भाजपला सुद्धा धक्का पोहोचू शकतो, हे गुजरात निकालातून दिसतं : पळशीकर

प्रा. सुहास पळशीकर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत गुजरात निवडणुकीचं सखोल आणि मुद्देसूद विश्लेषण केलं आहे. त्यांच्या मुलाखतीतला मुख्य भाग इथे देत आहोत. संपूर्ण फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी खाली स्क्रोल करावे.

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला आपला गड राखता आला. पण गेल्या निवडणुकीत मिळवलेल्या जागांच्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळाल्या.

"भाजपला धक्का पोहचू शकतो किंवा धक्का पोहचवता येतो हा या निवडणुकीचा खरा सिग्नल आहे. आणि त्यामुळं इथून पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या डोक्यावर ती टांगती तलवार राहणार आहे. गुजरातमध्ये सुद्धा आपल्या जिवावर बेतलं होतं तर बाकीच्या ठिकाणांची काय कथा?" असं मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी बीबीसी मराठीनं घेतलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये मांडलं.

बीबीसीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान सुहास पळशीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाचकांच्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली.

प्रश्न : हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता का ?

या निवडणुकीत वेगळं काही घडलं नाही. प्रचारात भाजपची आगतिकता दिसून आली होती. पण हे निकल अनपेक्षित नाहीत. सर्वेक्षणात काँग्रेसच्या बाजूनं जनमत होतं. नकारात्मक मतदान झाल्यास कौल काँग्रेसच्या बाजूनं जाईल, असं वाटत होतं. पण तसं घडलं नाही. राहुल गांधी यांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर फरक दिसू लागला होता. पण शेवटच्या पंधरा दिवसांत बदल घडला आणि पुन्हा भाजपनं मुसंडी मारली.

प्रश्न: शेवटच्या पंधरा दिवसांत असं काय घडल घडलं? मोदींचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला का?

निवडणुकीतला महत्त्वाचा फॅक्टर होते मोदी. शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांनी जो प्रचार-प्रसार केला त्याचा फायदा भाजपला नक्कीच झाला.

या राज्यातलीच व्यक्ती देशातील पंतप्रधान आहे आणि ही गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरेल, असं त्यांनी वेळोवेळी गुजरातच्या जनतेला म्हटलं. अर्थातच हे भावनिक आवाहन होतं. कुंपणावरच्या मतदारांसाठी हे महत्त्वाचं होतं. काही मतदार असे असतात की त्यांचं आधीच ठरलेलं असतं की कुणाला मतदान करणार. पण बहुतांश मतदार असे असतात की ते शेवटच्या क्षणापर्यंत विचार करत असतात. त्यांच्यावर प्रचाराचा प्रभाव होतो.

प्रश्न: या निवडणुकीच्या निकालामुळं काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

निश्चितच. काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली असं म्हणता येईल. गुजरातसारख्या राज्यात जागा वाढणं ही त्यांच्यासाठी मोठी कमाई आहे, असं म्हणावं लागेल. पण त्याबरोबरच काँग्रेसला खूप फायदा झाला, असं म्हणता येणार नाही. कारण शहरी भागात भाजपला धक्का बसलेला नाही. काँग्रेसच्या जागा वाढल्या, पण त्यांचे मोठे नेते पराभूत झाले. तसंच त्यांच्या मतांची टक्केवारी फार वाढली नाही.

प्रश्न: 2014पासून राहुल गांधींनी नेहमी पराभव अनुभवले. या परिस्थितीत हा विजय म्हणता येईल का?

हा नैतिक विजय आहे. राजकारणात असे प्रतीकात्मक विजय महत्त्वपूर्ण मानले जातात. या विजयामुळं काँग्रेस आणि राहुल गांधी उत्साहित होतील.

प्रश्न: जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्या सभांना गर्दी दिसत होती. भाजपविरोधातल्या रागामुळेच ही गर्दी दिसत होती, असं म्हणायला हरकत नाही. मग या रागाचं काय झालं?

काही लोक नाराज होते, पण त्यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश आलं. उदाहरणार्थ गुजरातमध्ये व्यावसायिकांची नाराजी दूर करण्यात आली. पाटीदार समाज भाजपसोबतच राहिला. हार्दिक पटेलांच्या सभेला ते जात होते, पण ते भाजपला सोडतील अशी अपेक्षा ठेवणं गैर आहे. नाराजीबद्दलची जाणीव भाजपला असणारच, त्यांनी ती दूर करण्याचा प्रयत्न केला असणार. त्यामुळं ते पुन्हा विजयी झाले असं म्हणावं लागेल.

