ये स्वीकारलं जात नाही. पण, तरीही भारतात अॅथलिट महिलांची स्विकारार्हता वाढू लागली आहे. कुटुंबांकडून मिळणारं हे सहकार्य देखील भारतीय महिला खेळाडूंच्यामागचं एक कारण आहे.

१७ वर्षीय मेहुली घोष हिला शूटिंगमध्ये रौप्य पदक मिळालं. वयाच्या १४व्या वर्षी तिच्या बाबत घडलेल्या एका अप्रिय घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या तणावात आली होती. पण, तिच्या पालकांनी तिला सहकार्य आणि पाठिंबा दिल्यानं तिला पुढे येता आलं.

माजी ऑलिंपिकपटू जॉयदीप कुमार यांच्या अॅकॅडमीत प्रवेश घेण्याच्या तिच्या पालकांच्या निर्णयानं मेहुलीचं आयुष्य बदलून गेलं.

आपल्या मुलीला जेव्हा सातत्यानं लक्ष आणि सहकार्य हवं आहे हे जेव्हा मनू भाकरच्या वडीलांना कळलं तेव्हा त्यांनी मरीन इंजिनिअर पदावरील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी सोडून त्यांनी मुलीच्या खेळाकडे सर्वाधिक लक्ष दिलं.

मनूचा ज्यादिवशी जन्म झाला त्यादिवशी तिची आई सुमेधा हिचा संस्कृतच्या परीक्षेचा पेपर होता. डॉक्टरांनी पेपरला जाऊ नको असं सांगूनही सुमेधा यांनी ती परीक्षा दिली होती.

सुमेधा यांच्यातली ही लढण्याची वृत्ती त्यांची मुलगी मनू हिच्यात उतरलेली दिसते.

या सगळ्या महिला खेळाडूंप्रमाणेच कॉमनवेल्थमधली ३७ वर्षीय विजेती खेळाडू तेजस्विनी सावंत हिचा प्रवासही विसरण्यासारखा नाही. कारण, आपल्या मुलीला सरावासाठी रायफल घेऊन देण्यासाठी तिचे वडील दारोदार फिरून पैसे मागण्यासाठी फिरले होते.

आपल्या मुलीचं यश डोळे भरून बघण्यासाठी आज ते हयात नसले तरी त्यांच्या मुलीनं त्यांचं स्वप्न मात्र पूर्ण केलं. तेजस्विनीनं जगातली पहिली जगज्जेती भारतीय महिला शूटर होण्याचा बहुमानही मिळवला.

पुढील प्रसंग बॉलीवूडमधला वाटेल, मात्र एकदा मेरी कोमच्या आयुष्यात असा प्रसंग येऊन गेला होता. भारतात आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी थांबावं की चीनला आशिया कपच्या स्पर्धेसाठी जावं, अशी द्विधामनस्थिती तिच्यापुढे उद्भवली होती. मात्र, आपल्या मुलाला पतीसोबत ठेऊन मेरी कोम आशिया कप स्पर्धेत सहभागी झाली आणि तिनं सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.

सानिया मिर्झा, पी. व्ही सिंधू, मिथाली राज अशी यशस्वी महिलांची यादी वाढतच चालली आहे. कुटुंब आणि वैयक्तिक मेहनतीच्या बळावर या महिलांनी अनेक अडथळे दूर सारले आहेत.

मिराबाई चानू जर ४० किलोमीटरचा प्रवास सायकलनं करून यश मिळवू शकते तर, योग्य सोयी-सुविधा पुरवल्यास भारतात किती तरी महिला जागतिक दर्जाच्या खेळाडू होऊ शकतात, असं वक्तव्य भारताची माजी कुस्तीपटू मल्लेश्वरी हिनं केलं आहे.

याचबरोबर या महिला अष्टपैलूसुद्धा आहेत. हिना सिद्धू डेंटल सर्जन असून महिला क्रिकेटपटू शिखा पांडे फ्लाईट लेफ्टनंट आहे.

या महिलांनी मैदानात आणि मैदानाबाहेर स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. या भारताच्या खऱ्याखुऱ्या वंडरवुमन आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)