एल्गार मोर्चा : भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा - प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चाला संभाजी ब्रिगेडनं पाठिंबा दिला होता. आझाद मैदानात मोठ्य़ा प्रमाणात लोकांची गर्दी उसळली होती.

आज विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी चर्चेची मागणी केली. प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर एल्गार मोर्चा मागे घेतला आहे. मात्र, 8 दिवसांत संभाजी भिडेंना अटक केली नाही तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, या एल्गार मोर्चाबाबत आज सकाळपासून घडलेल्या घटनांचं वृत्त इथं देण्यात आलं आहे. आता आम्ही हा लाईव्ह ब्लॉग बंद करत आहोत.

4.45 वाजता

भिडेंना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालू - प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी आझाद मैदानात जमलेल्या मोर्चेकऱ्यांनां संबोधित केलं.

आंबेडकर म्हणाले, "भिडेंचे सहकारी रावसाहेब पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली होती. मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देणाऱ्यांना पोलीस अटक का करत नाही? तसंच भिडेंना पंतप्रधान मोदी स्वतः पाठीशी घालत आहेत. मोदी तुम्ही हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न करू नका. 8 दिवसांत भिडेंना अटक करा अन्यथा विधानसभेला घेराव घालू आणि अटकेचे आदेश देईपर्यंत हा लढा चालू ठेऊ."

4.15 वाजता

भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा - प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी आंबेडकर म्हणाले, "भिडे यांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना 8 दिवसांची मुदत दिली आहे. तसंच सरकारानं या प्रकरणात कोर्टाचं काम करू नये. भिडे यांना अटक केल्यावर कोर्ट योग्य न्याय करेल. भिडे यांच्यासह त्यांचे सहकारी रावसाहेब पाटील यांना अटक करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाजी भिडे यांना पाठिंबा आहे. त्यामुळेच त्यांना अजूनही अटक झालेली नाही. तसंच या प्रकरणात 307चा गुन्हा एकावर लागला असताना दुसऱ्यांना का अटक करत नाही? त्यामुळे भिडेंना अटक नाही केली तर अनेकांना ते भय राहणार नाही."

यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन दिल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

3.15 वाजता

प्रकाश आंबेडकर सहा जणांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला रवाना. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर उपस्थितांना संबोधित करतील.

3.00 वाजता

मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्याआधी काय बोलले प्रकाश आंबेडकर

2.35 वाजता

संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा विधानपरिषदेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही उचलला. ते सभागृहात म्हणाले, "भीमा कोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाले. मात्र दुसरे आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? संभाजी भिडेंना अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत."

संभाजी भिडेंना अटक का होत नाही असा सवाल करतानाच मुंडे यांनी सभागृहातील सर्व विषय बाजूला ठेवून त्यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी अशी मागणी केली.

2.30 वाजता

सभेनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं प्रकाश आंबे़डकर यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

दुपारी 2 वाजता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण.

दुपारी 1. 40 वाजता

आझाद मैदानात सभेला सुरुवात. संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक सुहास राणे सभेच्या मंचावर उपस्थित. लिंगायत समाजाची महाराष्ट्र बसव परिषद, धनगर समाजाची यशवंत सेना, मराठा सेवा संघ, भीम आर्मी आणि माकप या संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. भाकपचे प्रकाश रेड्डी सुद्धा मंचावर उपस्थित.

दुपारी 1 वाजता

थोड्याच वेळात सभेला होणार सुरुवात

दुपारी 12 वाजता

आझाद मैदानात जमलेल्या विद्यार्थ्यांचा हल्लाबोल.

सकाळी 11.52 वाजता

भायखाळाच्या राणीचा बाग परिसरातही काही आंदोलकांची उपस्थिती, पोलिसांचा देखील बंदोबस्त

सकाळी 11.35 वाजता

दुसरा आरोपी सरकारचा जावई आहे का? प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल

सकाळी 11.15 वाजता

आझाद मैदानात आंदोलकांची गर्दी

सकाळी 11 वाजता

मुंबईतल्या या मोर्चासाठी सीएसएमटी स्थानका बाहेर मोर्चेकऱ्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. लोकल रेल्वेनं प्रवास करून आंदोलक इथं पोहोचत आहेत.

पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईसह राज्याच्या वेगवगेळ्या भागातून लोक या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले आहेत.

संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात संभाजी ब्रिगेडचे मुंबई, पुणे आणि कोकणातले कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असं संभाजी ब्रिगेडतर्फे सांगण्यात येत आहे.

या निमित्तानं एक वेगळं राजकीय आणि जातीय समीकरण दिसून येणार आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले, "हा सामाजिक विषय आहे. त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न नाही. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्यासाठी काहींनी प्रयत्न केला, पण आम्ही त्याला थारा देणार नाही, आम्ही तेढ निर्माण होऊ देणार नाही."

"हे सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगावमध्ये हिंसा झाली. आम्ही भीमा कोरेगावमधला खरा शत्रू पुढे आणला. यापुढेही छोट्या-छोट्या गावांमध्ये सलोखा राखण्यासाठी ब्रिगेड काम करेल", असंही शिंदे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत, त्यामुळेच त्यांना टार्गेट करण्यासाठी दोन समाज एकत्र येऊन असे मोर्चे काढत आहेत असा आरोप होतोय, त्याविषयी शिंदे यांना विचारलं असता, ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांची जात ब्राह्मण आहे म्हणून नाही तर त्यांची वृत्ती जातीयवादी आहे. मुख्यमंत्र्यांची जात हा विषयच नाही, हे सरकारच आरएसएसवाल्यांचं आहे. त्यांची विचारधारा देश तोडण्याची आहे. आम्ही बुद्ध आणि शिवाजी राजांच्या विचारांवर काम करतो."

प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वेगळा आहे तसंच आमची संघटना वेगळी आहे पण समाजासाच्या भल्यासाठी मोर्चाला पाठिंबा देत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

पोलिसांनी परवानगी नाकारली

प्रकाश आंबेडकर यांच्या या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. फक्त आझाद मैदानात एकत्र येण्यासाठी मोर्चेकऱ्यांना परवानगी देण्यात आल्याचं मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)