सेल्फीच्या वेडापायी जगभरात आतापर्यंत 259 मृत्यूंची नोंद

2011 ते 2017 या काळात सेल्फी घेण्याच्या नादात 259 लोकांनी आपला जीव गमावल्याचं एका जागतिक एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.

US National Library of Medicineच्या संशोधकांनी धोकादायक स्थळांवर सेल्फी घेण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. त्यात उंच पर्वत, गगनचुंबी इमारती, तलाव अशा ठिकाणांचा समावेश आहे. कारण अशा ठिकाणांवर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

बुडून मृत्यू, वाहतुकीमुळे झालेले मृत्यू आणि उंचावरून पडून झालेले मृत्यू ही महत्त्वाची कारणं यामागे सांगितली जात आहेत. पण यात प्राण्यांच्या हल्ल्यात, विजेच्या धक्क्यात, गोळीबारात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही बरंच होतं.

यावर्षी जुलै महिन्यात 19 वर्षीय गॅविन झिमरमॅन ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्समध्ये एका कड्यावर सेल्फी घेत होता, तेव्हा त्याचा मृत्यू झाला.

कॅलिफोर्नियातील योस्माईट नॅशनल पार्कमध्ये सप्टेंबर महिन्यात टोमेर फ्रँकफर्टर या इसमाचा मृत्यू झाला. सेल्फी घेण्याच्या नादात 250 मी अंतरावर खाली कोसळले.

जानेवारी महिन्यात पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या पारनाका किनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. सेल्फी काढण्याच्या नादात सगळे विद्यार्थी बोटीत एकीकडे आले नि बोट उलटली, अशी प्राथमिक माहिती होती लागली होती.

अशा प्रकारच्या बातम्या एकत्रित करून हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

भारत, रशिया, अमेरिका आणि पाकिस्तान या देशांत सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. मृतांपैकी 72.5% पुरुष आहेत.

यापूर्वी हे सर्वेक्षण विकिपीडिया आणि ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. पण संशोधकांना त्यातून योग्य ते परिणाम मिळाले नाहीत.

नवीन सर्वेक्षणानुसार मृतांचा आकडा वाढल्याचंही समोर आलं आहे. 2011 मध्ये हा आकडा फक्त 3 होता. 2016 मध्ये हा आकडा 98 होता तर 2017 मध्ये हाच आकडा 93 होता.

पण संशोधकांच्या मते हा आकडा जास्त असू शकतो. सेल्फी हे मृत्यूचं कारण असू शकतं, हे तेव्हा कुणीही ध्यानात घेत नाही.

सेल्फीमुळे होणारे मृत्यू फारसे कुणी ध्यानात घेत नाही. मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं.

"रस्त्यावर सेल्फी घेताना अपघाती मृत्यू झाला तर मृत्यूच्या कारणाची नोंद रस्ते अपघात म्हणून होते, सेल्फीचा उल्लेख नसतो. त्यामुळे या मृत्यूंचं महत्त्व जाणवत नाही. म्हणूनच या मृत्यूंच्या मागची कारणं आणि उपाय शोधण्याची गरज आहे," असं या अहवालात म्हणण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)