मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 1800 एकर जागेचं भवितव्य काय?

फोटो स्रोत, mumbaiport.gov.in
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी
केंद्रीय जहाज बांधणी आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जागेचा एक इंचही तुकडा नौदलाला देणार नाही, असं विधान नुकतंच मुंबईत केलं होतं. या विधानानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टची मुंबईतली मोक्याची जागा पुन्हा एकदा कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट हे ब्रिटिश काळात मुंबईत सुरू झालेलं पहिलं व्यावसायिक बंदर. कर्नल जे. ए. बॅलार्ड यांच्या अध्यक्षतेखाली 1873 मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट खऱ्या अर्थानं अस्तित्वात आलं.
अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पोर्ट ट्रस्टमधून आजही मोठी व्यावसायिक वाहतूक सुरू आहे. वर्षाला 1 लाखाहून अधिक कंटेनर्सची ये-जा या बंदरातून होते. त्यामुळे पोर्ट ट्रस्टमधून दरवर्षी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होत असते.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात जमीन आहे. दक्षिण मुंबईत जिथं जमिनींचे भाव गगनाच्या पार गेले आहेत, अशा परिसरात 1800 एकर जमीन पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे. त्यावर अनेकांचा डोळा आहे.
दक्षिण मुंबईतली ही जमीन त्यामुळेच चर्चेचा विषय असून या जमिनीवर हजारो कोटींचे प्रकल्प होणार असं आपण नेहमी ऐकतो. विशेषतः 2014मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचे मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत अनेक घोषणा केल्या.
गडकरींच्या कोट्यवधींच्या घोषणा
2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मुंबईतल्या या जमिनीबाबत गडकरी यांनी अनेक मनोदय बोलून दाखवले आहेत. कारण पोर्ट ट्रस्टचा कारभार गडकरींच्या जहाज बांधणी मंत्रालयांतर्गतच येतो.
नितीन गडकरी यांची ताजी आणि महत्त्वाची घोषणा म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल. 11 जानेवारीला या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडला.
300 कोटींच्या खर्चाचं हे टर्मिनल 2019 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. 4.5 लाख चौरस मीटरमध्ये होणारं हे देशातलं पहिलं मोठं टर्मिनल आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर, मध्य मुंबईत शिवडी इथे पोर्ट ट्रस्टमार्फत एक विशाल उद्यान उभारण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली. या उद्यानासाठी तब्बल 350 हेक्टरचं रेक्लमेशन केलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
गडकरी यांच्या घोषणेप्रमाणे मुंबई-गोवा क्रूझ सेवेसाठी देशांतर्गत टर्मिनलही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत होणार असून पुढील महिन्यात त्याचं लोकार्पणही होणार आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हॉस्पिटलचं आधुनिकीकरण होणार असून जवळपास 1000 खाटांचं अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. याचबरोबर ससून डॉक आधुनिकीकरण, तरंगते हॉटेल, सी-प्लेन सेवेसाठी जेट्टी, असे अनेक प्रकल्प येत्या काळात या जमिनींवर किंवा समुद्रात उभारले जाणार असल्याच्या घोषणा त्यांनी यापूर्वी वेळोवेळी केल्या आहेत.
जमीन आहे कुठे?
मुंबई पोर्ट ट्रस्टची दक्षिण मुंबईत 1800 एकर जमीन आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जवळपास 900 एकर जमीन ट्रस्टच्या प्रत्यक्ष वापरात आहे. माहूलपासून शिवडी, कुलाबा, गिरगावपर्यंत ही जमीन विविध तुकड्यांमध्ये पसरली आहे.
दक्षिण मुंबईत सध्या खाजगी जमिनीचा एखादा तुकडाही शिल्लक नसल्यानं या जमिनीला खूप किंमत आहे.
मुंबईतल्या नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी दक्षिण मुंबईतल्या जमिनीची किंमत अंदाजे 30000 ते 50000 रुपये प्रती चौरस मीटर असल्याचं सांगितलं. त्यावरून या जमिनीच्या किमतीचा अंदाज येऊ शकतो.

