बकरीला वाचवण्यासाठी वाघाला भिडली आणि सेल्फीही घेतली

    • Author, संजय रमाकांत तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

वाघाशी दोन हात केल्यानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या आणि रक्तानं माखलेल्या मुलीनं घरात आल्यावर काय केलं असेल? आपला मोबाईल काढला आणि नंतर आपल्या जखमी आईसोबत सेल्फी घेतल्या.

कारण की वाघ अजूनही बाहेर होता. सुरक्षेची गॅरंटी नव्हती म्हणून तिनं त्यावेळेसची परिस्थिती टिपण्यासाठी स्वतःसह आईला कॅमेऱ्यात सुरक्षित कैद करणं पसंत केलं.

21 वर्षांची कॉमर्स पदवीधर रुपाली मेश्राम ही एक सडपातळ प्रकृतीची सर्वसामान्य ग्रामीण मुलगी आहे.

सामान्य कुटुंबातल्या या मुलीच्या डोक्यावर, हातापायावर आणि कमरेवर जखमांच्या खुणा आहेत. डोकं आणि कमरेवरची जखम खोल असल्यानं टाके सुद्धा पडलेत.

नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या परिसरात तिनं आपलं डिस्चार्ज कार्ड दाखवलं. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, जखमांचं कारण - वाघाचा हल्ला.

एका काठीनं केला वाघाचा मुकाबला

पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातल्या उसगावात रुपालीचं एक छोटं घर आहे.

तिची आई जीजाबाई आणि मोठा भाऊ हे वनविभागात मजूर म्हणून कामाला जातात.

त्याशिवाय या कुटुंबाकडे काही बकऱ्याही आहेत. ज्यातून काहीतरी कमाई होईल हा त्यामागचा उद्देश.

त्यामुळेच 24 मार्चच्या रात्रीला जेव्हा बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा रुपालीनं काय झालं, म्हणून एवढ्या रात्री दरवाजा उघडला.

अंगणात बांधलेली बकरी रक्तानं माखली होती आणि अंधारात एका वाघाची आकृतीही दिसत होती. हे दृष्य पाहून रुपाली बकरीचा जीव वाचवण्यासाठी तिकडे धावली.

तिनं बकरीपासून वाघाला दूर करण्यासाठी जवळच पडलेली काठी उचलली आणि वाघावर हल्ला केला. ती सांगते, काठीचा मार पडताच वाघानं तिच्यावर हल्ला केला.

"त्याच्या पंजाच्या मारानं माझ्या डोक्यातून रक्ताची धार लागली. तरीसुद्धा मी त्याच्यावर काठीनं वार करतच राहीले. मी आईला आवाज दिला. अंगणात वाघ आला असं तिला ओरडून सांगितलं."

रुपालीच्या आई जीजाबाई सांगतात, "रुपालीची किंचाळी ऐकल्यावर मी जेव्हा धावत बाहेर आले तेव्हा रुपालीचे कपडे रक्तानं माखले होते. मला वाटलं आता ती जिवंत राहते की नाही. तिच्यासमोर वाघ होता. मी पण तिथलंच लाकूड उचलून वाघावर दोन वेळा हल्ला केले. त्यानं माझ्या उजव्या डोळ्याजवळ पंजानं वार केला. पण या गडबडीत कसं तरी मी रुपालीला घरात आणण्यात यशस्वी ठरले. मी लगेचच घराचा दरवाजा लाऊन घेतला. छोटीशी वस्ती असल्यानं आमच्याकडे घरं दूरदूर आहेत. त्यामुळेच कदाचीत आमचा आवाज कुणालाही ऐकू गेला नसावा."

त्याचवेळी रुपालीनं असं काही तरी केलं ज्याची अशा स्थितीत कुणी कल्पनाही करू शकणार नाही. तिनं झटकन मोबाइल घेतला आणि आईसोबत काही सेल्फी घेतल्या.

'वाटलं आता जिवंत राहणार नाही'

ती याचं कारण सांगते, "वाघ त्यावेळीही घराबाहेरच होता. आमची वाचण्याची कुठलीच शक्यता वाटत नव्हती. माझ्या डोक्यातून आणि कमरेतून रक्त वाहतच होतं. कपडे सगळे रक्तानं माखले होते. अशावेळी आमच्यावर जो प्रसंग गुदरला त्याचा रेकॉर्ड मी ठेऊ इच्छित होते. आईनं लोकांना फोन लावण्याचा सल्ला दिला.

मी काही लोकांना फोन करून सांगितलही. यात एक वन कर्मचारी पण होते जे अर्ध्या तासानंतर तिथं पोहले. आम्ही सुद्धा घराबाहेर आलो. पण तोपर्यंत वाघ निघून गेला होता."

रुपाली पुढे सांगते, "माझा श्वास फारच असमान्य पद्धतीनं सुरू होता. वाटत होतं की मी आता इथच पडणार. गावातल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं आम्हाला रुग्णवाहिका मागवून तालुक्याच्या रुग्णालयात नेण्यात आलं.

तिथं माझ्या जखमांवर टाके घालण्यात आले. नंतर आम्हाला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. दोन दिवसानंतर नागपूरच्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं. इथं एक्स-रे, सोनोग्राफीसह इतर चाचण्या करण्यात आल्या."

मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं असलं तरी याच महन्यात पुन्हा दोन वेळेस तपासणीसाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे.

रुग्णालयातल्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी सांगितलं की, आता दोघींच्या जखमा भरत आहेत. पण त्यांच्या जखमा पाहून आपण कल्पना करू शकतो की, त्यांनी वाघाशी दोन हात करताना आपल्या शौर्याचा परिचय सुद्धा दिला. सुदैवानं वाघाच्या जबड्यातून स्वतःला वाचवण्यात त्या यशस्वी ठरल्या. रेबीज आणि त्यासारख्या इतर आजारांपासून वाचण्यासाठी त्यांना पुरेश्या औषधींची मात्रा देण्यात आली आहे.

पण, समस्या इथंच संपत नाही. मागील दहा दिवसांपासून आई आणि भाऊ कामावर जाऊ न शकल्यानं आर्थिक समस्या त्यांच्या समोर आ वासून उभी आहे.

रुपाली म्हणते माजी खासदार शिशुपाल पटले यांनी फोन करून आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

आम्ही पटले यांना मदतीविषयी फोनवर विचारलं तेव्हा त्यांनी मेश्राम कुटुंबाला वन विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राज्याच्या वनमंत्र्यांशी संपर्क साधल्याची माहिती त्यांनी दिली.

या शूरवीर मुलीला वन विभागातच नोकरी मिळाली तर त्यांना आनंद होईल, असंही त्यांनी सांगितलं.

घरी परतण्याची भीती वाटते का?

पण सगळ्यांत मोठा प्रश्न अजूनही अन्नुतरीत आहे. फक्त एक काठी हातात घेऊन जेव्हा ती वाघासमोर उभी ठाकली तेव्हा रुपालीच्या मनात काय सुरू होतं?

रुपालीच्या डोळ्यात पून्हा कठोर भाव जागे होतात. ती सांगायला लागते, "एकाक्षणी तर मला असं वाटलं की, मी आता वाचू शकणार नाही. पण मी स्वतःला बजावलं, मला हारायचं नाही. मी जिंकणारचं."

घरी परतण्याविषयी भीती किंवा शंका वाटते का?

तिचं उत्तर होतं, "चिंता वाटू शकते. पण भीती नाही. मी आता आयुष्यात कधीही कुठल्याही वाघाला घाबरणार नाही."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)