फेसबुक आणि बिटकॉईनमुळे दोन भाऊ झाले अब्जाधीश

टेलर आणि कॅमेरुन विंकेलवोस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणारे टेलर आणि कॅमेरून विंकेलवोस.

बिटकॉईनचा २०१३ मध्ये १ टक्के हिस्सा खरेदी करणारे विंकेलवोस बंधू आता कोट्यधीश झाले आहेत. टेलर आणि कॅमेरून विंकेलवोस या दोन भावांनी २०१३ मध्ये ९० हजार बिटकॉईनची खरेदी केली होती.

विंकेलवोस बंधुंनी त्यावेळी खरेदी केलेल्या एका बिटकॉईनची किंमत १२० डॉलर होती. मात्र, ही किंमत वाढून आता जवळपास प्रत्येकी १६ हजार डॉलर म्हणजे साडेदहा लाख रुपये झाली आहे. जवळपास एका वर्षातच बिटकॉईनच्या मूल्यात २१०० टक्क्यांपेक्षा जास्त घसघशीत वाढ झाली आहे.

झुकरबर्गवर दाखल केला होता खटला

विंकेलवोस हे दोन भाऊ खरंतर २००९ मध्ये प्रथम चर्चेत आले होते. जेव्हा त्यांनी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गवर त्यांची कल्पना चोरल्याचा आरोप करत त्यावर खटला दाखल केला होता.

या दोघांनीही असा दावा केला होता की, हार्वर्ड युनिर्व्हसिटीमध्ये शिकत असताना त्यांनी एक सोशल नेटवर्क (हार्वर्ड कनेक्शन, ज्याला नंतर कनेक्ट यू असं म्हटलं गेलं.) बनवण्याचा विचार केला होता.

हे नेटवर्क तयार करण्यासाठी त्यांनी मार्क झुकरबर्गला नोकरीवर ठेवलं होतं. पण, याच्या दोन महिन्यांनंतर झुकरबर्गनं फेसबुकची स्थापना केली.

झुकरबर्गसोबत 'समझोता'

नुकसान भरपाई पोटी विंकेलवोस बंधुंनी झुकरबर्गकडे १०० मिलियन डॉलरची म्हणजेच १० कोटी रुपयांची मागणी केली होती. अमेरिकी माध्यमांच्या हवाल्यानुसार त्यांना ही भरपाई काही मिळाली नाही. मात्र, २०११ मध्ये त्यांनी झुकरबर्गसोबत कोर्टाबाहेर प्रकरण मिटवून टाकलं.

बिटकॉईन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिटकॉईन हे आभासी चलन आहे.

हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांना झुकरबर्गनं ६५ मिलियन डॉलर म्हणजेच साडेसहा कोटी एवढी मोठी रक्कम दिली.

२०१३ मध्ये विंकेलवोस बंधुंनी या मिळालेल्या पैशातून ११ मिलियन अमेरिकी डॉलरची बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली. त्याची किंमत आज ११०० मिलियन डॉलर म्हणजे १००० कोटींहून अधिक झाली आहे.

जेव्हा बिटकॉईनमध्ये या भावांनी गुंतवणूक केली तेव्हा या वर्च्यूअल करन्सीबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. पण या नव्या प्रकराच्या वर्च्यूअल करन्सीमध्ये भविष्यात वाढ होईल अशी विंकेलवोस बंधुंना आशा होती. ते बिटकॉईनच्या मुख्य प्रवर्तकांपैकी एक होते.

त्यांचा दावा आहे की, त्यांनी आजपर्यंत एकही बिटकॉईन विकलेला नाही. बिटकॉईनचं वितरण एका ब्लॉकचेन सॉफ्टवेअरमार्फत नियंत्रित केलं जातं. या सॉफ्टवेअरला हॅक करणं खूप अवघड असल्याचं बोललं जातं.

जगातल्या सगळ्यात मोठ्या विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे विंकेलवोस बंधी हे उत्तम अॅथलीटही होते. त्यांनी एक एक्सचेंज रेट 'जेमिनी' आणि आपला स्वतःचा विंकेलवोस कॅपिटल हा गुंतवणूक फंडही तयार केला होता.

त्यांना बिटकॉईनला अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये आणायचं होतं. पण, त्यांच्या या प्रस्तावाला सिक्यूरिटीज मार्केट कमिशननं नकार दिला होता. यानंतर बिटकॉईनच्या मूल्यात काहीशी घसरणही झाली होती.

बिटकॉईनचा बुडबुडा फुटणार?

अनेक अर्थतज्ज्ञ बिटकॉईनमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याला मोठं जोखमीचं काम मानतात. बिटकॉईनची गॅरंटी कमी, विनिमय मूल्याची खात्री नसणं तसंच एका क्लिकवर भाव पडण्याची शक्यता यामुळे यात गुंतवणूक करू नये, असं अर्थतज्ज्ञांना वाटतं.

बिटकॉईन

फोटो स्रोत, EYEWIRE

गोल्डमन सॅक्समधल्या गुंतवणूक तज्ज्ञांच म्हणणं आहे की, बिटकॉईन हा एक बुडबुडा असून तो लवकरच फुटणार आहे. या चलनावर पारंपरिक बँका विश्वासही ठेवत नाहीत.

पण, टेलर आणि कॅमेरून विंकेलवोस या बंधुंनी ही जोखीम उचलली आणि आज ते अब्जाधीश आहेत.

झुकरबर्ग एवढं श्रीमंत होण्यासाठी त्यांना ७३ हजार मिलियन डॉलरची आवश्यकता आहे. पण, तेवढ्यात बिटकॉईनच्या मूल्यात घसरण होऊ नये म्हणजे झालं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)