'इवल्याशा चिमुरडीला पाहिलं आणि दहा गर्भपातांचा क्षीण दूर झाला'

    • Author, दर्शन ठक्कर आणि जयदीप वसंत
    • Role, बीबीसी गुजराती साठी

"जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या बाळाला हातात घेतलं, मी माझं सगळं दुःख, त्रास आणि निराशा विसरले. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले."

हे शब्द आहेत 36 वर्षांच्या शीतल ठक्कर यांचे. दहा वेळा गर्भपात झाल्यानंतर त्यांचं आई होण्याच स्वप्न पूर्ण झालं आहे.

अनेक वर्षांची निराशा आणि प्रतीक्षेनंतर शीतल गरोदर राहू शकल्या. इनव्हिट्रो फर्टिलाझेशन (IVF) या उपचारांमुळे त्या आई होऊ शकल्या आहेत.

सहसा कोणतीही स्त्री दोन ते चार वेळा IVF केल्यानंतर गरोदर राहू शकते. पण शीतल यांना मात्र तब्बल 25वेळा IVF ट्रीटमेंट घ्यावी लागली.

त्यांना वाटतं की एवढं थांबल्याचं त्यांना फळ मिळालं आहे. बाळाचा जन्म त्यांच्यासाठी 'लकी' ठरला आहे, असं त्या म्हणतात. कारण बाळाच्या जन्मानंतर लगेचच त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली.

आपल्या मागे भक्कमपणे उभे राहिलेला नवरा, कुटुंब, डॉक्टरांना यांनी त्या याचं श्रेय देतात.

पण डॉक्टरांना मात्र शीतल यांचा संयम, जिद्द आणि चिकट यामुळे त्यांची ट्रीटमेंट यशस्वी झाली असं वाटतं.

शीतल खरंतर सरोगसी किंवा मुलं दत्तक घेऊन आई बनू शकत होत्या पण काही 'विशिष्ट कारणांसाठी' स्वतःच आई होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

प्रयत्नांची ती सहा वर्ष

शीतल आणि प्रणव ठक्कर यांचं लग्न 2006 साली झालं. शीतल जामखांमबालियाच्या आहेत तर प्रणव जामनगरचे.

लग्नाच्या तीन वर्षानंतरही पाळणा हलला नाही म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्या तीन वर्षांतही या दांपत्याने होमिओपॅथिक, आयुर्वेदिक तसंच काही अॅलोपॅथिक औषधं घेतली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

2012 साली त्यांनी ठरवलं की मूल हवं असेल तर IVF ट्रीटमेट घ्यायला हवी. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

ठक्कर दांपत्यावर उपचार करणारे डॉ. हिमांशू बाविशी सांगतात, "सहसा IVF चे 2-3 सायकल्स झाल्या की स्त्रीला गर्भधारणा होते आणि पुढे बाळ जन्माला येतं. पण शीतलच्या बाबतीत तसं झालं नाही."

ही प्रक्रिया सहा वर्ष चालली. डॉ बाविशींच्या मते असं अपवादानेच घडतं. त्यांना 25 IVF सायकल्स घ्यावी लागली आणि एवढंच नाही तर त्यातल्या 10 वेळा त्यांचा गर्भपात झाला.

या खडतर काळात, एकदा गर्भाची व्यवस्थित वाढ होऊ लागली होती. मात्र हा गर्भ फॉलोपिअन ट्यूबमध्ये वाढत होता. आईचा जीव सुरक्षित राहण्यासाठी डॉक्टरांनी गर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

शीतल म्हणाल्या, "तो काळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेदनादायी होता. परंतु नवरा आणि घरच्यांनी माझी खूप काळजी घेतली. बाळासाठी प्रयत्न करत राहण्यासाठी त्यांनी मला पाठिंबा दिला. IVF उपचारादरम्यान फेलोपिआन ट्यूबमध्ये गर्भ विकसित होणं अगदीच दुर्मीळ आहे. मात्र माझ्या बाबतीत ते घडलं. त्यामुळे मला आणखी वेदनांना सामोरं जावं लागलं. माझा धीर सुटत चालला होता. हे सगळं माझ्याचबाबतीत का घडतंय असा प्रश्न मला पडत असे."

त्या आठवणी शीतल यांचे पती प्रणव यांनी जागवल्या. IVF प्रक्रिया आम्ही अंगीकारली. मात्र त्याने गर्भधारणा होईलच असं सांगता येत नाही. जेव्हा शीतल गरोदर राहिली, तेव्हा तिचा गर्भपात करावा लागला. ते खूपच अस्वस्थ करणारं आणि निराशेचं होतं, असं ते सांगतात.

