प्रेस रिव्ह्यू : 'पंतप्रधान मोदी हे देशाचे बाप आहेत', संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी 'मोदी देश के बाप है' असं म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

संबित पात्रा यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान झाला आहे असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

"वादग्रस्त वक्तव्य केलं म्हणून जसं काँग्रेसनं मणिशंकर अय्यर यांची हकालपट्टी केली तशी संबित पात्रांची देखील करावी," अशी मागणी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांच्यासोबत वाद घालताना संबित पात्रा यांनी पंतप्रधान मोदी हे देशाचे बाप आहेत असं म्हटलं. त्यावरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

सीआरपीएफ जवानानं केली सहकाऱ्यांची हत्या

सीआरपीएफ जवानानं आपल्याच बटालियनमधल्या चार जवानांवर गोळीबार करून त्यांची हत्या केल्यामुळं खळबळ उडाली आहे.

सीआरपीएफ

फोटो स्रोत, cg khabar/bbc hindi

छत्तीसगडमधल्या बिजापूरमध्ये सीआरपीएफच्या बासगुडा छावणीत शनिवारी संध्याकाळी 5 वाजता हा प्रकार घडला, असं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

सीआरपीएफ जवान सनथ कुमार यानं आपल्या तीन वरिष्ठांवर आणि एका समकक्ष जवानावर एके-47 रायफलनं गोळीबार केला.

या हल्ल्याचा कारण अजून स्पष्ट झालं नसल्याचं सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सनथ कुमारला अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे पुन्हा इमर्जन्सी लॅंडिंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा जमिनीवर आणावं लागलं, असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस

२५ मे रोजी लातूर दौऱ्यावर असताना निलंगा येथून उड्डाण घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या पात्यांचा वीजेच्या तारांना स्पर्श झाल्यानं ते कोसळलं होतं. या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते.

विराट आणि अनुष्का लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं लवकरच शुभमंगल सावधान होणार आहे असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

विराट

फोटो स्रोत, Getty Images

इटलीमध्ये 'टसकनी' या अलिशान रिसॉर्टमध्ये त्या दोघांचं लग्न होईल असं सांगितलं जात आहे. पुढील आठवड्यात पंजाबी पद्धतीनं हे लग्न होणार आहे, अशी चर्चा आहे. 26 डिसेंबरला मुंबईला रिसेप्शन होणार असल्याचं हिंदुस्तान टाइम्सनं म्हटलं आहे.

ब्लूटूथ आणि ईव्हीएम कनेक्ट?

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात शनिवारी 68 टक्के मतदान झालं. गेल्या निवडणुकीमध्ये 70.7 टक्के मतदान झालं होतं.

काँग्रेस नेता अर्जुन मोढवाडिया

फोटो स्रोत, Getty Images

पहिल्या टप्प्यात मतदान शांततेत पार पडलं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी ईव्हीएम मशीन ब्लुटूथद्वारे मोबाईल फोनला जोडण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडं केली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)