बीबीसी पत्रकाराची आँखो देखी : 'हॉटेलच्या फायर एग्झिटलाच आधी आगीनं वेढलं!'

    • Author, अंकूर जैन
    • Role, बीबीसी गुजराती संपादक

मुंबईच्या कमला मिल कंपाऊंडमधल्या एका हॉटेलमध्ये बीबीसी न्यूज गुजरातीचे संपादक अंकूर जैन त्यांची बहीण आणि मित्रांसह गेले होते. आणि मध्यरात्रीनंतर तिथे भयानक आग लागली. ते थोडक्यात बचावले. त्यांनी जे पाहिलं त्याची ही आँखो देखी...

मुंबईतल्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये नेहमी असते, तशीच ती रात्र होती. पण ती माझ्या आयुष्यातली सगळ्यांत भयावह रात्र ठरेल, याची अजिबातच कल्पना नव्हती. मलाच काय, 28 डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिलमधल्या त्या हॉटेलमध्ये माझ्यासारख्या 100-150 जणांनाही ती नव्हती.

माझी बहीण आणि काही मित्रांसह मी जेवायला बाहेर पडलो होतो. आम्ही चौघं '1 अबव' या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. ते हॉटेल पूर्णपणे भरलेलं होतं. आम्हाला जागा मिळाली नाही. त्यामुळे थोड्या वेळातच जागा मिळेल. या आशेवर आम्ही DJच्या टेबलाजवळ थांबलो.

साधारण 12.30 वाजता "आग लागली आहे! पळा!" असं कोणीतरी ओरडलं.

त्या इशाऱ्यामुळे आम्ही सावध झालो. रेस्टॉरंटच्या टोकाला आग दिसली. ती आटोक्यात आणली जाईल, असं वाटलं. पण माझा अंदाज चुकला.

काही क्षणातच ती आग वाऱ्यासारखी पसरलेली आम्ही पाहिली. जे जे समोर होतं त्या सगळ्याला आगीनं वेढलं.

फॉल्स सिलिंग मुळे तर आग आणखी भडकली. ज्वाळा छतापर्यंत पोहोचल्या आणि मग त्या आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य झालं.

कर्मचाऱ्यांनी आम्हाला फायर एग्झिटच्या दिशेनं पाठवलं, पण तिथं चेंगराचेंगरी सुरू झाली होती, दारावरही आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. आमच्या आजूबाजूचं सगळं एकापाठोपाठ पेट घेत होतं.

आम्ही कसं तरी जिन्यापाशी पोहोचलो, तोच आमच्यातली एक व्यक्ती आमच्याबरोबर नसल्याचं लक्षात आलं. आमचा गोंधळ उडाला. ती कुठं दिसत नसल्यानं आम्ही तिला हाका मारायला सुरुवात केली.

बिल्डिंगच्या दुसऱ्या बाजूनंही काही लोक बाहेर पडल्याचं कोणीतरी म्हणालं. आम्ही तिचा शोध घेतच बाहेर पडलो. ती आधीच बाहेर पडली, असं मनाला सांगतच आम्ही बाहेर आलो. सुदैवाने ते नंतर बरोबर निघालं.

तिसऱ्या मजल्यावरून खाली धावत येत असतानाच स्फोटांचे आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. तेवढ्यात एकाने फोन करून आम्हाला हळूहळू बाहेर येण्यास सांगितलं. कसंतरी आम्ही बाहेर पडलो.

आग लागल्यावर आम्ही बाहेर पडणारच होतो. रेस्टॉरंटच्या दाराजवळच आम्हाला जागा मिळाल्याने आम्ही वेळेत बाहेर पडू शकलो.

बाहेर लोक त्यांच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना हाक मारत होते. त्याक्षणी त्या आगीची नेमकी तीव्रती आम्हा कोणालाच उमगली नव्हती.

छतावर तर आगीनं थैमान घातलं होतं. सुरक्षारक्षक सगळ्यांना ओरडून ओरडून बाहेर काढत होते, आवाराच्या बाहेर जाण्यास सांगत होते. याच सगळ्या गोंधळात आमच्याबरोबरची ती चौथी व्यक्ती आम्हाला सापडली!

एव्हाना फायर ब्रिगेडच्या गाड्या येऊ लागल्या होत्या. 12.40च्या सुमारास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तीन जण जखमी झाल्याचं सांगितलं.

आम्ही घरी परतलो. आग विझली की नाही, हे पाहण्यासाठी टीव्हीसमोरच बसलो. हे सगळं इतकं धक्कादायक होतं, आम्ही पूर्णपणे हादरलो होतो. तसेच झोपी गेलो.

भल्या सकाळी, त्या आगीत 14 जण ठार झाल्याची बातमी पाहिली. तो मोठा धक्काच होता. आगीचं ते स्वरूप पाहता तसं काही होईल, असं वाटलं नव्हतं.

पण तसं झालं! अशा आपत्कालीन परिस्थितीत काय करावं लागेल, याचा विचार रेस्टॉ़रंटच्या मालकांनी, अधिकाऱ्यांनी केला नसल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. जिकडे तिकडे चटकन पेट घेतील अशी वस्तू होत्या. ग्राहकांच्या, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार झालाच नव्हता.

माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, सर्वांत जास्त बळी महिलांच्या प्रसाधनगृहात गेले. ते फायर एग्झिटजवळच असल्याचं मला स्पष्ट आठवतं.

आमची एक मैत्रीण या प्रसंगाच्या काही काळ आधीच तिथं जाऊन आली होती. ती जर वेळीच बाहेर पडली नसती तर....? कल्पनाही थरकाप उडवते.

फायर एग्झिटला आधी आगीनं वेढलं कारण तिथं दोन्ही बाजूला खोकी रचून ठेवलेली होती.

एवढ्या मोठ्या ठिकाणी असलेला अग्नीसुरक्षेचा अभाव होता, हा क्रूर धक्का होता! मृत्यूचा सापळा असलेल्या अशा जागेला रेस्टॉरंटला परवानगी तरी कशी काय मिळाली?

(दरम्यान, रेस्टॉरंटने प्रसिद्धकेलेल्या निवेदनात अग्निसुरक्षा नियमांचं पालन केल्याचं, तसंच परवाना असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.)

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)