'आरे कॉलनीजवळच्या जंगलातली आग लागली की लावली?'

मुंबईतील गोरेगाव पूर्वेला आरे कॉलनी इथं डोंगराला लागलेली मोठी आग अटोक्यात आली आहे. मुंबई अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

आरे कॉलनीमधल्या नागरी निवार परिषदेमागे हा डोंगर आहे. जवळपास 3 ते 4 किलोमीटर परिसरात ही आग पसरली होती.

दरम्यान आरे कॉलनीच्या जंगलतील आग लागली की लावली? याची वन खात्याने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे.

अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सोमवारी रात्री सांगितलं की, "जंगलात पोहोचण्यात अडचणी येत आहेत. ही आग इतर भागांतही पसरत आहे. दोन Hose Lineच्या माध्यमातून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत."

वनशक्ती या एनजीओचे सीनिअर कन्झव्हेशन ऑफिसर अश्विन अघोर यांनी या आगीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. "नेमकं किती नुकसान झालं आहे, हे आताच सांगता येणार नाही. पण जे नुकसान झालं आहे, ते नक्कीच मोठं आहे. या बरीच झाडे आगीत जळाली आहेत. इथल्या वन्यजीवांचा विचार करता, ही आग पर्यावरणाला नुकसानकारक आहे." हिवाळ्यात ही आग लागल्याने शंका व्यक्त होत आहेत, असं ते म्हणाले. जंगलात लागणाऱ्या अशा आगींमुळे रोपं, लहान झाडे जळून खाक होतात, हे नुकसान मोठं असतं असं ते म्हणाले.

हिवाळा असल्याने हवा इथंच थांबून राहील त्यामुळे हवेचं प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होईल, असं ते म्हणाले.

यासंदर्भात वनविभागाशी संपर्क होऊ शकलेला नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)