प्रश्न: गुजरातमध्ये भाजप सातत्यानं विजयी होत आहे. असेवारंवार विजय मिळवणं कठीण काम आहे, असं नाही वाटत का?

आताच्या काळात एका राज्यावर पकड ठेवणं हे कठीण काम आहे. पूर्वीच्या काळी एका राज्यात अनेक वर्षं सत्ता आपल्या हातात ठेवता येत होती. पण 80च्या दशकानंतर हे काम फार कठीण झालं. काँग्रेसला रोखून भाजपनं नक्कीच एक चांगला टप्पा पार केला आहे.

प्रश्न: या निवडणुकीत प्रचाराच्या वेळी एकमेकांवर खूप आरोप-प्रत्यारोप झाले. प्रचाराची पातळी खाली गेली असं तुम्हाला वाटत नाही का?

जेव्हा स्पर्धा अटीतटीची होते, तेव्हा हे होतं. जेव्हा सर्वच पक्ष जिंकण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी प्रचाराच्या आवेशात ते असं म्हणतात. लोकशाहीमध्ये असं होणं अपरिहार्य आहे असं मला वाटतं.

प्रश्न: राहुल गांधींनी मंदिरांना भेटी दिल्या. याकडे सॉफ्ट हिंदुत्व म्हणून पाहिलं गेलं. त्यांची ही खेळी फसली, असं म्हणता येईल का?

राहुल गांधी यांची कृती ही प्रतीकात्मक होती. पण ते अनाठायी होतं, असंच म्हणावं लागेल. जर एखादी व्यक्ती नेहमी मंदिरात जात असेल, तर त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण राज्यात निवडणुका असताना अचानकपणे तसं वागणं योग्य नाही.

मतदारांच्या दृष्टीनं विचार केला तर ते सॉफ्ट हिंदुत्वाकडं का वळतील हा देखील प्रश्न आहे. जर 'ओरिजनल' आहे तर 'कॉपी'कडे का जातील?

2014च्या पराभवानंतर ए. के. अॅंटनी यांच्या अध्यक्षतेखाली पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी त्यात म्हटलं होतं की काँग्रेसची प्रतिमा ही अल्पसंख्यांकांचा पक्ष अशी झाली आहे. ती बदलायला हवी, अशी शिफारस त्यांनी केली होती. म्हणून राहुल यांनी तसं केलं असावं. यातून काँग्रेसचा वैचारिक गोंधळ दिसून येतो.

प्रश्न: राहुल गांधी हे परिपक्व होत आहेत का? राहुल गांधी हे तरुणांना आवडतील अशा भूमिकेत दिसले. याबाबत काय सांगाल?

राहुल गांधी यांना वेगवेगळी नावे देण्यात आली. राहुल गांधी हे परिपक्व नाहीत, हे सोशल मिडियावरच ठरवलं गेलं. जर ते परिपक्व नसते, तर त्यांची इतकी भीती त्यांच्या विरोधकांना का वाटते? कोणत्याच नेत्याला टाकाऊ म्हणून बाजूला करू नये. हा धडा त्यातून घेण्यात यावा.

प्रश्न: गुजरात मॉडेल यशस्वी आहे का?

विकासाचा विभागीय समतोल सर्व राज्यात योग्य प्रमाणात नाही. गुजरातमध्ये विकास झाला असला तरी रोजगार निर्मिती नाही. मानवी विकास निर्देशांक खालवला आहे. समाजातील एक मोठा गट... दलित आणि आदिवासी समाज नेतृत्वाचा नवा पर्याय शोधत आहे. त्यामुळं हे मॉडेल कितपत यशस्वी झालं हे निश्चित सांगता येणार नाही.

प्रश्न: 2014मधले मोदी आणि 2017मधले मोदी यांत काय फरक आहे?

त्यावेळी नेतृत्वाची पोकळी होती. त्याबरोबर स्वतःला त्यांनी कसं पिच केलं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. त्यांनी लोकांना चांगली स्वप्नं दाखवली. त्या कल्पनेमुळं लोक त्यांच्या पाठीमागे गेले.

आता परिस्थिती बदलली आहे. आता ते पंतप्रधान आहेत. ते आश्वासनावर मतं मिळवू शकत नाहीत, कारण आता आश्वासन काय दिलं यापेक्षा त्यांनी कृती काय केली याला अधिक महत्त्व आहे. पुढील निवडणुकीच्या वेळी त्यांना मतदारांकडे आपल्या कामाचा लेखाजोखा मांडावा लागेल. त्यावरच त्यांना मतं मिळतील.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)