नरेंद्र दाभोलकर यांच्यावर 'गोळ्या झाडणाऱ्याला' अटक; 26 ऑगस्टपर्यंत कोठडी

फोटो स्रोत, FACEBOOK
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाला पाच वर्षं पूर्ण होत असतानाच वेग आला आहे. या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन अंदुरे यास अटक केली आहे.
आज दुपारी त्याला पुण्यात शिवाजीनगरमधल्या विशेष कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी संशयित सचिन अंदुरे यास 26 ऑगस्टपर्यंत CBI कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ANI या वृत्तसंस्थेनंही याबद्दल वृत्त दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि विवेकवादी लेखक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) 10 ऑगस्टला नालासोपारा इथे टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर बॉम्ब तयार करण्याचं साहित्य सापडलं होतं. या प्रकरणात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केली होती.
या तिघांच्या चौकशीदरम्यान एका आरोपीनं डॉ दाभोलकर यांच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं सांगितलं आणि त्यासाठी मोटारसायकलचा वापर केल्याचंही मान्य केलं.
याशिवाय, आणखी एकाचा या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचं त्याने सांगितलं. या चौकशीमध्ये ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव आलं, त्या व्यक्तीनंही चौकशीमध्ये या तपशीलांना दुजोरा दिल्यानंतर ATSने तातडीने ही माहिती CBIला दिली आणि शनिवारी दुसऱ्या संशयितालाही पुण्यात अटक करण्यात आली.
"CBI ने आज औरंगाबादच्या सचिन प्रकाशराव अंदुरे याला दाभोलकर हत्येप्रकरणी पुण्यातून अटक केली आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्यांपैकी तो एक असल्याचा संशय आहे. अधिक तपास सुरू आहे," असं CBIच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी CBI करत असलेल्या या तपासात यापूर्वी सनातन संस्थेचे सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावं मारेकरी म्हणून समोर आली होती. पण आता अंधुरे याच्यासह नव्यानं पुढे आलेल्या काही नावांमुळे तपासाला नवं वळण मिळालं आहे.

फोटो स्रोत, BBC/SHARAD BADHE
या अटकेनंतर डॉ. दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "ही महत्त्वाची घडामोड आहे. तावडेला अटक झाल्यानंतर अडीच वर्षांनी पहिली अटक झाली आहे. पण एका अटकेवर न थांबता तपास संस्थांनी सूत्रधारापर्यंत जाऊन कटाचा उलगडा करावा."
"आता काळ न गमावता हे लवकरात लवकर व्हावं कारण वेळीच सूत्रधार मिळाला असता तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या टाळता आल्या असत्या. हायकोर्टाच्या मॉनिटरिंगने महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं मला वाटतं," त्या म्हणाल्या.
दरम्यान, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर आणि डॉ. पानसरेंच्या सून मेधा पानसरे यांना आता X-दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येतील एका संशयिताच्या डायरीत यांची नावं सापडल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली.
आजवरचा तपास
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर जेव्हा या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आणि महाराष्ट्र ATS मिळून करत होते. पण त्यात फार काही निष्पन्न होताना दिसलं नाही आणि मे 2014 मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला. एका याचिकेद्वारे उच्च न्यायालय या तपासावर लक्ष ठेवून आहे.
CBIनं त्यांच्या तपासाअंतर्गत सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे याला अटक केली होती. सोबतच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचाही संशयित मारेकरी म्हणून शोध सुरू होताच.
दरम्यान, 'सनातन संस्थे'ने CBI च्या या तपासावर याआधी आक्षेप नोंदवला आहे.
"हा संपूर्ण तपास भरकटलेला आहे. CBI कडे कोणतेही पुरावे नाहीत. खरे मारेकरी पकडले जात नाहीत म्हणून 'सनातन'ला लक्ष्य केलं जात आहे. खटला वेगानं चालू दिला जात नाही आणि दिवस काढले जात आहेत," असे 'सनातन संस्थे'चे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बीबीसीला यापूर्वी सांगितलं होतं.
आता आशा वाढली - मेघा पानसरे
"5 वर्षानंतर तपासानं वेग घेतलाय. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात ज्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे तपास यंत्रणा संशयितांपर्यंत पोहचल्या. त्यामुळे घातपाती कारवाया बाहेर आल्या. याबाबत आणखी सत्य उघड व्हायला पाहिजे. या अटकेमुळे गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत तपास यंत्रणा आता Logical End पर्यंत म्हणजे नेमकं तथ्य काय आहे यापर्यंत पोहचतील अशी आशा वाटते," असं मेघा पानसरे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
तपास यंत्रणाना न्यायालयात पुरावे सादर करावे लागतील त्यांची जबाबदारी वाढलीय, या अटकेमुळे मुख्य सूत्रधार सापडण्याची आता आशा वाटते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे नक्की पाहा -
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









