नरोडा पाटिया हत्याकांड : गुजरात हायकोर्टाने ठोठावली 3 दोषींना 10 वर्षं सक्तमजुरीची शिक्षा

2002 मध्ये गुजरात दंगलीतील नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणात तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या तिघांना 10 वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दोषी ठरवण्यात आलेल्यांची नावं उमेश भरवाद, पद्मेंद्रसिंह राजपुत आणि राजकुमार चौमल अशी आहेत.

या प्रकरणी सर्वांत जास्त चर्चेत राहिलेलं नाव होतं गुजरात सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या माया कोडनानी यांचं. सत्र न्यायालयाने त्यांचा उल्लेख नरोडा पाटिया हत्याकांडाच्या सूत्रधार असा केला होता. पण एप्रिल 2018 मध्ये गुजरात हायकोर्टाने त्यांच्यासह 18 लोकांना निर्दोष ठरवलं होतं.

काय आहे नरोडा पाटिया हत्याकांड

गुजरातमध्ये साबरमती एक्सप्रेस रेल्वेचे काही डबे जाळल्यानंतर जी दंगल उसळली, त्यातील सर्वांत नृशंस हिंसाचारातील एक म्हणजे नरोडा पाटिया हत्याकांड होतं.

  • 25 फेब्रुवारी 2002 : अयोध्येतून मोठ्या संख्येने कारसेवक साबरमती एक्सप्रेसने अहमदाबादसाठी रवाना झाले.
  • 27 फेब्रुवारी 2002 : अहमदाबादकडे जात असताना गोधरा स्टेशनवर जमावाने रेल्वेच्या काही डब्यांना आग लागली. यात 59 कारसेवकांचा जीव गेला.
  • 28 फेब्रुवारी 2002 : विश्व हिंदू परिषदने गोधरेतील घटनेविरोधात गुजरात बंदची हाक दिली. याचवेळी एका जमावाने अहमदाबादच्या नरोडा पाटिया कॉलनीत हल्ला केला. इथं झालेल्या या हिंसाचारात मुस्लीम समाजातील 97 लोकांचा बळी गेला तर 33 लोक जखमी झाले. या हिंसक जमावाचं नेतृत्व गुजरात सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या माया कोडनानी आणि बजरंग दलचे नेते बाबू बजरंगी करत होते.
  • 2007 : झालेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बाबू बजरंगी याने या दंगलीत भाग घेतल्याचं मान्य केलं होतं.
  • 2008 : सुप्रीम कोर्टाने या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांनी न करता कोर्टाने स्थापन केलेल्या समितीने करावा, असे आदेश दिले.
  • 2009 : नरोडा पटियातील दंगलीवर खटला सुरू झाला. सुरुवातीला यात 62 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. खटला सुरू असताना एक संशयित विजय शेट्टीचं निधन झालं. सुनावणीत 327 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. यात पीडित, डॉक्टर, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता.
  • 29 ऑगस्ट 2012: कोर्टाने या खटल्यात बाबू बजरंग, माया कोडनानी यांना दोषी ठरवलं. न्यायालयाच्या निकालपत्रात कोडनानी यांचा उल्लेख नरोडा पाटिया हत्याकांडच्या सूत्रधार असा करण्यात आला. कोडनानी यांना 28 वर्षांची तर बाबू बजरंगी याला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली. इतर दोषींना 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
  • 20 एप्रिल 2018 : गुजरात हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत कोडनानी यांच्यासह 18 लोकांना निर्दोष ठरवलं. उच्च न्यायालयाचं म्हणण होतं की माया कोडनानी यांना कारमधून उतरून जमावाला चिथवाणी देताना पाहणारा साक्षीदार पोलिसांनी सादर केला नाही. न्यायालयाने बाबू बजरंगीची शिक्षा कमी करून ती 21 वर्षं केली. बजरंगीसह 11 जणांना 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली तर एका दोषीला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)