जपानच्या सुमो पहिलवानांचे हाल : ना सॅलरी, ना गर्लफ्रेंड

    • Author, रेबेका सीअल्स
    • Role, बीबीसी न्यूज

जपानी परंपरेत सुमो पहिलवानांना महत्त्व आहेच, पण सुमो पहिलवान म्हणून जगणं काही सोपं नाही. सुमो पहिलवानांसाठी वागणुकीचे अत्यंत कडक नियम आखले गेले आहेत.

सलग दोन-तीन वर्षं जिंकल्यावरच पहिलवानांचा पगार सुरू होतो. कनिष्ठ पहिलवानांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. त्यांना गर्लफ्रेंडपण असू नये, असाही नियम आहे.

प्रसिद्ध सुमो चॅम्पियन हारूमाफुजी यांनी नुकतीच स्वतःची निवृत्ती जाहीर केली. घोषणा करताना ते अर्धा मिनिट खाली मान घालून उभे राहिले आणि त्यांनी, "मी मनापासून सर्वांची माफी मागतो."

हारूमाफूजी हे काही महिन्यांपूर्वीपर्यंत सुमोचे ग्रँड चॅम्पियन होते. त्यांना जपानमध्ये 'योकोझुना' म्हणून ओळखलं जातं.

25 ऑक्टोबरला त्यांनी एका बारमध्ये ज्युनिअर पहेलवानाच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आणि जपानच्या वृत्तपत्रांनीही या बातमीला प्रसिद्धी दिली.

जपानी पारंपरिक कुस्तीचा प्रकार असलेला सुमो बेशिस्तीसाठी ओळखला जाऊ लागला. त्यामुळे हा राष्ट्रीय खेळ बदनाम झाला आहे. पण अशी घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही.

याआधीही एका प्रशिक्षाणार्थीला मोठ्या पहेलवानांनी बिअरच्या बाटल्या आणि बेसबॉलच्या बॅटने मारहाण केली होती. अवघ्या 17 वर्षांच्या त्या प्रशिक्षणार्थी पहेलवानाचा या मारहाणीत मृत्यू झाला. त्या वेळीही या प्रकरणावर देशभरातून चिंता व्यक्त करण्यात आली.

2010 मध्ये सुमो कुस्तीचं नाव अवैध सट्टेबाजाराशी जोडलं गेलं होतं. याचं कनेक्शन जपानच्या कुप्रसिद्ध यकुझा गॅंगशी असल्याचं त्या वेळी म्हटलं गेलं.

त्याच वर्षी हारूमाफुजींचे प्रशिक्षक 'द ग्रेट मंगोलियन चॅंपियन' असाशोरयू यांनी टोकियोतील एका नाइटक्लबबाहेर भांडण केल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

सुमोच्या शेवटच्या घटका?

सुमो खेळ आता आपल्याच भूमीवर शेवटच्या घटका मोजत आहे, असं तर या घटना दर्शवत नाहीत ना!

सुमो खेळ ओळखल्या जातो तो कडक शिस्तीसाठी. पण आता हीच शिस्त ढासळली आहे. किंवा असं तर नाही ना की, 15 शतकांनंतर या खेळाची काळी बाजू समोर येऊ लागली आहे?

सुमोची सुरुवात दीड-दोन हजार वर्षांपूर्वी जपानच्या मठांमध्ये झाली. पण आता सुमोच्या आखाड्यातली जपानी पहेलवानांची सद्दी संपली आहे. मग हे नवीन सुमो कोण आहेत?

मंगोलियन सुमोंचा बोलबाला

या आठवड्याअखेरपर्यंत चार सुमो ग्रँड चॅंपियन होते. हारूमाफुजी यांच्यासह त्यातील तीन पहेलवान हे मंगोलियन आहेत.

पूर्व युरोप, रशिया आणि हवाई यासारख्या ठिकाणांहून जपानमध्ये सुमोचं प्रशिक्षण घेण्यासाठी नवीन पहेलवान येत आहेत. एकेकाळी शाही दरबारांमध्ये थरार अनुभवयाला देणाऱ्या सुमो खेळाचं प्रशिक्षण किशोरावस्थेतच सुरू केलं जातं.