फोटो स्रोत, mumbaiport.gov.in
मात्र, मुंबई पोर्ट ट्रस्ट ही जमीन स्वतःच विकसित करणार असल्याची घोषणा गडकरी यांनी यापूर्वीच केली असल्यानं ते नौदलालाच काय अन्य कोणत्याही सरकारी अथवा खाजगी आस्थापनेला जमिनीचा तुकडा देण्याच्या ते मन:स्थितीत नाहीत, असं बोललं जात आहे.
मात्र 2014पासून सरकार सत्तेत आल्यानंतर यांसारख्या अनेक घोषणा होऊनही अद्याप या जमिनींवर ठोस काही उभारणी झालेली नाही, असं सुलक्षणा महाजन यांनी स्पष्ट केलं.
जमिनीचं होणार काय?
सुलक्षणा महाजन सांगतात, "सगळ्या अधिकाऱ्यांना दक्षिण मुंबईतल्या मोक्याच्या जागेत रस असतो. तसाच या सरकारलाही या जागेत अधिक रस आहे. पण ही जागा वापरण्याबाबत ठोस पाऊल अद्याप उचललं गेलं नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेच्या वापरासाठी 2015मध्ये राणी जाधव समिती नेमण्यात आली होती. या समितीनं मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा कशी वापरावी, याचा अहवाल नोव्हेंबर 2015 मध्ये सादर केला होता. मात्र या अहवालावर पुढे विशेष काही घडलेले नाही."
"पोर्ट ट्रस्टकडे जागा कशी वापरावी याचं ठोस धोरण दिसत नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, mumbaiport.gov.in
या पार्श्वभूमीवर मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांना विचारलं असता ते म्हणाले, "मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा मास्टरप्लॅन तयार होत असून त्याव्यतिरिक्त या जागेविषयी मी काही बोलणार नाही."
त्यामुळे सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचे काय होणार? हा प्रश्न मात्र कायम राहणार आहे.
नौदलाचं खच्चीकरण?
"नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत घरांसाठी जागा मागण्याऐवजी पाकिस्तानसोबत सीमेवर जाऊन लढावं," असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. ते म्हणाले की, "नौदलाकडून विकासकामात आडकाठी आणली जाते."
मलबार हिल इथल्या जेट्टीला नौदलानं विरोध केल्यानंतर गडकरींनी ही टीका केली होती.
यावर बोलताना संरक्षण तज्ज्ञ आणि पत्रकार समीर कर्वे म्हणाले की, "नौदलाला जागा देणार नाही, हे वक्तव्य अयोग्य आहे. पश्चिम मुख्यालय दक्षिण मुंबईत असल्यानं नौदलाचा याच भागात विकास होत आहे. त्यामुळे त्यांचे कर्मचारी वाढत असल्यानं त्यांना घरांची गरज पडणं, हे साहजिकच आहे."

फोटो स्रोत, mumbaiport.gov.in
कर्वे म्हणाले, "नौदलानंही अशावेळी आढेवेढे न घेता दक्षिण मुंबईच्या पलीकडचा विचारही करणं गरजेचं आहे. नौदल देशाच्या संरक्षणाची भूमिका बजावत असल्यानं त्यांच्याबद्दल असं जाहीररीत्या बोलणं, हे त्यांचं खच्चीकरण करणारं ठरेल."
याविषयावर, सुलक्षणा महाजन यांनी सांगितलं की, "नौदलाला जर गरज असेल तर त्यांना काही एकर जागा देण्यात काही गैर नाही. मात्र तसं न करता मंत्र्यांनी हे विधान करणं धाडसाचं आहे."
त्यामुळे नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणा कितपत सत्यात उतरतात, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचं भवितव्य काय, या सगळ्यांबाबत अद्याप तरी अनिश्चितता असल्याचा सूर, या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








