You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रुग्णालयात गरोदर महिलांना मिळतेय शिव्यांची लाखोली आणि मार
- Author, कमलेश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गरोदरपणात स्त्रियांची काळजी घेणं अपेक्षित असतं मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांना मारहाण आणि शिव्यांच्या लाखोलीचा प्रकार उघडकीस आला आहे.
28 वर्षांच्या सुमन गेल्याच महिन्यात प्रसूत झाल्या आहेत. दुसऱ्या मुलाचा विचार करणार का असा प्रश्न विचारल्यावर त्या हादरल्याच.
त्या हादरल्या त्या दुसऱ्या मुलाचा विचारानेच नव्हे तर प्रसूती दरम्यान मिळणाऱ्या वागणुकीमुळे.
दुसरं मूल ही त्यांच्यासाठी चिंतेची गोष्ट नाही. डिलिव्हरीदरम्यानचा कटू अनुभव त्यांच्यासाठी नकोसा आहे.
सुमन या दिल्लीतल्या संजय गांधी रुग्णालयात प्रसूत झाल्या होत्या.
त्यांनी स्वत:चा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, "प्रसूत होण्याची माझी पहिलीच वेळ होती. डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर माझ्यापुढे काय काय वाढून ठेवलं आहे याची मला कल्पना नव्हती. प्रसूतीचा माझा पहिलाच अनुभव असल्याने मी आधीच घाबरले होते. मला ज्या मोठ्या खोलीत ठेवण्यात आलं होतं, तिथे बाकीच्या बायकाही होत्या. त्या वेदनेने ओरडायच्या. मात्र या बायकांपबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांना ओरडा मिळत होता. ज्यामुळे माझ्या अस्वस्थतेत भर पडली."
सुमन पुढे सांगतात, "वॉर्डात वाऱ्यासाठी पंखे होते पण ते चालत नव्हते. प्रचंड अशा उकाड्यात माझ्यासह दोन महिलांना मिळून एक बेड देण्यात आला होता. आम्ही तिघी प्रसूतीवेदनांनी विव्हळत होतो. आम्हाला थोडा वेळ आराम करायचा होता. पण ते शक्य नव्हतं. आम्ही तिघी एकाच बेडवर आक्रसून बसलो होतो. दुसरी स्त्री नैसर्गिक विधींसाठी किंवा बाहेर पाय मोकळे करण्यासाठी गेली तरच मला आडवं पडता येत असं."
"माझ्या बाजूच्या बेडवरील बाईला प्रचंड वेदना होऊ लागल्या. ती वेदनेनं कळवळत होती. घामाने थबथबलेल्या त्या बाईचा घसा कोरडा पडला होता. मात्र तिच्याकडे बघायला कोणीच नव्हतं. वेदना असह्य झाल्यावर ती जोरजोराने किंचाळू लागली तेव्हा नर्स आल्या. नर्सने त्या बाईला तपासलं. मूल पोटातून अजून बाहेर आलं नसल्याचं सांगितलं. वेदनेने ओरडणाऱ्या त्या महिलेची तपासणी करताना नर्स त्या बाईला ओरडल्या आणि तिला अनेकदा मारलंही," असं सुमन यांनी सांगितलं.
"जिथे शक्य होईल तिथे नर्स त्या बाईला मारत होती. नर्स त्या बाईचे केसही ओढत होती. त्यांचं बोलणं असं होतं की मुलाला जन्म देणं म्हणजे काहीतरी लाजिरवाणं गोष्ट वाटू लागे. आधी मजा केली, आता कशाला ओरडतेस. मुलाला जन्म द्यायचा असेल तर वेदना होणारच. याची कल्पना नव्हती का तुला. तुम्हीच सांगा- असं कोणी बोलू शकतं का? प्राण्यांना देतात तशी वागणूक आम्हाला मिळाली. त्यांचं बोलणं आणि वर्तन पाहून त्यांची आमच्यावर दहशत बसली. माझं दुखणं पार दूर गेलं," असं त्यांनी पुढे सांगितलं.
