माळढोक पक्षी महाराष्ट्रातून नामशेष?

माळढोक

फोटो स्रोत, Vipin Fulzele

फोटो कॅप्शन, माळढोक पक्षाचा जानेवारी 2014 मधील चंद्रपूरमधला फोटो
    • Author, मोहसीन मुल्ला
    • Role, बीबीसी मराठी

वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (WII) सप्टेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एकही माळढोक पक्षी आढळलेला नाही. माळढोक खरंच महाराष्ट्रातून 'इकॉलॉजीकली डेड' झाला आहे का?

काही शास्त्रज्ञांनुसार माळढोक खरंच नामशेष झाला आहे. तर काही अभ्यासक माळढोक महाराष्ट्रातून संपल्यात जमा आहे, अशी भीती व्यक्त करत आहेत. पण हा पक्षी महाराष्ट्रातून नामशेष झाला आहे, असं अधिकृतरित्या सांगितलं जात नाही.

मात्र WII नं एका सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात एकही माळढोक दिसला नाही, असं आता मान्य केलं आहे. बीबीसी मराठीनं माहितीच्या आधिकाराअंतर्गत WII कडून ही माहिती मिळवली आहे.

यापूर्वीही, माळढोक महाराष्ट्रातून इकॉलॉजिकली डेड झाला आहे, असं बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रकल्प संशोधक सुजीत नरवडे यांनीही बीबीसी मराठीला सांगितलं होतं.

International Union for Conservation of Nature (IUCN)ने यापूर्वीच माळढोकला अतिसंकटग्रस्त (Critically endangered) म्हणून जाहीर केलं आहे.

या पक्ष्याची आता महाराष्ट्रातली संख्या इतकी कमी झाली आहे की, त्यात वाढ होणं आणि त्यांचं पुनरुज्जीवन होण्याची शक्यता जवळपास संपली आहे.

WII चा सर्व्हे काय सांगतो?

WII नं 2013पासून देशात Habitat Improvement and Conservation of Great Indian Bustard (GIB अर्थात माळढोक) हा कार्यक्रम सुरू केला आहे.

देशातील काही अतिसंकटग्रस्त प्रजातींचं पुनरुज्जीवन करण्यासाठी WIIनं हा कार्यक्रम सुरू केला आहे.

माळढोक

फोटो स्रोत, Vipin Fulzele

फोटो कॅप्शन, वरोरा इथल्या माळढोकचा फोटो.

या अंतर्गत महाराष्ट्रातल्या माळढोकचा अधिवास असलेल्या परिसरात 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आला. वनविभागही या सर्व्हेमध्ये सहभागी झाला होता.

राज्यातल्या माळढोकच्या अधिवास क्षेत्रांचं 372 ग्रीड करून हा सर्व्हे घेण्यात आला. माळढोकचा महाराष्ट्रातला हा पहिला लँडस्केप लेव्हल सर्व्हे असल्याचं WIIने म्हटलं आहे.

पण या सर्व्हेमध्ये एकही माळढोक दिसून आला नाही. 2011 साली महाराष्ट्रातली माळढोकची संख्या 25 ते 30 इतकी होती, असं WIIनं म्हटलं आहे.

माळढोक इकॉलॉजीकली डेड

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रकल्प संशोधक सुजीत नरवडे म्हणाले, "एखादी प्रजाती नामशेष झाली असं अधिकृतरित्या सांगण्यासाठी किमान 4 ते 5 वर्षं अभ्यास करावा लागेल. पण माळढोकची राज्यातील संख्या लक्षात घेता, तो महाराष्ट्रातून इकॉलॉजीकली डेड झाला आहे."

"माळढोकची महाराष्ट्रातली संख्या वाढण्याची शक्यता आता फारच कमी आहे. नाणज इथं एक महिन्यापूर्वी फक्त एक मादी दिसली होती. तर विदर्भातल्या चंद्रपूरमध्ये 2 ते 3 माळढोक गेल्या वर्षी दिसले होते." असं त्यांनी पुढे सांगितलं.

