एका दिवसात तो 200 सेल्फी काढतो! कायच्या काय!

    • Author, बेला शाह
    • Role, न्यूजबीट प्रतिनिधी

जुनैद अहमदचे इन्स्टाग्रामवर 50,000 फॉलोअर्स आहेत आणि तो दिवसाला तब्बल 200 सेल्फी काढतो आणि "सेल्फीग्रस्त" झाल्याचं तो मान्य करतो.

हे सेल्फी सोशल मीडियावर कधी अपलोड केले म्हणजे जास्तीतजास्त लाइक्स आणि शेअर मिळतील, हे लक्षात आल्यावर त्याने तसे फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली. कुठल्याही फोटोवर 600 पेक्षा कमी लाइक्स असतील तर तो फोटो सरळ डिलीट करून टाकतो.

"मी जेव्हाही फोटो अपलोड करतो तेव्हा काही मिनिटांत शेकड्यानं लाइक्स मिळतात. मला ते प्रचंड आवडतं. माझा फोन सतत वाजत असतो. ते भारी वाटतं," असं जुनैदनं सांगितलं.

एका संशोधनानुसार सेल्फीचं वेड ही खरोखरंच एक समस्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला Selfitis असं म्हटलं जातं.

सेल्फी काढण्याची ओढ आणि दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा हे सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करण्याची हौस हा 'Chronic Selfitis' असल्याचं नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठ आणि त्यागराज स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधील संशोधकांचं म्हणणं आहे.

जुनैद मान्य करतो की त्याच्या सेल्फी काढण्याच्या हौसेपोटी आप्तस्वकीयांशी त्याचं अनेकदा पटत नाही.

"ते मला म्हणतात, 'तुला गुपचुप जेवता येत नाही का? प्रत्येक वेळी फोटो का काढायचे?'"

"आणि माझं उत्तर असतं - 'नाही. मी उगाच तयार होण्यासाठी तीन-चार तास नाही घालवले.' फोटो न घेता मी कसा राहू शकतो?"

फोटोखालच्या नकारात्मक प्रतिक्रियांनी पूर्वी मला वाईट वाटायचं. पण आता मला त्यांनी फारसा फरक पडत नाही.

आपला चेहरा विशिष्ट पद्धतीने दिसावा, यासाठी आपण त्यावर काम केल्याची कबुली जुनैदने दिली.

"खूप वर्षांपूर्वी मी वेगळाच दिसायचो, खूपच साधारण आणि नैसर्गिक. पण सोशल मीडियाचं वेड लागल्यानंतर गोष्टी बदलल्या. आता मला स्वतःला सतत बदलावंसं वाटतं."

"मी माझ्या दात, हनुवटी, गाल, जबडा, ओठ आणि डोळ्यांखालच्या भागात बदल करून घेतलेत. भुवयांना टॅटू करून घेतलाय आणि शरीरातली चरबीही कमी करवून घेतलीये."

जुनैद सांगतो की सोशल मीडियावरच्या टीकेला आणि नकारात्मक गोष्टींना सामोरं कसं जावं, कारण याची आता त्याला कल्पना आहे. "पण मी सोशल मीडियावरच्या गोष्टी तितक्या गांभीर्याने घेत नाही. तिथे सगळंच खरं नसतं."

"योग्य पद्धतीने वापरलं तर सोशल मीडियावर धमाल येऊ शकते. पण इन्स्टाग्रामवरच्या एखाद्या व्यक्तीसारखं दिसण्या-बनण्याच्या भानगडीत तुमच्या आयुष्याला फार फरक पडू देऊ नका. त्यात काहीही अर्थ नाही."

मला त्यात सहभागी व्हायचं होतं

23 वर्षांच्या डॅनी बोमनला टीनएजमध्ये सेल्फी घेण्याचं वेड होतं. "मला त्या जगात वावरायचं होतं. आणि त्यासाठी माझं सगळ्यांत चांगलं दिसणं फार आवश्यक होतं."

तो सेल्फी काढल्यानंतर त्यात काही चूक तर राहिली नाहीये ना, याची खात्री करण्याची सवयही लागली. सेल्फी काढायचा आणि त्यांतल्या त्रुटी पाहायच्या, असं मग एक दुष्टचक्रच सुरू झालं.

अशा सेल्फी काढण्यातच त्याचे दिवसाचे दहा-दहा तास जायचे, दररोज!

सोळा वर्षांचा असताना डॅनीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला एका पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं जिथे त्याला त्याच्या शरीराच्या बांधणीबद्दल काहीतरी वेगळं वाटण्याचा रोग असल्याचं निदान झालं. साहजिकच सोशल मीडियाने यात मोठी भूमिका बजावल्याचं डॅनी सांगतो.

डॅनी आता विद्यापीठात शिकतो आणि तरुण मुलांना मानसिक आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करतो.

"मी तासनतास विचार करत बसायचो की या सेल्फीवेडातून बाहेर कसं पडायचं. मला असं वाटायचं की यातून मी बाहेरच पडू शकणार नाही."

"आता मी इन्स्टाग्रामवर फोटो टाकतो, पण त्यात सेल्फी नसतात. मी लोकांशी बोलतानाचे किंवा भाषण करतानाचे फोटो असतात," तो सांगतो.

"या फोटोंमधून मला जास्त आनंद मिळतोय. सेल्फीस टाकून लाइक्सची भीक मागत बसण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे. आता हे जग किती वेगळं आणि समाधानकारक आहे, ते कळतं."

एखादी व्यक्ती दोन तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत असेल तर फोनवर इशारा देणारी सूचना यावी, अशी मागणी 'द रॉयल सोसायटी ऑफ पब्लिक हेल्थ (RSPH)'ने सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना केलं आहे.

"मात्र त्याच वेळी, दहापैकी सात किशोरवयीन मुलांनी कठीण परिस्थितीत सोशल मीडियावर आधार मिळाल्याचं," असं RSPHचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्ली क्रॅमर यांनी सांगितलं.

नैराश्य आणि अस्वस्थता यांना सोशल मीडियामुळेच खतपाणी मिळतं, असं त्यांनी पुढे सांगितलं.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)