भीमा कोरेगाव हिंसाचार : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर पुढे कारवाई होऊ शकते का?

- Author, विनायक गायकवाड
- Role, बीबीसी मराठी
पुण्याजवळ भीमा कोरेगावात 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराला आता पंधरवडा उलटूनही तरी या घटनेमागील संशयित आरोपी अजूनही मोकाटच आहेत.
शिव प्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा केली.
जर पोलिसांनी भिडे आणि एकबोटेंवर त्वरित कारवाई केली नाही तर राज्यभर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशाराही आंबेडकरांनी यावेळी सरकारला दिला.
भीमा कोरेगावच्या युद्धाला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हजारो दलित पुण्याजवळच्या या गावात एकत्र आले होते. दर वर्षी होणाऱ्या विजय स्तंभाला अभिवादनाच्या सोहळ्याला यंदा मात्र हिंसक वळण लागलं होतं.

फोटो स्रोत, Mayuresh Konnur/BBC
भिडे आणि एकबोटेंवर ही दलित समाजाविरोधातली हिंसा भडकावण्याचा आरोप आहे. या हिंसाचारानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसादही उमटले होते.
भीमा कोरेगावात 1 जानेवारीला झालेल्या या मोठ्या सोहळ्यापूर्वी पुण्यात एल्गार परिषदही होती झाली. 31 डिसेंबर 2017ला शनिवार वाड्यावर दलित नेत्यांनी आणि संघटनांनी एल्गार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी भाग घेतला होता.
याच कार्यक्रमात भडकाऊ भाषणं केल्याच्या आरोपावरून जिग्नेश मेवाणी, उमर खालिद आणि कबीर कला मंचच्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतकंच नाही तर भीमा कोरेगावच्या हिंसेनंतर 4 जानेवारीला मुंबईतल्या जिग्नेश मेवाणींच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.
जिग्नेश मेवाणींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
भिडे आणि एकबोटे आहेत कुठे?
भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या आरोपींना पकडण्यात महाराष्ट्र सरकार जाणूनबुजून बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
"भिडे आणि एकबोटेंसारख्या हिंदूत्ववादी नेत्यांना अटक न करून राज्य सरकार हाफीज सईदसारख्या मनोवृत्तीच्या लोकांना चालना देत आहे. आम्ही सध्या शांत आहोत. मी सर्वांना शांतता राखण्याचा आवाहन करतोय. पण जर सरकारनं ठोस पावलं उचलली नाहीत तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल," ते नागपूरमध्ये बोलत होते.
बीबीसी मराठीशी बोलताना, आपण 22 जानेवारीला नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका स्पष्ट करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Raju Sanadi
या सर्व घडमोडींमुळे एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे पोलीस भिडे आणि एकबोटेंना अटक का करत नाही आहे? आणि हे दोघे आहेत तरी कुठे?
शिव प्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे सांगलीत असल्याची माहिती मिळत आहे. बीबीसी मराठीशी बोलताना शिव प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी संभाजी भिंडेंवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
"भिडे गुरूजींवरील सर्व आरोप खोटे आणि चुकीचे आहेत. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. ते कुठेही पळून गेलेले नाहीत, ते सांगलीमध्येच आहेत. 1 जानेवारीला मी त्यांच्याबरोबर होतो आणि आम्ही सांगलीमधल्या कासेगावात एका कार्यक्रमासाठी गेलो होतो," असं चौगुले म्हणाले.
नीतीन चौगुले हे संभाजी भिडे यांचे विश्वासू आणि अनुयायी आहेत. प्रकाश आंबेडकरांनी भिडेंवर लावलेले इतर आरोपही त्यांनी फेटाळले आहेत.
"भिडे गुरूजींनी कोणत्याही सभेमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केलेलं नाही. गेल्या 4-5 वर्षांत ते भीमा कोरेगावमध्ये गेलेसुद्धा नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ही आमचीही मागणी आहे. पण भिडे गुरूजींना खलनायक ठरवणं चुकीचं आहे."

फोटो स्रोत, Milind Ekbote/Facebook
बीबीसी मराठीनं समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटेंशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण मंगळवारी एकबोटेंचे कार्यकर्ते हृषिकेश यांनी बीबीसी मराठीशी बातचीत केली खरी पण एकबोटे कुठे आहेत हे सांगण्यास नकार दिला.
"मिलिंद एकबोटेंवरील सर्व आरोप खोटे आहेत. ते कुठेही पळून चाललेले नाहीत. ते शहरातच (पुण्यात) आहेत," ते म्हणाले.
तपास कुठपर्यंत आला?
भीमा कोरेगावच्या हिंसाचारानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली होती. भिडे आणि एकबोटेंवर अट्रॉसिटी, दंगल घडवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि हत्यारबंदीचं उल्लंघन करण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.
यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना, याप्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगितलं. पण यावर अधिक खुलासा करण्यास नकार दिला.
पण तपासाच्या गतीवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी होईल, अशी घोषणा केली होती. पण अजूनही कोणत्याही आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही.

कोणत्याही प्रकरणी FIR दाखल होणं म्हणजे आरोपींना अटक होणं नाही. विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांनी तपासाच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती दिली.
"भिडे आणि एकबोटेंवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये जर आरोपी पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत असेल तर त्याला अटक करणं पोलिसांसाठी बंधनकारक नाही. पण जर आरोपी पोलीस तपासात अडथळे निर्माण करत असेल तर पोलीस त्याला अटक करतात," असं सरोदे म्हणाले.
पण संभाजी भिंडेंना पोलिसांनी तपासासाठी किंवा जबाब नोंदवण्यासाठी संपर्क केला नसल्याचं शिव प्रतिष्ठानच्या नितीन चौगुले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
त्यामुळे जर पोलिसांनी भिंडेंना संपर्कच केला नसेल तर पोलीस तपासात सहकार्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग भिंडेना तपासासाठी ताब्यात का घेण्यात आलं नाही, हाही प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
असीम सरोदेंच्या मते, "हे हेच दर्शवतं की शासनाची भूमिका ही स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. काही ठराविक लोकांना अटक करण्याची किंवा विशिष्ट पद्धतीनं कारवाई करण्याची परंपरा महाराष्ट्राला घातक ठरू शकते."
राजकीय पडसाद काय?
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या मते या प्रकरणातील मुख्य मुद्दा हा राजकीय आहे. बीबीसी मराठीशी बोलताना केतकर म्हणाले, "हे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचं सरकार आहे. भिडे आणि एकबोटेंसारख्या धर्मवादी संस्था या संघाच्या शाखा आणि उपशाखा आहेत. भाजप आणि शिवसेना राज्यात सरकार चालवत नाहीत, तर संघ हे सरकार चालवतं. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत कोणत्याही संघटनेविरोधात कारवाई संथपणेच चालणार. हे भूतकाळात घडलं आहे आणि आताही हेच घडत आहे"
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








