You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इरफान खान यांना झालेला दुर्मिळ आजार नेमका काय होता?
अभिनेते इरफान खान यांचं 29 एप्रिल 2020 रोजी निधन झालं. आज त्यांच्या निधनाला दोन वर्षे झाली.
इरफान यांना न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर हा आजार झाल्याचं त्यानं ट्विटरद्वारे सांगितलं होतं. हा आजार दुर्मिळ समजला जातो. शरीराच्या कोणत्याही भागात हा ट्युमर होऊ शकतो.
5 मार्च 2018ला इरफान यांनी त्यांना गंभीर आजार झाला असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सगळेच जण इरफान यांना नेमका कोणता आजार झाला याचा अंदाज लावत होते.
पण नंतर इरफान खान यांनी स्वतः त्याला 'न्युरोएंडोक्राईन ट्यूमर' झाल्याचं ट्वीट करून स्पष्ट केलं.
'...तुमचे संदेश पाठवत राहा'
इरफान खान यांनी तेव्हा ट्वीट केलं होतं की, "जीवनात आलेले अनपेक्षित बदल तुम्हाला पुढे जायला शिकवतात. गेल्या काही दिवसांत माझ्याबाबतीत हेच घडलं आहे. मला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाला आहे आणि हे स्वीकारणं फार कठीण आहे. पण माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत, त्यांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मला शक्ती मिळाली आहे. त्यामुळे मला आशेचा किरण दिसतो आहे. सध्या, या आजाराच्या उपचारासाठी मला दुसऱ्या देशात जाऊन उपचार करावे लागणार आहेत. पण, माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचे संदेश मला पाठवत राहा."
हा मेंदूशी निगडीत आजार आहे का?
आपल्या या आजाराबद्दल इरफान पुढे सांगितलं होतं की, "आजाराच्या नावात न्यूरो ऐकून लोकांना वाटतंय की हा आजार डोक्याशी संबंधित आहे. पण, असं नाही. या आजाराबद्दल अधिक माहिती तुम्हाला गूगलवर नक्की मिळेल. ज्यांनी या आजाराबद्दल माझ्याकडून जाणून घेण्यासाठी वाट पाहिली त्यांच्यासाठी अनेक वेगळ्या कथा घेऊन मी परतणार आहे."
काय होतं या आजारात?
एनएचएस डॉट युके यांच्याकडील माहितीनुसार, न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर हा एक दुर्मीळ प्रकारचा ट्यूमर असून तो शरीराच्या विविध भागात निर्माण होऊ शकतो.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
हा ट्यूमर जास्तकरून आतड्यांमध्ये होतो. रक्तामध्ये हार्मोनचे वहन करणाऱ्या रक्ताच्या पेशींवर या ट्यूमरचा सुरुवातीला परिणाम होतो. हा आजार बऱ्याचदा मंद गतीने वाढतो. प्रत्येक प्रकारात असं होईलच असंही नाही.
या ट्यूमरची लक्षणं काय?
रुग्णाच्या शरीरातल्या कोणत्या भागात ट्यूमर आहे, यावरून लक्षणं कोणती आहेत हे ठरतं. जर ट्यूमर पोटात असेल तर पोटाच्या तक्रारी सतावतात. फुप्फुसात असल्यास कफाचा त्रास जाणवत राहतो. तसंच, हा आजार झाल्यानंतर रुग्णाचे ब्लड प्रेशर आणि रक्तातली साखर यांचे प्रमाण वाढतं किंवा घटत राहतं.
आजाराची कारणं काय?
या आजाराची नेमकी कारणं काय आहेत याच्या निष्कर्षाप्रत अद्यापही डॉक्टर पोहोचू शकलेले नाहीत. न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर होण्याची कारणं अनेक असू शकतात. तसंच हा आजार अनुवांशिकरित्याही होऊ शकतो.
ज्यांच्या परिवारात पूर्वी कोणाला हा आजार झाला आहे त्यांच्या शरीरात हा ट्यूमर उद्भवण्याची शक्यता अधिक असते. सखोल रक्त चाचण्या, स्कॅन आणि बायोप्सी यानंतरच हा ट्यूमर कळून येतो.
उपचार काय केले जातात?
ट्यूमर कोणत्या पातळीचा आहे, शरीराच्या कोणत्या भागात आहे आणि रुग्णाची तब्येत कशी आहे यावरून त्यावरचे उपचार ठरवले जातात. ऑपरेशनकरून हा ट्यूमर काढण्यात येतो. बहुतेक प्रकरणांमध्ये आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशनचा पर्याय स्वीकारला जातो. तसंच, रुग्णांना अशी औषधं दिली जातात, ज्यांच्या परिणामांमुळे शरीरात हार्मोन कमी प्रमाणात सोडले जातात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)