दृष्टिकोन - मुख्यमंत्री ते पंतप्रधान : मोदींच्या देहबोलीत कसा झाला बदल?

    • Author, शिव विश्वनाथन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

नरेंद्र मोदींसारखे मोठे नेते हे एखादी गोष्ट शिकण्यात पटाईत आहेत. आणि जेव्हा वक्तृत्वशैलीतल्या बदलाचा मुद्दा येतो किंवा बोलण्याच्या कलेचा मुद्दा येतो तेव्हा त्याची ताकद काय आहे हे मोदी चांगलंच जाणून आहेत.

मोदींना आपल्या बोलण्याच्या ताकदीची चांगलीच जाण आहे. कारण, उत्तम भाषेत केलेलं सादरीकरण हे लोकांच्या मनाचा ठाव घेतं. त्यामुळे चांगलं भाषण हे एकप्रकारे मनातल्या धोरणाचं वचन ठरतं आणि या वचनाची पुढे कार्यवाही होणार असते.

मोदींच्या भाषणांचं विश्लेषण करणारे अनेक तज्ज्ञ त्यांचे तीन टप्प्यात वर्गीकरण करतात. पहिला टप्पा म्हणजे एका पक्षाचे नेते असलेल्या मोदींना दिल्ली सर करायची होती.

दुसरा टप्पा आहे मोदी ल्यूटेन्स दिल्लीमध्ये आल्यावरचा. म्हणजे तेव्हा त्यांनी आपली शब्दसंपदा, राष्ट्रीयत्व आणि विकास यावर भर दिला.

तिसऱ्या टप्प्यात मोदींनी सरकार आणि गव्हर्नन्स यावर आपल्या भाषणात भर दिला. या भाषणांमध्ये त्यांच्या बोलण्यातून सत्तेच्या ताकदीची समज पूर्णपणे डोकावत होती. या तीनही टप्प्यांमध्ये जनतेच्या मनावर गारुड करणारी शब्दसंपदा वापरण्यावर त्यांनी भर दिला होता.

पहिला टप्पा - आक्रमकता

पहिल्या टप्प्यात मोदींमध्ये अधिकाधिक आक्रमकता आणि त्यांची देहबोली काहीशी हिंसक दिसून येत होती. तसंच जाब विचारणारी, उपहास करणारी आणि मनमोहन सिंग, राहुल गांधी यांना गप्प करणारी भाषा ते वापरताना दिसले.

या टप्प्यात त्यांचा आवेश हा चर्चा करण्यासाठीचा नव्हता तर समोरच्याला घायळ करण्याची वृत्ती त्यांच्या बोलण्यातून डोकवायची.

एकाच प्रकारची उदाहरणं त्यांनी वारंवार वापरत माध्यमांमध्ये एक आभासी चित्र निर्माण केलं होतं. ज्याचा वापर त्यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी केला.

मरणाऱ्याला अजून मारण्याचा हा प्रकार होता, ज्यात मोदी यशस्वी झाले. यावेळच्या त्यांच्या देहबोलीतून विजयाची वेळ जवळ आल्याची भावना जाणवत होती.

तसंच सत्तेवर नसूनही सर्व सत्ता संपादित केल्याचा भावही त्यांच्याकडे या काळात दिसून यायचा. तेव्हा फक्त विजयाचा प्रतिध्वनी प्रत्येक कोपऱ्यातून ऐकू येण्याची वेळ बाकी होती.

दुसरा टप्पा - प्रतिमा निर्मितीवर भर

दुसरा टप्पा मात्र हा संघटित करण्याचा किंवा प्रतिमा निर्मितीचा होता. पहिला बदल त्यांनी आपल्या पोशाखात केला. आगळ्या पोशाखातूनही आपली ताकद किंवा शक्ती दाखवण्याचा हा प्रयत्न होता.

संवाद हा यावेळी काहीसा बंद झाला असला तरी हा काळ म्हणजे त्यांच्यातले काही अनोखे बदल होते. म्हणजे, राजकीय व्यक्तीच्या भूमिकेतून कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत जायचं होतं. एका समिक्षकाच्या भूमिकेतून त्यांना सरकारच्या प्रमुखाच्या भूमिकेत शिरायचं होतं. या सगळ्यालाच विजयाचा गंधही येत होता.

त्यांच्या शब्द संग्रहात विकास आणि गव्हर्नन्स यांसारख्या शब्दांनी प्रवेश केला होता. त्यांना तेव्हा सत्तेसाठी वाट बघायची गरज नव्हती. ससा आणि कासवाप्रमाणेच भाजप आणि काँग्रेसच्या या स्पर्धेत भाजपरुपी सशानं वेगानं धावत विजय मिळवला होता.

त्याकाळात गांधींचा त्यांनी प्रचारक म्हणून तर सरदार पटेल यांचा शासनकर्ता म्हणून प्रसार करत सर्वसमावेशक सरकारचा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा निषेध आणि असहमती हे देशद्रोहाचं प्रतीक असल्याचं तेव्हा समजलं जाऊ लागलं होतं.

