भीमा कोरेगाव प्रकरणी अटक झालेले सुधीर ढवळे कोण आहेत?

फोटो स्रोत, Sudhir Dhawale/ Facebook
विद्रोही मासिकाचे संपादक सुधीर ढवळे यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्यासह नागपूरमधल्या Indian Association of People's Lawyersचे सरचिटणीस सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठातल्या प्राध्यापिका शोमा सेन, Committee for the Release of Political Prisoners चे जनसंपर्क सचिव रोना विल्सन आणि भारत जनआंदोलन संघटनेचे कार्यकर्ते महेश राऊत यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर 8 जानेवारीला पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. 31 डिसेंबरला शनिवारवाड्यावर आयोजित केलेल्या एल्गार परिषदे प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता.
याच गुन्ह्याच्या अनुषंगानं या पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 31 डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत गुजरातमधील दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवानीही सहभागी झाले होते.
पुणे पोलीस सहआयुक्त रविंद्र कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अटकेविषयी माहिती दिली.

फोटो स्रोत, BBC/MAYURESH KONNUR
ते म्हणाले, "आम्ही सुधीर ढवळेंना मुंबईहून, सोमा सेन, महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांना नागपूरहून आणि रोमा विल्सन यांना दिल्लीहून अटक केली आहे.
"त्यांचे CPI माओवादी या बंदी असलेल्या संघटनेबरोबर संबंध होते. ते या संघटनेबरोबर काम करत होते. एल्गार परिषदेत भडकाऊ भाषणं दिली अशा आशयाचा FIR दाखल झाला होता. त्या अनुषंगानं या प्रकरणाची चौकशी करताना आम्ही कबीर कला मंचाच्या सदस्यांच्या घरून आणि इतर ठिकाणाहून आम्हाला काही धागेदोरे मिळाले. या संघटनेचे नेते सरकारविरुद्ध विविध शहरात अराजक माजवण्याचं काम करतात."
या अटकेनंतर एल्गार परिषेदेचे संयोजक आकाश साबळे आणि जोती जगताप यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली.
यावेळी त्यांनी पोलिसांवर आरोप केले, कुठलेही पुरवे नसताना ही अटक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी या चौघांना सरकारनं अटक केल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे
या अटकेवर प्रतिक्रिया व्क्त करत जिग्नेश मेवाणी यांनी ट्वीट करून हा आंबेडकरी चळवळीवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोण आहेत सुधीर ढवळे?
- सुधीर ढवळे हे मूळचे नागपूरचे आहेत. डाव्या-आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि 'विद्रोही' मासिकाचे संपादक म्हणून ते ओळखले जातात.
- गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईत राहतात. 1995 पर्यंत मुक्त पत्रकार आणि सुधारणावादी चळवळीचे पूर्ण कार्यकर्ते म्हणून काम करत होते.
- 1997 मध्ये झालेल्या घाटकोपरमधील रमाबाई नगर गोळीबार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला होता.
- 1999 मध्ये झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या साहित्य संमेलनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर विद्रोही साहित्य चळवळ सुरू झाली. या चळवळीचाच भाग म्हणून त्यांनी विद्रोही प्रकाशन सुरू केलं.

फोटो स्रोत, BBC/MAYURESH KONNUR
- 'विद्रोही' नावाचं मासिकही त्यांनी सुरू केलं. गेल्या 18 वर्षांपासून ते विद्रोहीचे संपादक आहेत. विद्रोही मासिकामधून महिला, शेतमजूर, जातीय अत्याचार, शिक्षण असे विषय हाताळले. विद्रोही मासिकाच्या सुमारे 2000 प्रतीचं खासगी वितरण केलं जातं.
- दलित आणि आदिवासी यांच्या शोषणाविरोधात समाजप्रबोधन करण्यासाठी माहितीपत्रकं आणि पुस्तिका विद्रोही प्रकाशानाकडून प्रकाशित केल्या जातात.
- दलित अत्याचारांच्या घटनेनंतर त्या घटनांचा पाठपुरावा करण्यासाठी ते सक्रिय होते. औरंगाबाद, बीड, सातारा, नागपूर, हिंगोली, नवी मुंबई आणि मुंबईतल्या काही केसेसमध्ये पाठपुरावा करण्यात त्यांचा सहभाग होता. खैरलांजीविरोधातल्या निदर्शनात सुधीर ढवळे सक्रिय होते.
- ढवळे यांना यापूर्वीही एकदा अटक झाली आहे. त्यांना 2 जानेवारी 2011 रोजी वर्धा रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली होती.
- युवा दलित साहित्य परिषद आणि वर्ध्यातील अॅट्रॉसिटीच्या केसेसचा पाठपुरावा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीतून परतताना त्यांना अटक करण्यात आली होती.
- नक्षल चळवळीशी संबंध असल्याचा आरोप ठेवून देशद्रोहाच्या गुन्हाअंतर्गत ही अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकून संगणक आणि पुस्तकं ताब्यात घेण्यात आली होती.
- बेकायदेशीर कृत्यात ढवळे यांचा सहभाग असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. त्यानंतर ढवळे यांच्या समर्थकांनी 'सुधीर ढवळे मुक्तता अभियान' या नावानं समिती स्थापन केली. त्यांच्यासह नऊ जणांना 15 मे 2014 ला गोंदिया सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. ते 40 महिने तुरुंगात होते.
- निर्दोष सुटका झाल्यानंतर ते पुन्हा विद्रोही चळवळीत सक्रिय झाले होते. भीमा कोरेगाव हिंसाचारापूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी ते एक होते.

'लक्ष विचलित करण्यासाठी अटक'
राजकीय विश्लेषक आणि लोकशाही हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस डॉ. आनंद तेलतुंबडे या अटकेवर बीबीसीकडे प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि इतरांवर हिंसाचाराला कारणीभूत असल्याचा आरोप असताना त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी नक्षलवाद्यांचा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्यायालयीन आयोगासमोर हिंदुत्ववादी संघटना आणि सरकारच्या विरोधात पुरावे सादर होऊ नयेत म्हणून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. खऱ्या आरोपींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे."
विद्रोही चळवळीतील ढवळे यांचे सहकारी आणि जातीअंत संघर्ष समितीचे कॉ. सुबोध मोरे यांनीही बीबीसीशी बोलताना सरकारवर आरोप केले आहेत.
ते म्हणतात, "आंबेडकरी आणि डावे एकत्र आल्यास त्यावर नक्षलवादाचा शिक्का मारायचा हा प्रकार सरकारी यंत्रणेकडून खैरलांजी प्रकरणापासून सुरू आहे. ही अटकेची कारवाई त्याचाच एक भाग आहे."

ढवळे यांचे गेल्या 15 वर्षांपासून सहकारी असलेले आणि विद्रोही मासिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य श्याम सोनार यांनी बीबीसीला सांगितलं, "भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी राज्य सरकारनं नेमलेल्या आयोगासमोर ढवळे आणि इतर मंडळी महत्त्वाचे पुरावे गोळा करून सादर करणार होते. हे पुरावे सादर करता येऊ नयेत म्हणूनच त्यांना अटक करण्यात आली. तसंच इतर गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठी आम्ही नक्षलवाद्यांना अटक केली असं सरकारला दाखवायचं आहे."
या संपूर्ण प्रकरणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "पोलीस आपलं काम करत आहेत. जे काही तपासात त्यांच्यासमोर येत आहे त्यानुसार ते कारवाई करत आहेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








