नागपूरच्या झुलेखा बनल्या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : भारताच्या डॉ. झुलेखा यांनी 55 वर्षं केली अरब रुग्णांची सेवा
    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नागपूरमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण, पुढे पहिली नोकरी थेट कुवेतमध्ये आणि आता दुबई तसंच भारतात मिळून स्वत:च्या मालकीची तीन रुग्णालयं.

हा सगळा प्रवास आहे 80 वर्षांच्या झुलेखा दाऊद यांचा. आखाती देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे.

1963 मध्ये त्या पहिल्यांदा दुबईला गेल्या. पुढे 50हून जास्त वर्षं अगदी तिथल्याच होऊन राहिल्या.

आता वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्या थोड्या थांबल्या असल्या तरी रुग्णांबरोबरचं त्यांचं नातं आजही पूर्वीसारखंच आहे.

dubai, zulekha
फोटो कॅप्शन, डॉक्टर झुलेखा दाऊद यांची प्रेरणादायी कहाणी.

दुबईत 1963मध्ये त्यांनी पाऊल ठेवलं, तेव्हाची दुबई खूपच वेगळी होती. तिथं एकही रुग्णालय नव्हतं.

स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्या तिथं गेल्या. पण, सगळेच रुग्ण त्यांना बघावे लागत होते. तिथं लोकांना आपली गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मग तिथंच राहण्याचा निर्णय घेतला.

कुवेतमध्ये एका अमेरिकन मिशिनरी रुग्णालयात त्या सुरुवातीला कार्यरत होत्या. तेव्हा दुबई आणि शारजासारखी शहरं इतकी मागासलेली होती की, तिथं रहायला कुणी तयार व्हायचं नाही.

झुलेखा मात्र तिथं राहिल्या. तिथं त्यांना बाळंतपणं, छोट्या मोठया शस्त्रक्रिया, हाड मोडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया तसंच अगदी भाजलेल्या रुग्णांवर उपचार, असं सगळं करावं लागलं.

dubai, zulekha
फोटो कॅप्शन, अरब देशातली गरज ओळखून तिथे रुग्णसेवेचा घेतला निर्णय

त्यांनी रुग्णसेवेचं व्रत सोडलं नाही. मधल्या काळात एका भारतीय डॉक्टरशी त्यांचं लग्नही झालं.

नोकरीनंतर त्यांनी शारजामध्ये स्वत:चं क्लिनिक सुरु केलं. शारजात तेव्हा पक्के रस्तेही नव्हते आणि वाळूमध्ये गाडी तासन् तास अडकून रहायची.

dubai, zulekha

फोटो स्रोत, Zulekha Daud

फोटो कॅप्शन, डॉ. झुलेखा यांचे जुने फोटो

रस्ते असे तर क्लिनिकमध्येही फारशा सुविधा शक्य नव्हत्या. औषधंही फारशी मिळायची नाहीत.

पण, लोकांना आपली गरज आहे या भावनेनं त्या इथेच राहिल्या. हळूहळू काम वाढत गेलं.

कामाबरोबरच लोकप्रियताही मिळाली. त्यांच्या देखरेखीखाली शारजा आणि दुबईत एकूण 15 हजार मुलांचं बाळंतपण झालं आहे.

dubai, zulekha
फोटो कॅप्शन, झुलेखा दुबईत आल्या तेव्हाची शहराची अवस्था

तिथल्या राजघराण्याचा विश्वासही त्यांनी जिंकला. त्या गंमतीनं म्हणतात, "अरबांच्या तीन पिढ्यांवर मी उपचार केले आहेत."

पुढे आखाती देश स्वतंत्र झाले. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाले. 1971 मध्ये संयुक्त अरब अमिराती हा देश स्थापन झाला. आणि तिथून पुढे या देशाची झालेली प्रगतीही त्यांनी जवळून पाहिली आहे.

पुढे 1992 मध्ये झुलेखा यांनी स्वत:चं रुग्णालय सुरु केलं. पन्नास वर्षांत त्या दुबईच्याच होऊन गेल्या. पण, आपलं जन्मगाव नागपूर कधीही विसरल्या नाहीत.

dubai, zulekha
फोटो कॅप्शन, स्वत:च्या मालकीची ३ अद्ययावत रुग्णालयं

सुरुवात करताना भविष्यात काय वाढून ठेवलंय हे त्यांनाही माहीत नव्हतं. पण, पुढे यश गवसल्यावर त्या जुन्या ओळखी विसरल्या नाहीत.

त्याच वेळी आपला देशही त्या विसरलेल्या नाहीत. त्यांचं भारतीय नागरिकत्व आजही कायम आहे. रुग्णसेवेसाठी त्यांनी नागपूरमध्येही एक सुसज्ज रुग्णालय उभारलं आहे.

आता त्यांची मुलगी आणि जावई त्यांचं काम पुढे घेऊन जात आहेत.

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)