तिसरा टप्पा - 2019 ची तयारी

तिसऱ्या टप्प्यात 'मोदीवाणीत' मात्र अनेक बदल झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातल्या त्यांच्या भाषणांमधून 2019 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी दिसून येत आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रचार करणे आणि गव्हर्नन्सची भाषा बोलणे ही त्यांची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातली रुपं एकवटली आहेत.

मात्र, या टप्प्यात वाकचातुर्य कलेचं सादरीकरण ही जबाबदारी केवळ मोदींची राहिली नसून योगी आदित्यनाथ, अमित शहा यांच्यावरही त्याची जबाबदारी आली आहे. तर, राजनाथ सिंग आणि अरुण जेटली हे पडद्यामागून आपल्या भूमिका बजावत आहेत.

या तिघांमध्ये आदित्यनाथ हे आक्रमक आणि मूलतत्ववादाचे पुरस्कर्ते आहेत. तर, आकडेवारीचा खेळ करणारं धूर्त नेतृत्व म्हणजे अमित शहा आहेत. मात्र मोदी हे काहीशी तंत्रकुशल भूमिका घेताना दिसत आहेत.

मोदींना त्यांच्या यशाचं कौतुक इतरांकडून ऐकायचं आहे. त्यांनी यासाठी सुरक्षा आणि विकास या शब्दांचा भडीमार आपल्या भाषणांतून सुरू ठेवला आहे. एकता आणि सर्वसमावेशक धोरण हाच त्यांचा अजेंडा असल्याचं ते बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. याला विरोध करणं हाच मोठा विरोध असल्याचंही त्यांच्या वागण्यातून स्पष्ट होत आहे.

महत्त्वाचे मुद्दे मात्र गायब

गुजरात निवडणुकांची भाषा दिल्लीत मात्र चालत नाही. त्यामुळे इथे मोदी पक्षाच्या नेत्यापेक्षा पंतप्रधानांच्या भूमिकेत सर्वाधिक असतात.

पण, राहुल गांधी यांची सोमनाथ मंदिराची भेट ज्यापद्धतीनं हाताळली गेली तेही एक उत्तम उदाहारण आहे. एखादा हिंदू नसलेला व्यक्ती भारतीय कसा नाही आणि देशद्रोही कसा आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा यातून दिसून आला.

तसंच आर्चबिशप मॅकवान प्रकरणी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं वातावरणंच बदलून टाकलं. आर्च बिशप मॅकवान यांचं वक्तव्य हा देश प्रेमींवर हल्ला असल्याचा सूचक इशारा मोदींनी दिला. त्यामुळे त्यावेळी चर्चेत असलेल्या सगळ्या प्रश्नांना कलाटणी मिळत या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली.

मोदींच्या भाषणांची अजून एक बाजू पहायला मिळते. पाश्चिमात्य देशांना संबोधित करताना विशेषतः अमेरिकेकडे पाहताना त्यांचा वेगळा नूर दिसून येतो.

डोनाल्ड ट्रम्प आणि इवांका ट्रम्प यांच्याशी गेल्या काही दिवसांत त्यांनी साधलेला वेगळ्या पद्धतीचा संवाद आणि भेटी हे याचं उत्तम उदाहरण आहे.

विकसित देशांकडून कौतुकाचे बोल कानी पडावे यासाठी मोदींचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतं. त्यांनी मिळवलेल्या यशावर ते जास्त भर देऊन बोलतात. मात्र, त्यांना जे विरोधी वाटेल त्याला ते देशद्रोहाची पावती देतात.

मोदींची देहबोली आणि त्यांची भाषाशैली गेल्या अनेक वर्षांपासून पाहिली जात आहे. यातून एक व्यक्ती आत्मविश्वास आणि अधिकारवाणीनं बोलताना दिसते. हे बोलत असताना आपल्यातली अध्यात्मिकता तसंच आक्रमकता हा राष्ट्रासाठी एक प्रकारे केलेला त्याग आहे हे भासवण्याचा प्रयत्न करतात.

मात्र, यातून अनेक गोष्टी हरवल्यासारख्या दिसतात. त्या म्हणजे नव्या कल्पना, शेती विषयक विचार, शिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे या भाषणांमध्ये नसल्याचं प्रकर्षानं जाणवतं. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांबाबत काहीशी शंका वाटते.

भाजपचा पक्ष म्हणून चालणारा शब्दच्छल अपरिहार्य भासतो आहे. पुढच्या दशकभरात भाजपची सद्दी उमटवण्याच्या दृष्टीनं निवडणुका केवळ औपचारिकता आहे.

(लेखक शिव विश्वनाथन हे कंपोस्ट हिप या शैक्षणिक आणि कार्यकर्त्यांच्या अभ्यास गटात कार्यरत असून 'अल्टरनेटिव्ह इमॅजिनेशन' या विषयावर हा गट काम करतो.)

हे तुम्ही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)