You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हॉट्सअॅप का वापरतेस? सुनांना आता नवा सासुरवास
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
"पाया पडते सुनबाई, बंद कर तुझी चाल
पहिलं तुझं वाटसप चुली मंधी जाळ
रोज नवीन नवीन ड्रेस
नवं काढतीस फोटू...
रडून रडून उपाशीच
झोपून घेतो छोटू
डिपी का फीपी बदलण्याच्या नादात
करपून जाते डाळ
पहिलं तुझ वाटसप चुली मंधी जाळ…"
काही वर्षांपूर्वी फेसबुक, व्हॉट्सअॅपवर या कवितेनं धुमाकूळ घातला होता. बायकांनी कसं वागावं, आताच्या काळात त्या कशा बिघडल्या आहेत आणि सोशल मीडियापायी आपल्या जबाबदाऱ्या कशा टाळत आहेत, असं म्हणणाऱ्या लोकांनी हिरीरीनं ही कविता शेअर केली होती.
येता-जाता ही कविता ऐकवून आसपासच्या पोरींना टोमणे मारणं तर नित्यकर्मच झालं होतं. तुम्ही स्त्री असाल तर शक्यता आहे की असा एखादा टोमणा तुम्हालाही बसला असणार.
आजही अधूनमधून ही कविता सोशल मीडियावर दर्शन देतेच. हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशातल्या एका कुटुंबानं आपल्या मुलाचं लग्न मोडलं. कारण काय तर होणारी सून सतत व्हॉट्सअॅपवर असते.
2018 मध्ये उत्तर प्रदेशातल्या अमरोहा जिल्ह्यातल्या नौगाव सदत गावात मुलगी आणि तिचे घरचे वरातीची वाट बघत बसले, पण ना नवरा मुलगा आला ना वरात.
मुलाच्या वडिलांनी फोनवरूनच कळवलं की मुलगी व्हॉट्सअॅपवरचा अतिवापर करते म्हणून आम्ही लग्न मोडत आहोत. "मुलगी लग्नाआधीही सासरच्यांना मेसेज पाठवत राहायची. सतत व्हॉटस अॅपवर राहायची म्हणून हे लग्न नको, अशी भूमिका मुलाकडच्यांनी घेतली," अमरोहाचे पोलीस अधीक्षक विपिन ताडा यांनी मीडियाला सांगितलं.
कदाचित लग्न मोडायची कारणं वेगळीही असतील. मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे की त्यांनी हुंड्यावरून लग्न मोडलं.
पण तरीही मुलगी व्हॉट्सअॅप वापरते हे कारण जाहीरपणे सांगून लग्न मोडण्याचं धाडस मुलाकडच्यांना होतं यावरूनच आपल्याकडे अजूनही सोशल मीडिया, विशेषतः व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या मुलींकडे कसं पाहिलं जातं हे समजतं.
मुलींना काय करायचं व्हॉट्सअॅप?
अगदी लग्न मोडण्यापर्यंत गोष्टी जात नसल्या तरी घरोघरींच्या सासुरवाशिणींना व्हॉट्सअॅपपायी होणारे त्रास कमी नाहीत.
"एक वेळ अशी आली होती की मला मोबाईल उचलायचीही भीती वाटत होती," शीतल (नाव बदललं आहे). शीतलच लग्न झालंय आणि तिला एक मुलगीही आहे.
"माझे मिस्टर तसे उच्चशिक्षित आहेत, पण त्यांना माझं व्हॉट्सअॅप वापरणं अजिबात आवडत नाही. त्यावरून ते सतत माझ्याशी भांडण करायचे.
माझ्या सासूबाईही म्हणायच्या की, त्याला आवडत नाही तर कशाला वापरतेस मोबाईल. परिस्थिती अशी होती की ते घरात असताना ते मोबाईल पाहतील पण मी मोबाईलला अजिबात हात लावलेला चालायचा नाही. व्हॉट्सअॅप पाहाणं तर फारच लांबची गोष्ट.
बायकांना मुळात व्हॉट्सअॅपची गरजच काय असं त्यांचं म्हणणं. त्यावरून मला खूप त्रास झाला. पण एक दिवस ठरवलं की, आता बास!
विरोध केला नाही तर हे वाढतच जाणार. मग मी व्हॉट्सअॅप वापरायला लागले, फेसबुक वापरायला लागले. त्यांना राग आला. त्यांनी माझ्या घरच्यांना फोन केले. आईला, वडिलांना. एकदा तर सासरचे माहेरची अशी मीटिंग बसवली. कारण काय तर फक्त माझं व्हॉट्सअॅप.
एकदा माझा फोन खराब झाला. दीड वर्ष माझ्याकडे चांगला मोबाईल नव्हता. मी साधा 1100 रूपयांचा फोन वापरायचे. शेवटी माझ्या भावाने मला फोन घेऊन दिला. त्याचा राग धरून ते अजून माझ्या भावाशी बोलत नाहीत. आता काय म्हणावं?"
शीतल भडाभडा सांगत असते. पुण्यापासून काही अंतरावर तिचं शहर. नवरा रात्री उशिरा येणार असेल तर त्याची वाट पाहता पाहता पण व्हॉट्सअॅप पाहायची परवानगी नाही तिला. "ते येता येताच माझं लास्ट सीन चेक करतात. मी ऑनलाईन दिसले की भांडण."
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार भारतात सुमारे 20 कोटी व्हॉट्सअॅप युझर्स आहेत. ही संख्या सतत वाढतच आहे. एका बाजूला व्हॉटस अॅपवरून पसरणाऱ्या अफवा माणसांचे जीव घेत असताना दुसऱ्या बाजूला अशा असंख्य महिला आहेत ज्यांना संवादाची ही नवीन माध्यमं वापरण्याची परवानगी नाही.