गरोदर महिलांबरोबर असं वर्तन सरकारी रुग्णालयांमध्ये सर्रास घडतं. अन्य सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या स्त्रियाही असेच अनुभव सांगतात.
ही गोष्ट केंद्र सरकारनंही मान्य केली आहे. रुग्णालयांमध्ये स्त्री रुग्णांबरोबरचं वर्तन सुधारावं यासाठी सरकारने गेल्यावर्षी मार्गदर्शक तत्त्वं लागू केली. राज्य सरकारांच्यामार्फत या तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे.
चंदीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PJIMER) संस्थेनं सन्मानजनक वर्तन तसंच प्रसूतीदरम्यान स्त्रियांना सन्मानजनक वागणूक आणि काळजीसंदर्भात संशोधन केलं आहे.
संशोधन काय म्हणतं?
हॉस्पिटलचे कर्मचारी महिला रुग्णांबरोबर कठोरपणे वागतात. त्यांच्यावर ओरडतात आणि महिला रुग्णांनी एखादी गोष्ट ऐकली नाही तर त्यांना धमक्याही दिल्या जातात.
या संस्थेत कम्युनिटी मेडिसनच्या प्राध्यापिका आणि संशोधनाच्या मुख्य प्रवर्तक डॉक्टर मनमीत यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणतात, प्रसूतीदरम्यान ओरडणं आवश्यक असल्यासारखं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. धाकधपटशा आणि ओरडलं तर स्त्रियांना प्रसूतीवेळी मदत होते असं नर्स सांगतात.
या संशोधनाच्या समन्वयक इनायत सिंह कक्कड सांगतात की, "रुग्णालयांमध्ये एका नर्सला अनेक रुग्णांची देखभाल करायची असते. त्यामुळे त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. सगळ्या रुग्णांकडे लक्ष देणं त्यांना शक्य होत नाही. आम्हाला अनेक नर्सनी याबाबत सांगितलं आहे. रुग्णांशी प्रेमाने बोलणं, त्यांना आदर देणं शक्य नाही असं नाही. अनेक नर्स रुग्णांशी चांगलं वागतात."
योग्य प्रशिक्षणाची गरज
याविषयाबाबत संजय गांधी रुग्णालयाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली. आमच्या हॉस्पिटलमध्ये नर्सकडून किंवा हॉस्पिटलच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने रुग्णांना चुकीची वागणूक दिल्याची तक्रार आलेली नाही. मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये असे प्रकार घडतात याची कबुली रुग्णालयाने दिली.
मुद्दा ओरडण्याचा आहे. त्यासाठी आम्ही वेळोवेळी नर्स कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करतो. रुग्णांशी कशा पद्धतीने बोलावं याचं प्रशिक्षण देण्यात येतं. हा वैयक्तिक मुद्दाही आहे. रुग्णाला मारहाण झाली आहे किंवा त्यांच्याशी कोणी आक्षेपार्ह भाषेत बोलल्याची आमच्याकडे यासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही, असं संजय गांधी रुग्णालयाचे डेप्युटी मेडिकल सुपिरिटेंडट डॉक्टर एम.एम. मनमोहन म्हणाले.
सरकारी रुग्णालयांमध्ये असं होऊ शकतं असं मनमोहन यांनी सांगितलं. ते पुढे सांगतात, "या नर्स कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्किल्सचं प्रशिक्षण देण्यात येत नाही. हे सगळं मेडिकलच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यायला हवं. तसं होत नाही. त्या स्वरुपाचं प्रशिक्षणच दिलं जात नाही."