"माळढोकचं पुनरुज्जीवन होण्यासाठी किंवा त्यांची संख्या वाढण्यासाठी पक्ष्यांची ही सध्याची संख्या फारच कमी आहे," असं त्यांचं म्हणणं आहे.

अहमदनगरमध्ये तर 2000 सालापासून माळढोक दिसलेलाच नाही, ही बाब त्यांनी निदर्शनास आणली.

जे चित्त्याचं झालं ते माळढोकचं होईल?

सोलापुरातील अभ्यासक अमोल लोखंडे यांनी ज्या प्रकारे चित्ता भारतातून नामशेष झाला, तसाच माळढोकही महाराष्ट्रातून नामशेष होईल, अशी भीती व्यक्त केली.

लोखंडे सोलापुरातील गवताळ प्रदेशातले पक्षी यावर PhD करत आहेत.

माळढोक

फोटो स्रोत, Vipin Fulzele

फोटो कॅप्शन, माळढोकच्या मादीचा चंद्रपूर इथला फोटो.

ते म्हणाले, "नाणजमध्ये माळढोक संपल्यात जमा आहेत. या अभयारण्यात एक मादी दिसली होती. ही मादी प्रजननक्षम असेपर्यंत तिला नर भेटणं आणि या माळढोकचं प्रजनन होणं, ही कल्पना प्रत्यक्षात कितपत शक्य होती?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

चंद्रपूरमधले पक्षीनिरीक्षक विपीन फुलझेले सांगतात, "चंद्रपूरमध्ये ही माळढोक दिसलेला नाही. 8 जुलैला भद्रावती तालुक्यातल्या पावना इथं एक मादी दिसली होती."

गोंदिया आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या Sustaining Environment And Wildlife Assemblage (SEWA) या संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी माळढोकचं महाराष्ट्रात पुनरुज्जीवन आता फारच कठीण असल्याचं सांगितलं.

माळढोकला वाचवण्यात आपण कमी पडलो, विशेष करून वास्तव लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात पूर्ण अपयश आल्यानं आजची स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात माळढोक किती?

मात्र WIIचे संशोधक बिलाल हबीब यांच्यानुसार "या सर्व्हेमध्ये एकही माळढोक आढळला नाही, म्हणजे महाराष्ट्रात माळढोक नामशेष झाले, असा निष्कर्ष तातडीनं काढता येणार नाही." महाराष्ट्रात माळढोकची संख्या फारच कमी झाली असल्याचं त्यांनी मान्य केलं.

हबीब WII मधल्या Department of Animal Ecology and Conservation Biology मध्ये संशोधक आहेत. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "सोलापुरात नाणजमध्ये ज्या ठिकाणी आम्ही पाहणी केली तिथे काही दिवसांपूर्वी माळढोक दिसल्याचं लोक सांगतात. महाराष्ट्रात माळढोकसाठीचा सुयोग्य असा अधिवास मोठा आहे, पण माळढोकची संख्या मात्र फक्त 8 ते 10 असावी. त्यामुळे आमच्या सर्व्हेमध्ये माळढोक दिसला नसावा."

नाणजमध्ये काय चुकलं?

माळढोक शेतामध्ये फारशी काही नासधूस करत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांनी या पक्ष्यांना नुकसान पोहोचवण्याचं काही कारण नव्हतं, असं लोखंडे म्हणाले. पण सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका माळढोकला नक्कीच बसला आहे, असं ते म्हणतात.

माळढोक वन्यजीव अभयारण्य

फोटो स्रोत, Amol Lokhande

फोटो कॅप्शन, नाणज इथलं माळढोक वन्यजीव अभयारण्य

ज्या शेतात माळढोक दिसेल ते शेत अभयारण्यात समाविष्ट करण्याचे प्रकार नाणजमध्ये घडले. यातून शेतकऱ्यांनी माळढोकला विरोध केला.

