You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आरे कॉलनी जंगलातील आग विझली पण संशयाचे धूर कायम
मुंबईत सोमवारी रात्री आरे कॉलनीजवळच्या जंगलात मोठी वणव्यासारखी आग लागली. जवळपास १२ तासांनंतर अग्निशमन दलाला ती आग विझवण्यात यश आलं. आग विझली, पण त्यातून संशयाचा धूर मात्र अद्याप येतो आहे आणि ही आग लागली की लावली असे प्रश्न विचारले जात आहेत.
या भागातल्या जंगलांसाठी गेली अनेक वर्षं न्यायालयीन लढाई लढणाऱ्या 'वनशक्ती' या संस्थेनं सरकारी यंत्रणेनंच खासगी विकासकांच्या भल्यासाठी इथं वारंवार आग लावल्याचा आरोप केला आहे. "पूर्वी हा सगळा 'नो डेव्हलपमेंट झोन' (एन डी झेड) होता. हळूहळू तो आय. टी. पार्कसाठी खुला करण्यात आला. आता अजून जागा हवी म्हणून इथं जी झुडपं येतात त्यांना जाळून टाकण्याचा सपाटा लावलाय. म्हणजे ती मोठी होणारच नाहीत आणि जागा विकासकांसाठी मोकळी करण्यात येईल. दरवर्षी अशी आग लागते. फरक इतकाच की यंदा ती प्रमाणाबाहेर मोठी झाली आणि सगळ्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं. या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे," 'बीबीसी मराठी'शी बोलतांना 'वनशक्ती'चे संचालक स्टॅलिन डी यांनी हा आरोप केला.
संशयाचा हा धूर अधिक गडद झाला जेव्हा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच चौकशीची मागणी करून या प्रकरणाचं 'दूध का दूध, पानी का पानी' करण्याची मागणी केली. "जी आग लागली आहे, त्या प्रकरणाबद्दल मी अत्यंत गंभीर आहे. मी आजच मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची आणि यामागे कोणाचा हात आहे हे तपासण्याची मागणी करणार आहे," असं कदम मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अर्थात सगळ्याच प्रकारे मुंबई शहरातला हा जंगलपट्टा अगदी 'सोन्या'सारखा आहे.
आरे कॉलनीतल्या या पट्ट्याला जोडूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या जंगलाच्या चौतर्फा इमारतींचं जंगल आहे आणि नवनवे प्रोजेक्ट्स या परिसरात येत आहेत. त्याला लागूनच एका बाजूला 'दादासाहेब फाळके चित्रनगरी आहे'. या परिसरातच मुंबई मेट्रोची प्रस्तावित कारशेड आहे. जंगलतोड होईल म्हणून अनेक स्वयंसेवी संस्थांसोबतच काही राजकीय पक्षांनीही या कारशेडला विरोध केला आहे. ज्या जंगलपट्ट्यात आग लागली त्यातील बरीच जमीन ही खासगी आहे आणि त्याभोवती कुंपणही आहे.
जेव्हा 'बीबीसी मराठी'ची टीम या भागात गेली तेव्हा तिथल्या नागरिकांकडूनही हेच समजलं की वर्षाच्या या काळात या जंगलपट्ट्यात नेहमी आग लागते. रंजन मयेकर या पट्ट्यालगतच असणा-या 'म्हाडा'च्या सोसायटीचे सचिव आहेत. "इथं दरवर्षी दिवाळीच्या आसपास अशी आग लागते. यंदा तिची तीव्रता अधिकच होती. इथं आग लागली की लावली हे आम्हाला माहीत नाही. पण ती प्रत्येक वर्षी याच काळातच आग का लागते? इतर महिन्यांमध्ये का लागत नाही?" मयेकर विचारतात.
"इथं आग आपोआप लागते हे काही पटत नाही. हे काही कांगो नाही, झाड झाडा लागलं आणि आग लागली," असंही ते म्हणाले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)