उगवत्या सूर्याच्या देशात सुमो हा फक्त खेळ नाही, तर ती एक परंपरा आहे. जपान्यांमध्ये या परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. सुमो पहेलवानांच्या वागणुकीचे अत्यंत कडक नियम जपानी सुमो परंपरेत आखले आहेत. तुमचा जन्म जपानबाहेर झाला असेल आणि तुम्हाला सुमो व्हायचं असेल, तरी या नियमांपासून सुटका नाही.

सर्व सुमो पहेलवानांना सार्वजनिक जीवनात वावरताना पारंपरिक वस्त्रं परिधान करावी लागतात. त्यांनी लोकांशी संवाद साधताना मितभाषी असावं. त्यांचं बोलणं मर्यादापूर्ण असावं. कुस्तीत विजय किंवा पराभव झाला, तरी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला पाहिजे, अशी तालीम त्यांना दिली जाते.

त्यांचा दराराच असा असतो की, ते जेव्हा रस्त्यावरून चालतात तेव्हा अनोळखी माणूसही त्यांना बघून अदबीनं मान झुकवतो.

जपानमध्ये सुमोचं प्रशिक्षण देणाऱ्या 45 तालमी आहेत. जपान सुमो असोसिएशनच्या नियमाप्रमाणं या सर्व तालमींमध्ये एकावेळी फक्त एकच परदेशी नागरिक सुमोचं प्रशिक्षण घेऊ शकतो.

तालीम आणि प्रशिक्षण

इथं केवळ 15 वर्षं वयाच्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो. फार झालं तर त्यांचं वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावं असा नियम आहे.

प्रवेश मिळाल्यानंतर ते जपानी भाषा बोलतात. जपानी पद्धतीचा आहार घेतात. जपानी वस्त्रं परिधान करतात. त्यांचं अवघं आयुष्यच जपानी होऊन जातं.

"सुरुवातीच्या प्रशिक्षण काळात ते कनिष्ठ योद्ध्यांसारखे असतात," सुमो तज्ज्ञ, माजी समालोचक आणि जपान टाइम्सचे स्तंभलेखक मार्क बकटन यांनी सांगितलं.

"ते जेवण तयार करतात. साफसफाई करतात. प्रत्येक जण जपानी भाषा शिकतो. ते फार खादाड असतात आणि जेवण झालं की, थेट झोपायला जातात. सुमो पहेलवान शक्यतो नाश्ता करत नाहीत. सकाळी ते फक्त सराव करतात."

तालमींची शिस्त अत्यंत कडक असते. नियोजनबद्ध कारभार असतो. तालमीचा मालक त्यानंतर वरिष्ठ पहेलवान आणि त्यानंतरची उतरंड यानुसारच सगळा कारभार इथं चालतो.

"तुम्ही त्या तालमीशी आयुष्यभर जोडले जाता. तालीम सोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही सुमो म्हणून तुमची कारकीर्द संपुष्टात आणायची," बकटन सांगतात.

प्रत्येक पहेलवान त्याचे केस वाढवतो. जेणेकरून तालमीचे केशकर्तनकार नंतर सुमो पद्धतीनं त्यांची हेअरस्टाईल करू शकतील. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा केस धुवावे लागतात.

"त्यांच्या जेवणात भातासोबत मांस आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणवर असतो. दुपारचं जेवण केलं की, ते वामकुक्षी घेतात. दुपारची झोप झाली की, पुन्हा संध्याकाळी जेवण करतात. आणि लवकर झोपी जातात," असं बकटन म्हणाले.

कामगिरी दाखवा पगार मिळवा

जपानमध्ये दरवर्षी सहा व्यावसायिक सुमो स्पर्धा होतात. खेळातील पराभवांपेक्षा विजयांच्या संख्येनुसार त्यांची बढती ठरलेली असते. सुमो मॅचमध्ये विजयी होण्यासाठी एक तर तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला रिंगणाबाहेर ढकलावं लागतं किंवा जमिनीला टेकवावं लागतं.

साधारणतः 650 पहेलवान लढतात. त्यापैकी जवळपास 60 पहेलवानांना वरच्या श्रेणीत प्रवेश मिळतो.

यादीतील तळात असलेल्या विजेत्यांना कुठलाच आर्थिक फायदा होत नाही. सलग दोन ते तीन वर्षं जिंकत गेल्यावरच पहेलवानांना पगार सुरू होतो. तिथपर्यंत पोहोचणं प्रत्येकाला शक्य नसतं.

