'नज' थिअरीसाठी थेलर यांना गौरवण्यात येणार आहे

फोटो स्रोत, AFP
अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकांच्या वागणुकीसंदर्भात अर्थशास्त्रीय अभ्यासाकरता थलेर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
'बिहेव्हिअरिअल इकॉनॉमिक्स' अर्थात अर्थशास्त्रामागचं मानसशास्त्र उलगडण्यात थेलर यांची भूमिका निर्णायक आहे.
शिकागो बूथ बिझनेस स्कूलचे थलेर लोकप्रिय अशा 'नज' पुस्तकाचे सहलेखक आहेत. माणसं चुकीचे किंवा अतार्किक निर्णय का घेतात याबाबत पुस्तकात भाष्य करण्यात आलं आहे.
संपत्ती खर्च करण्याच्या लोकांच्या सवयींमध्ये नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने थेलर यांनी नजिंग नावाची संकल्पना मांडली.
सामान्यांची खर्च करण्याची आर्थिक क्षमता आणि खर्च करण्याची मानसिकता याबाबत थेलर यांनी संशोधन केलं आहे. थेलर सध्या शिकागो विद्यापीठात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
बक्षीसाचा भाग म्हणून थेलर यांना 850, 000 युरो इतक्या रकमेनं गौरवण्यात येणार आहे. ही रक्कम मुक्तपणे खर्च करेन असं 72 वर्षीय थलेर यांनी सांगितलं.
नजिंग
थेलर यांच्या प्रयत्नांमुळे इंग्लंडमध्ये माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखाली नजिंग युनिट 2010मध्ये स्थापन करण्यात आलं होतं.
नागरिकांचं सार्वजनिक क्षेत्रातील वागणं बदलण्याच्या दृष्टीनं काही वेगळे पर्याय शोधण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. या गटाच्या शाखा इंग्लंड, न्यूयॉर्क, सिंगापूर आणि सिडनी इथेही आहेत.
आर्थिक निर्णय घेताना लोकांची मानसिकता कशी निर्णायक ठरते या विषयावर थेलर यांचं संशोधन महत्त्वाचं आहे असं नोबेल पुरस्कार समिती परीक्षक पेर स्ट्रोमबर्ग यांनी सांगितलं.
थेलर यांच्या पुढाकारामुळे अर्थकारण आणि मानसशास्त्र या शाखांच्या परस्परसंबंधीच्या संशोधनाला चालना मिळाली आहे.
अनेक अर्थतज्ञ या विषयाचे कंगोरे उलगडत असल्यानं अर्थशास्त्रातलं नवं दालन खुलं झालं आहे असं स्ट्रोमबर्ग यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Paramount
ग्राहकाला भुलवण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या विपणन क्लृप्त्या अर्थात मार्केटिंग तंत्रानं हुरळून न जाता व्यावहारिक निर्णय घेताना थेलर यांनी मांडलेला सिद्धांत उपयुक्त ठरला आहे.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैसे कसे साठवावेत यासाठी नियोजन कसं करावं यावर थेलर यांचा सिद्धांत प्रकाश टाकतो.
2007 आणि 2008 मध्ये आर्थिक मंदीची लाट येण्यासाठी कारणीभूत गुंतागुंतीची आर्थिक कारणं ही कथा असणाऱ्या 'द बिग शॉर्ट' या चित्रपटात थेलर यांनी कामही केलं होतं.
गेल्या पंधरवड्यात औषध, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेसाठीचे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Reuters
पुरस्कारांचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांनी अर्थशास्त्रासाठीच्या पुरस्काराची सुरुवात केली नव्हती. अल्फ्रेड यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षानंतर 1968 पासून अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येऊ लागला.
अमेरिकेच्या अर्थतज्ज्ञांनी या पुरस्कारावर सातत्यानं वर्चस्व गाजवले आहे. 2000 ते 2013 या कालावधीत अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ किंवा संस्थांनी या पुरस्कारावर नाव कोरलं होतं.
गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये जन्मलेले ऑलिव्हर हार्ट आणि फिनलंडचे बेंगट होल्मस्टॉर्म यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला होता.
अर्थशास्त्राच्या नोबेलसाठी यंदा भारताच्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव चर्चेत होतं. पण थेलर यांनी बाजी मारली. आतापर्यंत 78 जणांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








