'मीसुद्धा उपोषणाला बसलोय कारण....'

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र यांनी आता दिल्ली गाठली आहे. रामलीला मैदानावर अण्णा हजारेंबरोबर तेही आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.

अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. अण्णांबरोबर उपोषण आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये नरेंद्र धर्मा पाटीलही आहेत.

"संपादित जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल, तुमच्यावर अन्याय केला जाणार नाही," असं आश्वासन नरेंद्र धर्मा पाटील यांना सरकारनं दिलं होतं.

गेल्या तीन दिवसांपासून नरेंद्र पाटील दिल्लीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या हातात असलेली फाईल आजही तशीच कायम आहे.

"इतर शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हालाही संपादित जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल, असं लेखी आश्वासन सरकारनं मला दिलं होतं. आज दोन महिने होत आलेत तरी मला योग्य मोबदला मिळाला नाही. म्हणूनच मी आज दिल्ली गाठलीय. अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत, मीही त्यांच्या उपोषणात सहभागी व्हायला आलो आहे," नरेंद्र पाटील यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

नरेंद्र यांचे शेतकरी वडील धर्मा पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी मुंबईत मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

दरम्यान सरकारने 48 लाख रुपयांचा योग्य मोबदला दिला असल्याचं सरकारच्या वतीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

2 महिन्यांत काय झालं ?

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर नरेंद्र पाटील यांना सरकारनं सर्वप्रथम लेखी आश्वासन दिलं. त्यानंतरच नरेंद्र पाटील वडिलांचं पार्थिव गावाकडे घेऊन जाण्यास तयार झाले. काही दिवस उलटताच बँकेत 48 लाख रुपये जमा झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

"एके दिवशी मला कळालं की माझ्या खात्यावर 24 लाख आणि बाबांच्या खात्यावर 24 लाख असे एकूण 48 लाख रुपये जमा झाले आहेत. पैसे जमा करण्यापूर्वी सरकारनं मला काहीच कल्पना दिली नव्हती. मला हे कळलं तसं मी बँकेत गेलो. नंतर कलेक्टर साहेबांना निवेदन लिहून ही रक्कम मला मान्य नसल्याचं सांगितलं," आत्महत्येनंतरचा घटनाक्रम नरेंद्र सांगतात.

"त्यानंतर एका रात्री मला फोन आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्रालयात अर्जंट मीटिंग आहे, तुम्हाला हजर राहायचं आहे, असं सांगण्यात आलं. मग मी मुंबईला गेलो. खात्यात जमा झालेली रक्कम स्वीकारा असं मला त्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहून रक्कम स्वीकारण्यास नकार दिला," नरेंद्र यांनी बीबीसीला सांगितलं.

त्यांनतर नाशिक ते मुंबई दरम्यान काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चमध्ये नरेंद्र सहभागी झाले. या दोन महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू अशा अनेक नेत्यांनी नरेंद्र पाटील यांची भेट घेतली.

"सत्ताधारी आणि विरोधक अशा डझनभर नेत्यांना मी भेटलोय, पण अजूनही न्याय मिळत नाही," असं नरेंद्र सांगतात.

पाटील यांना किती मोबदला हवा?

धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. मोबदला म्हणून त्यांना 4 लाख 3 हजार रुपये देण्यात आले. शेजारच्या शेतकऱ्याला मात्र दोन एकर जमिनीसाठी 1 कोटी 89 लाख रुपये देण्यात आले.

"आमची जमीन सरकारनं 2 रुपये स्क्वेअर फुटानं घेतली आणि बाजूच्या शेतकऱ्याची मात्र 2000 रुपये स्क्वेअर फुटानं खरेदी केली. शासन आमच्यासोबत असा भेदभाव का करत आहे?" असा सवाल नरेंद्र करतात.

"2012साली जयकुमार रावल यांनी गावातली 4 एकर 'जिरायत' जमीन 35 लाख रुपयांना खरेदी केली. म्हणजे एकरी जवळपास 9 लाख हा भाव होता तेव्हा. सरकारचा नियम आहे की, संपादित जमिनीच्या मोबदल्यात चारपट रक्कम देण्यात यावी. माझी 5 एकर जमीन संपादित करण्यात आली. तीही बागायती. तरीसुद्धा एकरी 9 लाख पकडल्यास माझ्या जमिनीची किंमत 45 लाख होते. या 45 लाखांची चार पट रक्कम किती होते ते तुम्ही पाहा? आणि मला किती मिळाले तेही पहा?" योग्य मोबदला म्हणजे किती असं विचारल्यावर नरेंद्र सांगतात.

एकट्या विखरणमध्येच 500 धर्मा पाटील?

2016 साली महाराष्ट्र सरकारने सौर ऊर्जा वीज प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातली एक हजार हेक्टर जमीन संपादित केली. यामध्ये विखरण (देवाचे) गावातल्या जवळपास 500 शेतकऱ्यांच्या जमिनीचा समावेश होतो.

"सुरुवातीला हा 24 हजार 500 कोटींचा औष्णिक वीज प्रकल्प होता. प्रकल्पातील 5 टक्के रक्कम गावाच्या विकासावर खर्च करू असं सरकारनं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर प्रकल्पाचं रूपांतर 550 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पात करण्यात आलं. यात मात्र गावाच्या विकासासाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही, सरकारनं गावाची फसवणूक केली आहे," गावातल्या परिस्थितीबद्दल ग्रामस्थ विकास पाटील सांगतात. विकास पाटील आणि गावातली इतर काही मंडळीदेखील अण्णांच्या उपोषणासाठी आली आहेत.

"आमची 2.19 हेक्टर इतकी जमीन सरकारनं औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी 2011साली खरेदी केली. त्याचा मोबदला म्हणून आम्हाला हेक्टरी 10 लाख रूपये देण्यात आले. शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. आता मात्र औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचं रूपांतर सौर ऊर्जा प्रकल्पात झाल्यामुळे नोकरीच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत," असं 2011पासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले विखरणचे शेतकरी रवींद्र जयसिंग राजपुत सांगतात.

सरकार काय म्हणतंय ?

धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या मोबदल्याविषयी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदा खोत यांना विचारलं असता ते म्हणाले, "धर्मा पाटील यांच्या जमिनीचं व्हॅल्यूएशन (मूल्यांकन) आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलं होतं. त्यांनी कमी मोबदला दिला चूक होती. आम्ही मात्र त्यांच्या जमिनीवरील फळझाडं, बाग आणि विहिरीचा विचार करून त्यांना योग्य मोबदला (48 लाख रुपये) दिला आहे."

आघाडी सरकारनं जर चूक केली असेल तर तुम्ही ती सुधारू शकत नाही का? यावर सदा खोत सांगतात, "कायद्यानं योग्य ती रक्कम आम्ही पाटील कुटुंबीयांना दिली आहे. पण आता प्रत्येक जण म्हणेल तोच योग्य मोबदला मानायचं असेल तर देशात मनमानी सुरू होईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)