"काही नेत्यांनी तर 'दिसला माळढोक की मारा', अशा घोषणाही व्यासपीठांवरून दिल्या होत्या. यातून माळढोकच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. पर्यायानं माळढोक अभयारण्याचं क्षेत्रही कमी करावं लागलं," असं लोखंडे म्हणाले.

नाणज परिसरात द्राक्षांच्या बागा गेल्या काही वर्षांत वाढलेल्या आहेत. यासाठी शेतकरी बरीच गुंतवणूक करतात आणि मोठे परिश्रम घेतात. म्हणून ते नुकसान थांबवण्यासाठी माळढोक नको, असा सूर उमटत होता.

माळढोकची महाराष्ट्रातली स्थिती

महाराष्ट्रात माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी 1979 साली सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतला अधिवास मिळून एक अभयारण्य बनवण्यात आलं. सुरुवातीला हे अभयारण्य 8,400 चौरस किलोमीटर इतकं होतं. या अभयारण्यात सर्वांत मोठा भाग नाणज या गावातला आहे.

सोलापूर आणि अहमदनगरमधले प्रत्येकी तीन तालुके मिळून एकूण 366 चौरस किलोमीटरवर हे अभयारण्य पसरलं आहे.

पण चंद्रपूरमध्ये माळढोकचा अधिवास संरक्षित नाही.

माळढोक

फोटो स्रोत, Sarang Mhamane

फोटो कॅप्शन, नाणज इथल्या अभयारण्यात 3 वर्षांपूर्वी दोन नर पक्षी दिसले होते.

नाणज परिसरात GIB ची फिरती पथकं आहेत. या पथकात असणारे पक्षीप्रेमी शिवकुमार मोरे यांनी सांगितलं की, माळढोकची एक मादी जून-जुलैमध्ये दिसली होती. गेल्या वर्षी याच परिसरात दोन माद्या दिसल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.

यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं गवताची उंची वाढलेली आहे, त्यामुळे माळढोक दिसण्यात अडचण येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातलं माळढोकसाठी अधिवास योग्य क्षेत्र

2015 साली WII आणि वनविभागानं नाणज आणि चंद्रपूरमध्ये माळढोकचा Satellite Telemetry Survey घेतला होता. यामध्ये माळढोकला GPS बसवून त्यांच्या अधिवासाचा अभ्यास करण्यात आला.

संरक्षित क्षेत्राबाहेरही माळढोक वावरत असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं होतं. माळढोकसाठी महाराष्ट्रातील जवळपास 50,000 चौरस किलोमीटर क्षेत्र सुयोग्य असल्याची माहिती WIIच्या हबीब यांनी दिली.

माळढोक

फोटो स्रोत, Shivkumar More

फोटो कॅप्शन, नाणजमधील माळढोकचा जुना फोटो.

मनुष्यवस्ती असलेल्या परिसंस्थेत माळढोकचं संरक्षण आणि संवर्धन कसं करता येईल, याबद्दल सूचना या अभ्यासात करण्यात आल्या आहेत.

ट्रॅकिंग द ग्रेट इंडियन बस्टार्ड इन महाराष्ट्र या नावानं हा अभ्यास करण्यात आला आहे.

line

अभ्यासातील सूचना

1. अधिवास क्षेत्रात कीटकनाशकांचा वापर कमी करणे, सेंद्रिय शेतीचा स्वीकार करणे.

2. वन्यजीवस्नेही शेतीचा अंगीकार करणे. काही जमीन वन्यजीवांसाठी सोडून देणे.

3. पारंपरिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवणे.

4. मनुष्यवस्ती असलेल्या परिसंस्थेत माळढोक संवर्धनात लोकसहभाग वाढवणे.

