You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉमनवेल्थ गेम्स 2018 : ऑस्ट्रेलियाचा झेंडा हातात घेणारी ही भारतीय महिला कोण?
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी, गोल्ड कोस्टहून
मी राष्ट्रकुल स्पर्धा ज्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी पाय ठेवला, तेव्हा माझ्या नजरेस ट्रॅक सूट घातलेली एक भारतीय महिला पडली. त्यांच्या हातात ऑस्ट्रेलियाचा झेंडा होता.
मी विचारल्यावर त्यांनी त्यांचं नाव रूपिंदर सिंग संधू असं सांगितलं. त्या 48 किलो गटात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या वर्षीच ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली होती आणि काही दिवसांपूर्वी जोहान्सबर्गमध्ये झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी कांस्यपदक देखील जिंकलं होतं.
ग्लासगोमध्ये त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. त्यांना 48 किलोच्या गटात खेळायचं होतं. पण त्यांचं वजन 200 ग्रामनं जास्त भरलं म्हणून त्यांना त्यांची इच्छा नसताना 53 किलोच्या गटात खेळावं लागलं. तिथं त्यांना त्यांच्या पेक्षा जास्त ताकदीच्या पहलवानांसोबत लढावं लागलं. त्यामुळं त्यांचं प्रदर्शन फारसं चांगलं नाही.
33 वर्षांच्या रूपिंदर दहा वर्षांपूर्वी अमृतसरहून ऑस्ट्रेलियाला गेल्या. त्यावेळी त्यांची मुलगी साहिबा 15 महिन्यांची होती.
2004 साली त्यांनी पहिल्यांदा जालंधरजवळच्या परसरामपूरच्या आखाड्यात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर त्यांनी तुर्कस्तानात झालेल्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि सुवर्णपदक जिंकलं.
दंगल फेम 'फोगाट सिस्टर्स' यांच्याशी रूपिंदर यांची चांगली मैत्री आहे. त्या शुद्ध शाकाहारी आहेत आणि त्या फक्त दूध, दही आणि भाज्यांवरच आपलं काम भागवतात.
हॉकीचे महान खेळाडू ऑस्ट्रेलियाचे ध्वजवाहक
गोल्ड कोस्टच्या लोकांची इच्छा होती की त्यांची स्थानिक स्टार खेळाडू सॅली पिअरसन यांनी उद्घाटन समारंभावेळी ऑस्ट्रेलियाचा ध्वज हाती घ्यावा. पण हॉकीचे प्रसिद्ध खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन हॉकी संघाचे कॅप्टन मार्क नोलेस हे नेतृत्व करतील असं ठरलं. त्यांनी अॅथेन्स ऑलम्पिक आणि गेल्या तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे.
पण स्थानिक खेळाडू सॅली उद्घाटन समारंभात पिअरसन यांना देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाईल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. करारा स्टेडियमजवळच असलेल्या एका घरात पिअरसन यांचा जन्म झाला होता. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रकुल खेळात 100 मीटर अडथळा शर्यतीत तीन सुवर्णपदकं जिंकली आहेत.
भारतात आणि ऑस्ट्रेलियासह जगभरात अनेक देशांमध्ये फुटबॉल आणि क्रिकेटच्या खेळाडूंच्या तुलनेत हॉकीच्या खेळाडूंना कमी पैसे मिळतात. नोलेस यांनाही त्यांच्या तोडीच्या फुटबॉलपटूला त्यांच्यापेक्षा 20 पट अधिक पैसे मिळत असावेत.
त्यांच्या कुटुंबीयांच्या नसानसांत हॉकीचं रक्त वाहतं असं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू सेमी डायर हे त्यांचे मेहुणे आहेत आणि नोलेस यांची तिन्ही मुलं फ्लिन, लूका आणि फ्रॅंकी हे हॉकी खेळतात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)