You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेत का उतरलेत लाखो नागरिक रस्त्यावर?
बंदूक खरेदी-विक्रीवर सरकारचं काटेकोर नियंत्रण असावं, या मागणीसाठी पूर्ण अमेरिकेत निदर्शनं होत आहेत.
या निदर्शनांना 'मार्च फॉर अवर लाइव्हस्' असं म्हटलं जात आहे. अमेरिकेत 800हून अधिक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. अमेरिकेतला सर्वांत मोठा मोर्चा वॉशिंग्टनमध्ये होत आहे. या मोर्चामध्ये 5 लाखाहून अधिक लोक सहभागी झाले आहेत.
गेल्या महिन्यात फ्लोरिडामध्ये एका शाळेत गोळीबारीची घटना झाली होती. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता.
त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे.
कठोर नियंत्रणाची मागणी
या आंदोलनाला जगभरात प्रतिसाद मिळत आहे. लंडन, एडिनबरा, जिनिव्हा, सिडनी आणि टोकिओ या ठिकाणी देखील निदर्शनं झाली.
वॉशिंग्टनमध्ये झालेल्या मोर्चात तर गर्दी इतकी आहे की या ठिकाणी फक्त उभं राहण्यास जागा आहे, असं आयोजकांचं म्हणणं आहे.
या निदर्शनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून बंदूक खरेदी विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.
असॉल्ट हत्यारांवर देखील निर्बंध असावेत अशी मागणी लोक करत आहेत.
शिक्षक आणि स्टाफला प्रशिक्षण
बंदूक खरेदी विक्रीवर नियंत्रणासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची यादी व्हाइट हाऊसनं सादर केली आहे. सरकारनं एक प्रसिद्धिपत्रक छापलं आहे, त्यात त्यांनी आतापर्यंत कोणते कायदे तयार केले याबद्दल सांगितलं आहे.
अमेरिकेत स्टॉप स्कूल व्हायलन्स कायदा आणण्यात येणार आहे, असं त्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. या कायद्यानुसार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे.
शाळांमधली सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासंबंधी पावलं उचलली जातील अशी तरतूद या कायद्यात असेल. बंदूक खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्यात येईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
या निदर्शनांमध्ये लोकांनी हाती फलक घेऊन आपला विरोध नोंदवला. गोळीबारीच्या घटनांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो देखील काही लोकांनी हातात घेतले होते, असं या मोर्चाला उपस्थित असलेले बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सोपेल यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)