5. आठ वर्षांत 7 माळढोक विजेच्या तारांना धडकून दगावले आहेत. त्यामुळे अतिउच्च आणि मध्यम दाबाच्या विजेच्या तारा भूमिगत कराव्यात, ही महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. एक माळढोक सुद्धा दगावणे माळढोकच्या अस्तित्वासाठी धोकादायक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

6. माळढोक अभयारण्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव असू नये.

7. बंदिस्त जागेत माळढोकची पैदास करण्याची तातडीची गरज. या पक्ष्याचं प्रजनन अत्यंत संथ असल्यानं बंधिस्त जागेत पैदासचा प्रकल्प यशस्वी होण्यात बराच वेळ लागेल असं यात म्हटलं आहे. (सध्या राजस्थानमध्ये अशा प्रकल्पाची तयारी सुरू आहे.)

line

त्या दोन नरांचं काय झालं?

ट्रॅकिंग द ग्रेट इंडियन बस्टार्ड इन महाराष्ट्र यासाठी दोन नर माळढोक पक्ष्यांना जीपीएस बसवण्यातं आले होते. हे दोन्ही नर सध्या ट्रॅक होत, नसल्याची माहिती काही पक्षीप्रेमींनी बीबीसी मराठीला दिली आहे.

वाघाइतकचं महत्त्व

माळढोक हा अतिसंकटग्रस्त असून तो फक्त भारत-पाकिस्तानात आढळणारा पक्षी आहे.

त्याची सध्याची संख्या आणि त्याला लागणाऱ्या परिसंस्थाची नाजूक स्थिती लक्षात घेता, हा पक्ष्याचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन फारच कठीण बनलेलं आहे. वाघ वाचवण्याला जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व या पक्ष्यालाही आहे, असं सुजीत नरवडे म्हणाले.

माळढोक

फोटो स्रोत, Shivkumar More

फोटो कॅप्शन, नाणजमध्ये काही वर्षांपूर्वी दिसलेला नर माळढोक.

"माळरान आणि गवताळ प्रदेशची स्वतःची अशी एक जैवविविधता असते. पण सरकारदरबारी अशा जमिनींची नोंद ही पडजमिनी किंवा गायरान अशी झालेली असते. त्यातून या जैवविविधेतकडं मोठं दुर्लक्ष होतं," असं नरवडे यांनी सांगितले.

भारतातील माळढोक

माळढोकची भारतातील संख्या 250च्या आसपास आहे. राजस्थानमधल्या डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये सर्वाधिक म्हणजे 100 ते 125 माळढोक आहेत. तर इथल्या अजमेर, पाली आणि टोंक जिल्ह्यात 25 ते 50 माळढोक आहेत.

तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सुद्धा माळढोक आहेत. मध्यप्रदेशातल्या ग्वाल्हेर आणि गुजरातमधल्या माळढोकची संख्या कमालीची घटली आहे.

भारतात 1980च्या दशकात 1500 ते 2000 इतके माळढोक होते, पण अधिवास नष्ट होत गेल्यानं माळढोकची संख्या पुढे कमालीची घटली.

भारतातल्या माळरानांवर माळढोक मोठ्यासंख्येनं होते. पूर्वीच्या 90 टक्के भूभागावरून माळढोक नामशेष झाला आहे. 18 आणि 19व्या शतकात सिंधू आणि यमुना नद्यांचा मैदानी प्रदेश, कच्छ, गुजरात, दख्खन, मध्यभारत, हैद्राबाद, म्हैसूर अशा मोठ्या प्रदेशावर माळढोकचा वावर होता.

माळढोक

फोटो स्रोत, Shivkumar More

फोटो कॅप्शन, नाणजमधील माळढोकच्या मादीचा जुना फोटो.