ते पुढे सांगतात, "प्रत्येक गर्भपातानंतर आम्ही एकमेकांना धीर द्यायचो. मी तिला संयम ठेव सांगून तिला प्रोत्साहन देत होतो. तिच्या व्यक्तिमत्वातल्या सकारात्मक ऊर्जेने मला प्रेरणा मिळत असे."

डॉ. बाविशी यांनी ही अवघड प्रकिया उलगडली. IVF सायकल आणि गरोदरदरम्यान सगळे रिपोर्ट नॉर्मल असूनही ती बाळाला जन्म देऊ शकत नव्हती. शीतलची केस वेगळी होती. गर्भपाताच्या नेमक्या कारणापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही.

डॉ. बाविशी गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहेत. एखाद्या दांपत्याला 25 IVF सायकल्स कराव्या लागण्याची त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतली पहिलीच वेळ आहे.

आणि तो दिवस उगवला

सहा वर्षांची खडतर प्रतीक्षेनंतर 15 ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता शीतलने एक गोंडस मुलीला जन्म दिला.

प्रणव सांगतात, शीतलला लेबर रूममध्ये नेण्यात आलं. मी आणि आई बाहेर उभे होतो. त्याबाहेरच्या कक्षात बाकी नातेवाईक मंडळी आतुरतेने वाट बघत होती.

त्यावेळी भावभावनांचे हिंदोळे मनात फेर धरून होते. तितक्यात एक लहानग्या मुलीचं ट्यॅहँ कानावर आलं आणि मी भानावर आलो. आम्ही अत्यानंदाने ओरडू लागलो. हृद्यात खूप उचंबळून आलं.

सिस्टर लेबर रूममधून बाहेर आल्या आणि त्यांनी माझ्या हातात त्या चिमुरडीला ठेवलं. त्या म्हणाल्या, "शीतलने सांगितलं आहे की बाळाला तिच्या बाबांच्या हातात द्या. त्यांनी अनेक वर्ष तिची वाट पाहिली आहे."

इवल्याश्या लुकलुकत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहणाऱ्या चिमुरडीला पाहून मी नि:शब्द झालो. कसं व्यक्त व्हावं तेच मला कळेना. मग मी देवाचे आभार मानले. आमच्या प्रार्थना देवाने ऐकली होती, प्रणव सांगतात.

पंक्ती, असं त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं. 37 आठवड्यांचं गरोदरपण आणि सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिचा जन्म झाला. तिचं वजन 2.7 किलोग्रॅम होतं.

पंक्ती या जगात आली तो दिवस होता 15 ऑगस्ट-भारताचा स्वातंत्र्यदिन. अख्खा देश 72वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत होता तेव्हा प्रणव-शीतल या दांपत्याची सहा वर्षांची प्रतीक्षा फळला आली होती.

माझे दहा गर्भपात का झाले?

मूल दत्तक घेण्याचा किंवा सरोगसीचा पर्याय तुम्ही का स्वीकारला नाहीत असं विचारलं असता शीतल काहीशा रागावून म्हणाल्या, "मी तेव्हा फक्त 30 वर्षांची होते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी अगदीच फिट होते. मी चाळीशी गाठली असती तर मूल दत्तक घेण्याचा विचार केला असता. मला सरोगसीची आवश्यकता आहे असं डॉक्टरांनी मला सांगितलं नाही."

मी बाळाला जन्म देईन आणि खऱ्या अर्थाने मातृत्व अनुभवेन. अवघड आणि वेदनादायी असली तरी या प्रक्रियेला सामोरी जाईन असं ठरवलं होतं. मला त्याची चिंता नव्हती. चांगलंच होईल असा मला विश्वास होता, असं त्या सांगतात.

मी चिकाटी सोडली नाही याचा मला आनंद आहे, असं त्या म्हणाल्या.

माझ्या पोटात बाळ वाढतंय ही भावनाच सुखावणारी आहे. लहानग्या बाळाचे पाय माझ्या पोटाला लाथा मारत असल्याचा अनुभव अनोखा असतो, असं त्या सांगतात.

या सगळ्या प्रक्रियेनं मी माणूस म्हणून आणखी सकारात्मक होत गेले. कारण त्या बाळाला मीच सकारात्मक ऊर्जा पुरवणार होते. मला माझ्या आहारावर नियंत्रण ठेवायचं होतं. बाळाच्या तब्येतीसाठी जे करणं आवश्यक होतं ते मी केलं, त्या त्यांचा अनुभव सांगत होत्या.

