मुंबई मेट्रोसाठी आले TBM: भुयारी मेट्रोचं खोदकाम होतं तरी कसं?
- Author, रवींद्र मांजरेकर/राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली
मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाच्या खोदकामात एक कोटी क्युबिक मीटर माती बाहेर काढली जाणार आहे.
एक कोटी क्युबिक मीटर म्हणजेच सुमारे साडेसात लाख ट्रक भरतील एवढी माती दगडांच्या सोडून दिलेल्या खाणी भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

मुंबईच्या कोस्टल मार्गासाठी ही माती वापरली जाण्याची शक्यता असल्याचं मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या (एमएमआरसीएल) एमडी अश्विनी भिडे यांनी सांगितलं.
धारावीतील नयानगर येथे प्रत्यक्ष भुयारी मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/Getty Images
भुयारी मार्ग तयार करण्यासाठी पहिल्या टनेल बोअरिंग मशीननं (टीबीएम) नयानगर येथील 'लाँचिंग शाफ्ट'मधून खोदकाम सूरू केलं आहे.
मातीचं काय?
"भुयाराचं खोदकाम सुरू असताना जी माती किंवा खडी बाहेर येणार आहे तिची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही त्या संबंधीत कंत्राटदाराची आहे," असं भिडे यांनी स्पष्ट केलं.
मुंबई मेट्रो रेल महामंडळानं ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात दगडांच्या सोडून दिलेल्या खाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळवल्या आहेत.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/Getty Images
तिथं ही खडी भरली जाऊ शकते. मुंबईपासून 30-40 किमी अंतरावर या खाणी आहेत. अर्थात हा एक पर्याय आहे. त्याशिवाय आणखी कोणते पर्याय असतील त्यावर विचार सुरू असल्याचं अश्विनी भिडे यांनी सांगितलं आहे.
"काही कंत्राटदारांकडे यापूर्वीच मातीची मागणी आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोहोचणार अशा तऱ्हेनं ही माती वापरली जावी, एवढीच अपेक्षा आहे" असं भिडे म्हणाल्या आहेत.
दोन वर्षं चालणार खोदकाम
भुयारी मेट्रोसाठी दररोज 150-170 मीटरचं खोदकाम आणि बांधकाम टनेल बोअरिंग मशीननं (टीबीएम) केलं जाणार आहे. दोन किमींचं भुयार खणून त्याचं बांधकाम पूर्ण होण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल.
संपूर्ण प्रकल्पाच्या टनेलिंगसाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे 2019च्या ऑक्टोबरपर्यंत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गासाठीचं टनेलिंग पूर्ण होणं अपेक्षित आहे.

17 TBM मशीन येणार
"TBM मशीन्स येण्यास सुरूवात झाली असून सर्व 17 मशीन्स टप्प्याटप्प्यानं फेब्रुवारी-2019 पर्यंत येणार आहेत. त्यामुळे मार्च-2019 पासून टनेलिंगच्या कामास पूर्ण जोमानं सुरुवात होईल," अशी आशा भिडे यांना आहे.
मेट्रो ३ची वैशिष्ट्यं
- संपूर्ण भुयारी मार्ग
- एकूण अंतर 33.5 किमी
- 27 स्थानकं
- नरिमन पॉईंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परळ, बीकेसी, सीप्झ या सहा व्यापार/उद्योग केंद्रांना जोडणार
- खर्च - 23,136 कोटी
- अपेक्षित प्रवासी- 14 लाख (2021पर्यंत)
- दर चार मिनिटांनी एक फेरी
- मुंबईतील दोन्ही विमानतळांना जोडणार
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