एकेकाळी मोठ्याप्रमाणावर शिकार तर आता अधिवास नष्ट होत असल्यानं माळढोकचं अस्तित्व संकटात आहे. अहमदनगरमध्ये 1809 ते 1829मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं 961 माळढोक मारल्याची नोंद आहे.

line

असा असतो माळढोक

  • माळढोक हा उडू शकणाऱ्या पक्षांतील सर्वात वजनदार पक्षी आहे.
  • नराची उंची 122 सेंमी तर मादीची उंची 92 सेंमी असते. नराचं वजन 14 किलो तर मादीचं वजन 6.75 किलोपर्यंत असतं.
  • विणीच्या हंगामात मादी 1 अंड देते. या पक्ष्याचं प्रजनन फार संथ आहे, ही सुद्धा त्यांच्या संवर्धनात मोठी अडचण आहे.
  • माळढोकसाठी 30 ते 35 सेंमी इतक्या उंचीचं आणि मध्येमध्ये उंच गवत असणारा अधिवास माळढोकला लागतो.
  • माळढोकची अधिवासाची गरज आणि त्याची वर्तणूक ऋतूनुसार बदलत जाते.
  • जेव्हा विणीचा हंगाम नसतो तेव्हा शेती-गवताळ-झुडपं असा प्रदेश तो पसंत करतो.
  • विणीच्या हंगामात नराला डिस्प्लेससाठी कमी उंचीच्या गवताचा परिसर तर मादीला अंड घालण्यासाठी आणि ते उबवण्यासाठी उंच गवताचा आणि खुरट्या झुडपांचा परिसर लागतो.
  • दिवसा विश्रांतीची जागा, खाद्य शोधण्यासाठीची जागा अशी विविधतापूर्ण परिसंस्था माळढोकला लागते. नर पक्ष्याची हद्द ठरलेली असते.
  • प्रजननकाळात नर त्याच्या गळ्याखालची पिशवी फुलवून अणि शेपटीची पिसं पसरवून मोठमोठ्यानं चित्कारत मादीला आकर्षित करतो.

माळढोकला असलेले धोके

1. संकटातील अधिवास आणि शिकार

माळढोकला माळरानांची परिसंस्था लागते. माळरान सर्वात दुर्लक्षित परिसंस्था मानल्या जातात. संपत चाललेला अधिवास हे माळढोकसमोरील सर्वात मोठं संकट आहे. हे संकट कमी होण्यापेक्षा कितीतरी पटीनं वाढलेलं आहे.

माळढोक

फोटो स्रोत, Sujit Narawade

फोटो कॅप्शन, अधिवास क्षेत्रातील विकासकामे माळढोकच्या अस्तित्वाल मोठा धोका ठरलीत. वरोरा इथं उर्जा प्रकल्पानजीक घेण्यात आलेला हा माळढोकचा फोटो.

माळरानांवर होत असलेली विकासकामं, माळरानांचा शेतीसाठी वापर अशा विविध कारणांनी माळरान संपत चाललं आहे.

पूर्वी माळढोक मोठ्याप्रमाणावर शिकारींना बळी पडले. आताही राजस्थानात माळढोकच्या शिकारीचे तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात माळढोकच्या अंड्याच्या चोरीचे प्रकार नोंद आहेत.

2. पवनचक्क्या, विजेच्या तारा

विजेच्या तारा, पवनचक्क्या आणि इतर अडथळे यांना धडकून माळढोक मरण्याची संख्या चिंताजनक आहे. सोलापुरातून अशा घटनांची नोंद आहे. प्रजननकाळात माळढोकचे फोटो काढणाऱ्या अतिउत्साही मंडळींचाही पक्ष्यांना त्रासच होतो.

3. माळरानावर वृक्षारोपण

माळरानांवर चुकीच्या पद्धतीनं झाड लावून तिथं जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा माळढोकसाठी धोकादायक ठरत आहे.

4. कीटकनाशकांचा वापर

कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणा वापर आणि माळरानांवर अतिचराई यांचा माळढोकला आणि एकूण अधिवासाला मोठा धोका आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)