पुण्यात राहाणाऱ्या भावना बाथियाचा अनुभव शीतलइतका वाईट नसला तरी तिला व्हॉट्सअॅप वापरण्यावरून बोलणी खावी लागली आहेतच.
"लग्नाआधी मी आईची अनेकदा बोलणी खाल्लेली आहेत. ती म्हणायची की नुसती व्हॉट्सअॅप वापरत बसशील तर लग्नानंतर कसं होईल तुझं?"
बायका त्यांची काम सोडून, घरातल्या जबाबदाऱ्या टाळून व्हॉट्सअॅपवर टाईमपास करतात असा एक आक्षेप आहे. पण तो तितकासा खरा नाही.
मुली सहसा त्यांना जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हाच फोन पाहातात. बाकी काम सोडून त्या दिवसभर नुसता फोनवर टाईमपास करतील असं नाही वाटत मला," भावना सांगते.
या मुलींचा आक्षेप आहे की सोशल मीडिया वापरणाऱ्यावरून मुलांना कोणी काही बोलत नाही, पण मुलींना मात्र अनेक बंधनं घालतात.
काय बिघडतं मुलींनी व्हॉट्सअॅप वापरलं तर?
स्त्री-पुरूष समानतेच्या लढ्यातले कार्यकर्ते असणारे आनंद पवार सांगतात, "कुठलीही नवी टेक्नोलॉजी आपल्याकडे आली की तिचा उपयोग स्त्रियांना अधिपत्याखाली ठेवण्यासाठी कसा करता येईल यासाठीच करतो आपण. पुरुषप्रधान व्यवस्थेकडून दुसरी अपेक्षाही नाही."
ते पुढे म्हणतात, "ही व्यवस्था दोन स्तरावर काम करते, एक म्हणजे या नव्या टेक्नोलॉजीला बायकांच्या हाती लागू द्यायचं नाही. हे व्हॉट्सअॅपवर बंदी घालणारे फतवे, मुलींच्या हाती मोबाईल फोन देऊ नका असे खाप पंचायतींनी काढलेले आदेश त्याचंच द्योतक.
दुसरं म्हणजे, ती टेक्नोलॉजी त्यांच्या हातात तर द्यायची पण त्यावर हजारो चौक्यापहारे बसवायचे.
मी असे भाऊ बघितलेत जे बहिणींना दर अर्ध्या तासाने आपलं लोकेशन व्हॉट्सअॅपवर पाठवायला सांगतात. आणि असे बापही बघितलेत जे मुलींच्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड आपल्याकडे ठेवतात. म्हणून व्हॉट्सअॅप नको. कारण त्याने कदाचित बाहेरच्या जगाची दारं उघडतील."
"व्हॉट्सअॅपने बाहेरच्या जगाची माहिती कळते. पुरूषांना वाटतं की घरात बसवलं की बायकांना बाहेरचं काही कळणार नाही. त्या पुरूषांवरच अवलंबून राहातील.
पण व्हॉट्सअॅपने बाहेरचं जग कळतं. चांगलं वाईट समजतं. इतकंच काय, त्यांना स्वतःचे हक्कही कळतात. उद्या घरात त्यांच्यावर अन्याय झाला तर कुठे जायचं, कुठे दाद मागायची हेही त्यांना लक्षात येतं. म्हणून घरच्यांची इच्छा नसते की बायकांनी व्हॉट्सअॅप वापरावं," शीतल पोटतिडीकेनं सांगते.
चौक्या-पहारे बसवता आले नाही की थट्टा उडवणार
सध्या नवरात्राचे दिवस आहेत. या काळात मोबईलमध्ये हमखास थडकणारा मेसेज म्हणजे, "बायकांनो, कधी विचार केलाय, देवी अख्ख्या विश्वाचा पसारा सांभाळते आणि तुमच्याकडून एक घर सांभाळलं जात नाही? असं का? निरखून बघा, देवीला नऊ-नऊ हात आहेत, पण एकातरी हातात मोबाईल दिसतोय का?" मेसेज संपला की पुढे दात विचकणारे इमोजी.
असे असंख्य मेसेज फिरतात व्हॉट्सअॅपवर. उदाहरणच द्यायचं झालं तर हा दुसरा, बायकांनी गुपचूप स्वयंपाकघरात जावं हे सांगणारा.
मुळची इगतपुरीची असणारी पण आता नाशिकमध्ये शिकणाऱ्या सुनिता साठेला असे मेसेज अजिबात आवडत नाहीत. "असे मेसेज लोक फॉरवर्ड करतात आणि मग सगळ्यांना वाटतं की मुलींनी व्हॉट्सअॅप वापरुच नये. मुलांना कोणी असे प्रश्न विचारत नाही पण.
दिवसभर जरी ते मोबाईलवर व्हीडिओ पाहात बसले तरी त्यांना सगळं माफ. त्यांना कोणी म्हणत नाही की व्हॉट्सअॅपवर टाईमपास केला तर उद्या लग्न कोण करणार तुझ्याशी."
लोकांचं ऐकलं नाही आणि आपल्या मनाचं करायचं ठरवलं की लोक टोमणे मारतात असं तिला वाटतं. "काही लोकांना वाटतं यांच्या घरचे कसे या मुलींना सोशल मीडिया वापरू देतात?
मग ते आम्हाला कमी दाखवण्यासाठी असे बायकांना टोमणे मारणारे जोक फॉरवर्ड करत बसतात."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)