दंगली 1984 आणि 2002 : 'राहुल गांधी आणि मोदी एकसारखेच' - दृष्टिकोन

    • Author, उर्मिलेश
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर्मनी आणि इंग्लंडच्या दौऱ्यात काही महत्त्वाची व्याख्यानं दिली आहेत. अनेकदा तर ते प्रश्नोत्तरांच्या सत्रांतही दिसले. भारतातल्या वृत्तवाहिन्यांनी सरकारला खूश करण्यासाठी राहुल गांधींवर टीका केली, त्यांच्या 'बालिशपणा'साठी त्यांची खिल्ली उडवली.

तर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना आणि मुत्सद्द्यांना त्यांच्या मुद्द्यांमध्ये नवे विचार आणि ताजेपणा दिसला.

मात्र शुक्रवारी रात्री लंडनमध्ये तिथले खासदार आणि नामवंत लोकांच्या एका संमेलनात ज्या पद्धतीने त्यांनी 1984मधल्या नरसंहारावर टिप्पणी केली, त्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.

1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खुनानंतर घडलेल्या हिंसाचारांच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा जीव गेला होता. घडलं ते दु:खद होतं, हे राहुल गांधींनी मान्य केलं, पण आपल्या पक्षाचा ते जोरदार बचाव करताना दिसले.

1984च्या दंगलीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा अजिबात हात नव्हता, ही बाब कुणीही मान्य करणार नाही.

त्यावेळची प्रत्यक्ष परिस्थिती

राहुल गांधींचा हा दावा म्हणजे गुजरातच्या 2002 दंगलींमध्ये भाजपच्या लोकांचा काहीही हात नव्हता, असा दावा भाजपनं करण्यासारखं आहे. अशा दाव्यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत. मग दंगली काय हवा, पाणी आणि झाडांनी घडवून आणल्या होत्या?

1984च्या दंगली झाल्या तेव्हा मी दिल्लीत राहायचो. आम्ही त्या वेळची परिस्थिती फक्त बघितलीच नव्हती तर त्यावर लिहिलंसुद्धा होतं.

तेव्हा मी पत्रकारितेची सुरुवातच केली होती, पण कोणत्याही वर्तमानपत्रात मी काम करत नव्हतो. त्या दंगली फक्त काँग्रेसच्याच लोकांनी घडवल्या होत्या, असं मात्र अजिबात नाही. त्यात स्थानिक पातळीवर कथित हिंदुत्ववादी आणि त्याबरोबरच काही समाजकंटक धुडगूस घालण्यात रस्त्यांवर उतरले होते.

गरीब वर्गातल्या उपद्रवी तरुणांना दंगलीत लुटालूट करण्यासाठी जमवण्यात आलं होतं. यासाठी जास्त प्रयत्नही करावे लागले नसतील. उलट इशारा मिळताच लुटालूट करणारे लगेच गोळा झाले असतील.

त्यावेळी मी दिल्लीतील विकासपुरी भागातल्या A ब्लॉकमध्ये भाड्याच्या एका खोलीत राहायचो. माझे घरमालक दिसायला सभ्य होते मात्र प्रत्यक्षात ते तसे नव्हते. त्यांची बायको त्यांच्यापेक्षा चांगली होती, ही गोष्ट दंगलीच्या वेळीच मला समजली.

घरमालकाचं कुटुंब तळमजल्यावर राहायचं आणि बाजूच्या खोलीत मी रहायचो. आमच्या घराच्या बाजूला जे घर होतं, त्याच्या तळमजल्यावर एक शीख व्यक्ती आपल्या कुटुंबाबरोबर राहात होती, साधारण 30-35 वर्ष वयाची. पहिल्या मजल्यावर कुणी चौहान म्हणून राहायचे.

आजूबाजूच्या टिळक नगर, उत्तम नगर, पश्चिम विहार या भागात दंगली सुरू झाल्या आहेत, अशा बातम्या आम्हाला मिळत होत्या. या परिसरातील दुकानं लगोलग बंद होत होती.

