You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या कारणामुळं पडली विजय रुपाणींच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ
गुजरातमध्ये विजय रुपाणी हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील यावर नुकतंच शिक्कामोर्तब झालं आहे.
नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री राहणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली.
राजकोट पश्चिम मतदारसंघातून विजय रुपाणी उभे होते. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरू यांचा 53,755 मतांनी पराभव केला.
भारतीय जनता पक्षाला सौराष्ट्रामध्ये मनासारख्या जागा मिळाल्या नाहीत त्यामुळं या भागातील लोकांची नाराजी दूर करण्यासाठी सौराष्ट्रातला मुख्यमंत्री केला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण त्या चर्चेला पूर्णविराम देत भाजपनं विजय रुपाणी यांच्या नावालाच पसंती दिली आहे.
गुजरातमध्ये ओबीसी किंवा पाटीदार समाजाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी त्या-त्या समाजाची इच्छा होती. रुपाणी हे जैन समाजाचे आहे. त्यांच्या समाजाची लोकसंख्या केवळ दोन टक्के आहे. तरी देखील त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे रुपाणी हे अत्यंत संयमी नेते समजले जातात.
"विजय रुपाणी हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते मानले जातात," असं ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दयाल यांनी बीबीसी गुजरातीला म्हटलं होतं.
दुसरं पण महत्त्वाचं कारण म्हणजे विजय रुपाणी हे अमित शहांचे निकटवर्तीय समजले जातात. "विजय रुपाणी हा अमित शहांचा माणूस आहे. त्यामुळं ते मुख्यमंत्री होऊ शकतात," असं ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी बीबीसी मराठीला म्हटलं होतं.
"स्मृती इराणी या कणखर नेत्या आहेत. सध्या भाजपची परिस्थिती पाहता सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता हवा," असं देखील राजदीप यांनी म्हटलं होतं. नितीन पटेल यांना उप-मुख्यमंत्रीपद देऊन पटेल समाजाची नाराजी दूर करण्याचा भाजपनं प्रयत्न केला आहे.
मेहसाणा मतदारसंघातून निवडणूक लढणारे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी काँग्रेसच्या जीवाभाई पटेल यांचा 7,951 मतांनी पराभव केला.
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सलग सहाव्यांदा विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत 99 जागा मिळवल्या.
भाजपच्या विजयानंतर कोण मुख्यमंत्री होईल यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
नितीन पटेल किंवा स्मृती इराणी या गुजरातच्या मुख्यमंत्री होऊ शकतील अशी देखील चर्चा होती पण विजय रुपाणी यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे.
आणखी वाचा:
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)