मक्का मशीद स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा

हैद्राबादच्या एका कनिष्ठ न्यायालयाने 11 वर्षांपूर्वी झालेल्या मक्का मशीद स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दुपारी हा निर्णय दिल्यानंतर संध्याकाळीच लगेचच रवींद्र रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे.

हैद्राबादच्या बीबीसी प्रतिनिधी दीप्ती बाथिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांनी हाय कोर्टात राजीनामा सादर केला. त्यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण अधिकृतपणे सांगितलेलं नाही.

तेलंगणा ज्युडिशिअल ऑफिसर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत.

चार मीनारनजीक असलेल्या या मशिदीच्या वजूखान्यात 18 मे 2007ला झालेल्या स्फोटात 16 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लोकांनी केलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या पाच लोकांचाही यात समावेश आहे.

सुरुवातीला या स्फोटामागे हरकतुल जमात-ए-इस्लामी म्हणजेच हूजी या कट्टरवादी संघटनेचा हात असल्याची शंका घेण्यात आली होती. तसंच 50हून अधिक मुस्लीम तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते.

आंध्र प्रदेशच्या दहशतविरोधी पथकासहीत नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी (NIA) आणि CBIने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली होती.

पण तीन वर्षांनंतर 2010मध्ये पोलिसांनी अभिनव भारत नावाच्या संघटनेशी संबधित स्वामी असीमानंद याला अटक केली होती.

या अटकेनंतर स्वामी असीमानंद यांनी केलेल्या एका वक्तव्याने सगळ्यांनांच अचंबित केलं होतं. स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुस्लीम युवकांप्रती सहानुभूती दर्शवित ते सगळे निष्पाप असल्याचं स्वामी म्हणाले होते.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला तरुण जागीरदार, अब्दुल नईम, मोहम्मद इमरान खान, सइद इमरान, जुनैद आणि रफीउद्दीन अहमद यांची न्यायालयाने मुक्तता केली होती.

नंतर आंध्रप्रदेश सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाने 61 मुस्लीम तरुणांना निष्पाप असल्याचं प्रमाणपत्रही दिलं होतं.

स्वामी असीमानंद व्यतिरिक्त अभिनव भारतचे लोकेश शर्मा, देवेंद्र गुप्ता आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं.

यातील काही आरोपी हे समझौता एक्स्प्रेस आणि मालेगाव बाँबस्फोटाच्या घटनेतही आरोपी होते.

असं असलं तरी लोकेश शर्मा आणि देवेंद्र गुप्ता यांच्या विरोधात अधिक पुरावे मिळू शकले नाही, असं NIAने न्यायालयात सांगितलं.

मशिदीचा मिस्त्री एक हिंदू होता

भारतातील सगळ्यांत मोठं अंगण असलेली मक्का मशीद ही कुतुबशाहीच्या काळातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. चार मीनारजवळच ही मशीद उभारण्यात आली.

सातवा कुतुबशाही राजा मोहम्मद कुतुब याने 1616-1617मध्ये या मशिदीच्या बांधकामास सुरुवात केली. इंजिनिअर फैजुल्लाह बेग यांनी या मशिदीचा आराखडा तयार केला होता.

औरंगजेबाने हल्ला केल्याने या मशिदीचं बांधकाम मध्येच थांबवाव लागलं.

या मशिदीचा मिस्त्री हा एक हिंदू होता आणि त्याच्या देखरेखीखाली 8,000 मजूर याचं बांधकाम करत होते, अशी माहिती इतिहासकार देतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)