काही वेळानंतर तिथे जमाव दाखल झाला. मी स्वत: त्या जमावाकडे पाहिलं. त्या जमावात कोणत्याही लोकप्रिय पक्षाचा नेता नव्हता.

पण एक गोष्ट स्पष्ट होती, की तो जमाव असाच निरुद्देश तिथे आला नव्हता. त्यामागे कुणाची तरी योजना होतीच. "खून का बदला खून से लेंगे" अशा घोषणा ते देत होते. या घोषणा कुठून आल्या?

यादरम्यान जे तांडव सुरू होतं, ते थांबवण्यासाठी कुठल्याही सुरक्षादलाचे सैनिक आसपास दिसत नव्हते.

जमावात लपलेले सत्ताधीश

दिल्लीच्या इतर भागातील लोकांनी तिथल्या स्थानिक नेत्यांना जमावाला भडकवताना पाहिलं होतं. त्याबाबतीत People Union of Civil Liberties (PUCL)ने अनेक तथ्यांसकट एक मोठा अहवालही पुस्तिकेच्या रूपात छापला होता.

माझ्या गल्लीत दंगलखोरांनी सरदारजींच्या घरावर निशाणा साधला होता. या घरात इतर लोकही राहतात, अशी विनंती लोकांनी केली म्हणून हे घर कसंबसं वाचलं. पण सरदारजींचा ट्रक काही त्यातून वाचला नाही. जमावाने तो पेटवला.

माझ्या खोलीत बसलेल्या सरदारजींच्या पत्नी ढसाढसा रडत होत्या. तरी आम्ही काही करू शकलो नाही. गुजरातच्या कुख्यात दंगलीतही अशाच असंख्य कुटुंबांनी आपल्या शेजारी राहणाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत जाताना पाहिलं असेल.

दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात अनेक लोकांच्या हत्येच्या बातम्या येत होत्याच. पण सामान्य माणूस या संपू्र्ण परिस्थितीसमोर लाचार होता.

जमाव आणि प्रशासन यांच्यात एक अघोषित ताळमेळ दिसत होता. विरोधी पक्षाचा एक भागसुद्धा याच तंत्राचा भाग असल्याचं दिसून आलं होतं.

गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये अशाच प्रकारची लाचारी आहे. दादरीच्या अखलाकचं कुटुंब त्यांच्यातील एका ज्येष्ठ सदस्याला अशाच पद्धतीने मरताना बघत राहिलं. मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारण्याचा प्रयत्न झाला होता.

काही दिवसांआधी मोतीहारी येथील सहायक प्राध्यापक संजय कुमार यांना ठेचून मारायला आलेल्या जमावासमोर कोण काय करू शकत होतं? हा सगळा घटनाक्रम पाहिला तर समाजाला कायद्याचं राज्य, लोकशाही, उदारपणा, सहिष्णुता आणि मानवता, अशा गोष्टींची का गरज आहे, हे लक्षात येईल.

शहर जळत होतं, मात्र लोक बघत राहिले

विकासपुरीमधले आमचे शीख शेजारी एका अत्यंत साधारण कुटुंबातले होते. माझ्यासारखे तेही भाड्यानं राहत होते आणि ट्रक ड्रायव्हर होते. काही पैसे साठवून त्यांनी पहिल्यांदा तो ट्रक घेतला होता. सफरचंदांनी भरलेला तो ट्रक कुठेतरी जाण्यासाठी तयार होता.

सामाजिक-आर्थिक पातळीवर दुर्बळ दिसणाऱ्या या जमावाने ट्रकमध्ये असलेले सगळे सफरचंद लुटून नेले. त्यानंतर तो ट्रक जाळला.

जमाव येण्याच्या काही वेळापूर्वी सरदारजी आपल्या पत्नीला आणि मुलाला माझ्याकडे सोडून, मागच्या दाराने कुठेतरी निघून गेले होते. त्यांची आणि माझी बायको चांगल्या मैत्रिणी होत्या. मी त्या लोकांना आमच्या खोलीत बंद केलं आणि आणि आम्ही बाहेर उभं राहिलो.