नर्सेसची अपुरी संख्या हेही यामागचं एक कारण असल्याचं मनमोहन सांगतात. प्रत्येक रुग्णालयात नर्स तसेच डॉक्टरांच्या 15 ते 20 टक्के जागा रिक्त असतात. रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड असते. मात्र त्या तुलनेत डॉक्टर आणि नर्सेस नसतात. छोट्या छोट्या वस्त्या, मोहल्ले इथे असलेल्या पॉलीक्लिनिकमध्येही रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसना जावं लागतं. तिथे वेगळ्या डॉक्टरांची नियुक्ती होत नाही. रुग्णांची संख्या आणि डॉक्टर-नर्स यांची संख्या यांच्यातलं व्यस्त गुणोत्तर कमी होण्याची आवश्यकता आहे.
डॉ. मनमोहन सांगतात की, "रुग्णालयांमध्ये एका वॉर्डात दोनच नर्स असतात. त्यांच्यावर जवळपास 50-60 रुग्णांची जबाबदारी असते. प्रत्येक रुग्णाने एकदा किंवा दोनदा नर्सला बोलावलं तरी त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे. त्यांना प्रत्येक रुग्णाची माहिती ठेवणंही अनिवार्य असतं. रुग्णांना औषधंही द्यावी लागतात. इंजेक्शऩ द्यायचं असतं. रुग्णाने बोलावलं तर तिथे जाऊन विचारपूस करावी लागते. नर्सेसना अनेकदा सुट्टी घेता येत नाही."
दिल्लीतल्या बाबू जगजीवन रुग्णालयाच्या मेडिकल सुपरिटेंडट डॉक्टर प्रतिभा यांनीही डॉक्टर-नर्सेसची संख्या कमी असल्याचं मान्य केलं आहे.
डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. सरकारकडे डॉक्टरच नाहीत. केवळ दिल्लीत नव्हे, बाकी राज्यांमधली परिस्थिती सुधारणं आवश्यक आहे. जेणेकरून दिल्लीवरचा बोजा कमी होऊ शकेल.
रुग्णांप्रती सहानुभूती वाटणंही महत्त्वाचं आहे. गरोदर स्त्रियांशी सर्वाधिक संपर्क नर्सेसचा असतो. अशा परिस्थितीत नर्सेसना योग्य प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे.
इनायत सिंह हाच मुद्दा रेटतात. रुग्णांपबद्दल कणव वाटणं आवश्यक आहे. इंटरपर्सनल कम्युनिकेशनसारख्या गोष्टी वैद्यकीय अभ्यासक्रमात समाविष्ट करणं अत्यावश्यक आहे. यासंदर्भात नियमितपणे प्रशिक्षण मिळावं. जेणेकरून चांगलं वागणं त्यांची सवय होईल.
समुपदेशनाची आवश्यकता
अनेकदा वाईट वर्तनाचा सामना करणाऱ्या स्त्रिया औपचारिक तक्रार करायला तयार नसतात. अन्य स्त्रियांना वाईट वागणूक मिळाली आहे, असं त्या सांगतात.
अशावेळी महिलांना अंगणवाडी किंवा तत्सम माध्यमातून रुग्णालयाच्या कामकाजाबाबत, प्रसूतीवेदनासंदर्भात सविस्तर माहिती देणं आवश्यक आहे.
सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गरोदर स्त्रीला सन्मानजनक वागणूक मिळायला हव, असं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
मार्गदर्शक तत्त्वांमधील अन्य गोष्टी
- प्रसूती वेदनेवेळी स्वतंत्र लेबररुम किंवा स्वतंत्र कक्ष देऊन खाजगीपणा देणं.
- प्रसूतीवेदना आलेल्या असताना नातेवाईक सोबत राहणं.
- प्रसूतीवेळी स्त्रीला बरं वाटेल अशा अवस्थेत राहू देणं.
- टेबलाऐवजी लेबरबेडचा वापर व्हावा
- गरोदर महिलेशी वागताना शारीरिक मारहाण किंवा आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग करू नये.
- औषधं, उपचार, मूल जन्माला आल्यानंतरच्या आनंदात पैसे घेऊ नयेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)