पण जेव्हा तो या पायरीवर पोहोचतो, तेव्हा श्रेष्ठतेच्या क्रमानुसार प्रतिमहिना तब्बल 12 हजार डॉलर ते 60 हजार डॉलरपर्यंत पगार मिळतो. यात प्रायोजकत्वाचाही समावेश असतो. इतर भरपूर सवलती असतातच.

गर्लफ्रेंड नाही आणि मोबाईलपण नाही

कनिष्ठ पहेलवानांना थंडीतही पातळ सुती कपडे आणि लाकडी खडावा घालावी लागते. सुमो पहेलवानांना वाहन चालवण्यास बंदी असते. पण वरिष्ठ आणि उत्कृष्ट पहेलवानांकडे वाहनचालक असतात.

खासगी वाहनचालक नेमणं हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे आणि सुमो पहेलवानांची गरजही. कारण त्यांच्या पोटामुळे त्यांना स्टिअरिंग हाताळणं कठीण जातं.

श्रेष्ठता क्रमानुसार पहिल्या आणि दुसऱ्या गटातील पहेलवानांना वगळून इतरांना मोबाईल फोन ठेवण्यास बंदी आहे. त्यांना गर्लफ्रेंडपण असू नये. असा नियम आहे.

महिला तालमीमध्ये येऊ शकत नाहीत किंवा राहू शकत नाही. पहेलवान लग्न करू शकत नाही किंवा दुसऱ्या गटात पोहोचण्याआधी आपल्या पत्नीसोबत बाहेर जाऊ शकतं नाही.

यातही कडक नियम असा आहे की, जर एखादा पहेलवान जखमी झाला तर त्याचा श्रेष्ठता क्रम हा दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटात सरकतो. त्यानंतर त्याला आपली पत्नी आणि मुलाला सोडून तालमीमध्ये परत यावं लागतं.

एखादा प्रशिक्षणार्थी पहेलवान आपल्या गुरूंच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा काय होतं?

सुमोचे जाणकार मार्क बकटन सांगतात, "त्यांच्यासोबत फार वाईट होतं. 2007 मध्ये त्या मुलाच्या मृत्यूआधी सुमो पहेलवानांना मारहाणीच्या घटना सर्रास व्हायच्यात. त्यांच्या पाठीवर किंवा पोटरीवर दिसणारे वळच सगळं सांगायचे."

गेल्या वर्षी एका प्रशिक्षणार्थी पहेलवानाच्या डोळ्याला इजा झाली. त्याला 2 लाख 88 हजार डॉलरची नुकसानभरपाई द्यावी लागल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला होता.

मंगोलियन ग्रँड चँपियन हाकूहो यानं धक्कादायक खुलासा केला. "आज माझ्या विजयानंतरचा आनंदी चेहरा तुम्हाला दिसतो. पण एक वेळ अशी होती की मी रोज रडायचो."

"मारहाणीनंतर सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये फार दुखतं. त्यानंतर तुम्हाला सवय होते. तुम्हाला मारहाण होत असली, तरी नंतर तुम्हाला फारसं दुखतं नाही. मलाही मारहाण झाली होती. पण माझ्या वरिष्ठ पहेलवानांनी सांगितलं की, हे सगळं माझ्या भल्यासाठी सुरू आहे. मी फार रडलो होतो."

गोपनीयतेचा भंग करणं

इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या या खेळात एका कनिष्ठ पहेलवानाला मारहाण केल्यामुळं हारूमाफुजी यांच्यासारख्या वरिष्ठ पहेलवानाला आपली निवृत्ती का जाहीर करावी लागली?

"खरं तर त्याने एका बारमध्ये ही मारहाण केली होती..." मार्क बकटन त्यांच निरीक्षण नोंदवतात. आणि इथंच खरी अडचण आहे.

गेल्या तीन दशकांपासून सुमो खेळाचा अभ्यास करणारे लेखक ख्रिस गोउल्ड म्हणतात, या खेळात गोपनीयता पाळण्याबाबतचे नियम फार कडक आहेत. सुमो पंरपरा लोप पावत असण्याबद्दल आत्ताच सांगणं हे जरा घाईचं ठरेल. भविष्याविषयी साशंक होण्याची ही वेळ नाही. जपान सुमो असोसिएशनला हे समजून घ्यावं लागेल की सुमोंचं हित कशात आहे? आणि विरोधात कोण आहे?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)