नंतर परत आल्यावर सरदारजींनी त्यांच्या ट्रकची अवस्था पाहिली आणि ते रडायला लागले. कुटुंबीय सुरक्षित होते, फक्त याचाच त्यांना आनंद होता. मला खात्रीने सांगू शकतो की त्यांच्या मालकीचे आज अनेक ट्रक असतील. आणि त्यांचा मुलगासुद्धा या व्यवसायात असेल.

मोदींशी मिळते जुळते वक्तव्य

त्या सरदारजींना आमच्या खोलीत लपू देण्याच्या निर्णयामुळे आमचा घरमालक खूपच नाराज झाला होता. आपल्या घरात एक शीख कुटुंबीय लपलं आहे, हे जर दंगलखोरांना कळलं तर ते आपलंही घर जाळतील, अशी भीती त्यांना होती.

मी त्यांना सांगितलं की कुणाला काही कळणार नाही. तुम्ही उगाच पराचा कावळा करत आहात.

काही दिवसांनी मी ते घर सोडलं आणि पुष्प विहार भागात रहायला आलो. हे सगळं विस्तारानं सांगण्याचं कारण हेच की 'याचि देहि याचि डोळा' पाहिलेल्या घटनांचा कुणी नवीन अर्थ लावला तर ते पचणं शक्य नाही. म्हणून भूतकाळातील घटनांविषयी अतिशयोक्ती टाळावी. सत्य कितीही कटू असलं तरी ते जसं आहे तसं स्वीकारण्याची तयारी असायला हवी.

1984च्या दंगलीत काँग्रेसचा काहीही सहभाग नाही, असं जेव्हा राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले तेव्हा मला नरेंद्र मोदींचं वक्तव्य आठवलं. 2002च्या दंगलीत त्यांच्या किंवा त्यांच्या पक्षाचा सहभाग नाही, असं ते हिरिरीने सांगायचे. म्हणून हिंसाचार होत राहिला आणि ते 'राजधर्म' पाळत राहिले.

तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचं कडक धोरण आणि पंतप्रधान वाजपेयी यांच्या सूचना असूनसुद्धा दंगलीने होरपळलेल्या गुजरातमध्ये लष्कराला पाचारण करण्यास उशीर झाला. उशिरा का होईना, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2005मध्ये संसदेत येऊन 1984च्या घटनांसाठी माफी मागितली होती.

सोनिया गांधी यांनीसुद्धा वेगवेगळ्या प्रसंगी माफी मागितली होती. मग अशा परिस्थितीत 1984च्या घटनांसाठी गुन्हेगार म्हणून गणल्या गेलेल्या पक्षाचा बचाव अध्यक्ष राहुल यांनी का केला?

भाजप नेत्यांसारखं प्रत्येक गुन्ह्यासाठी पक्षाची पाठराखण करण्याची पद्धत ते आजमावू पाहत आहे का? कारण अनेकदा मागणी होऊनसुद्धा लालकृष्ण अडवाणी असो किंवा नरेंद्र मोदी असो, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी 2002च्या दंगलीची किंवा बाबरी मशीद प्रकरणाची माफी मागितलेली नाही. माफी सोडा, त्यांना चुकीची जाणीवसुद्धा झालेली नाही.

दोन्ही पक्ष दंगलीसाठी दोषी ठरवलं की एकमेकांवर टीका करतात. गुजरात विषयी प्रश्न विचारले की 1984च्या दंगलीचा मुद्दा समोर करत काँग्रेसचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. क्रौर्य आणि निर्घृणता लपवण्यासाठी हे पक्ष आपल्या जुन्या किंवा नव्या गुन्ह्यांचा बचाव करत पळवाटा शोधत असतात आणि या दंगली कधीही न संपण्याचा हा सिलसिला असाच सुरू आहे.

आता तर दंगलीचं रूपही बदललं आहे. आता लोक थेट हल्लेच करतात, जमावाकडूनच लोकांची ठेचून ठेचून हत्या होत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)