मी सरोगसीचा पर्याय निवडला असता तर मला थेट बाळच हातात मिळालं असतं. मला माझ्या बाळाला स्तनपान करता आलं नसतं. मला बाळाला दूध पाजायचं होतं, त्या सांगतात.

आज जेव्हा पंक्ती माझ्याकडे पाहून झेपावतो ते अनुभवणं विलक्षण असतं. तो जगातला सर्वोत्तम आनंद आहे. आयुष्यातल्या माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यासारखं वाटतं. पंक्तीचा जन्म झाला. तिला पहिल्यांदा हातात घेतलं तो क्षण माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. सोनोग्राफीदरम्यान जन्माला येणाऱ्या बाळाचा चेहरा पुसटसा पाहिला होता. ती किंवा तो कसा असेल याबद्दल मी सतत विचार करत असे, असं त्या म्हणाल्या.

सातव्या महिन्यातलं संकट

असंख्य IVF सायकल्स आणि 10 गर्भपातानंतर शीतल गरोदर राहिल्या. त्याआधीच्या वेळी तिसऱ्या महिन्यात गुंतागुंत होत असे. मात्र तिसरा महिना सुरळीतपणे पार पडला. शीतल आणि बाळाची तब्येत चांगली होती.

प्रणवचा जन्म 37 वर्षांपूर्वी ठाकर कुटुंबात झाला होता. प्रवण हाच कुटुंबातला तरुण व्यक्ती होता. आता इतक्या वर्षांनंतर प्रणव यांची पत्नी गरोदर होती, जेणे करून ठाकर कुटुंबात खूप वर्षांनंतर नवा पाहुणा दाखल होणार होता.

प्रणवचे बाबा आणि शीतलचे सासरे कांतीभाई कॉलेजात प्रोफेसर होते. निवृत्तीनंतरचं आयुष्य ते जगत आहेत. ते कुटुंबाचे प्रमुख आहेत. सूनबाई शीतल त्यांची लाडकी आहे. या सगळ्या अवघड काळात कांतीभाईंना पक्षाघाताचा झटका आला.

शीतल यांचा सातवा महिना सुरू होता. त्यावेळी निर्माण झालेल्या अडचणी प्रणव विसरू शकलेले नाहीत. त्या काळात शीतल खूप शांत होती. तिने बाबांनाही धीर दिला. तुम्ही आजोबा होणार आहात. नातवंडाचे लाड पुरवण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायला असं तिने सासऱ्यांना सांगितलं.

मात्र नातीच्या जन्मानंतर कांतीभाईंची तब्येत सुधारते आहे. आता ते उठून उभे राहतात आणि वॉकस्टिकच्या मदतीने ते चालतात.

दहा गर्भपात झाल्यानंतरचं गरोदरपण निभावणं अवघड होतं मात्र शीतल यांचा निर्धार पक्का होता.

मी खूप धार्मिक झाले होते. सतत प्रार्थना करत असे. संगीत ऐकत असे. दोन उद्दिष्टांविषयी मी स्वत:ला बजावत असे. एक-मी आई होणार आहे आणि मी यशस्वी होणार आहे, असं त्या सांगतात.

या नऊ महिन्यांच्या काळात निराश वाटू लागल्याने त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेतली होती.

या काळातच शीतल यांनी कायद्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशही घेतला. त्यांच्याकडे सौराष्ट्र विद्यापीठाची कायद्याची डिग्री होती.

शीतल पदव्युत्तर डिग्री मिळवत सरकारी वकीलही झाल्या आहेत. IVF माध्यमातून आई होण्याची अवघड प्रक्रिया सुरू असताना त्यांचं करिअरही बहरलं.

IVF प्रक्रियेतील धोके

आई होण्याच्या या टोकाच्या महत्त्वाकांक्षेला वैद्यकीय तज्ज्ञ धोकादायकही मानतात. स्त्रीच्या आरोग्यासाठी धोकादायक अशा या पर्यायाऐवजी मूल दत्तक घेणं किंवा सरोगसीचा पर्याय अंगीकारणं संयुक्तिक आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.

IVF मुळे स्त्रियांना डोकेदुखी, अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं दिसतात. IVFमुळे ओव्हरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम होऊ शकतो. या आजारात चक्कर येऊ शकते, पोटात दुखू शकते तसंच थकवा जाणू शकतो. IVF प्रक्रियेमुळे इक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याची शक्यता असते. यामध्ये भ्रूणाचं गर्भाऐवजी फॉलोपिअन ट्यूब्समध्ये रोपण होऊ शकते. या इक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. अशा परिस्थितीती आईचा जीव वाचवण्यासाठी गर्भ शस्त्रक्रियेने काढावा लागतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)