प्रेस रिव्ह्यू : गुजरात निवडणुकांआधी टीव्ही मुलाखतींवरून राहुल गांधींविरुद्ध FIRचे आदेश

फोटो स्रोत, Getty Images
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एका गुजराती वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती.
ही मुलाखत दुसऱ्या फेरीतील मतदानाच्या इतक्या जवळ का देण्यात आली, म्हणून भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयोगाने गांधींना स्पष्टीकरण मागत नोटीस बजावली आहे, असं वृत्त 'सकाळ'ने दिलं आहे.
गांधींवर आचारसंहिताभंगाचा ठपका ठेवत आयोगाने त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
तसंच राहुल यांच्या मुलाखतीचे प्रसारण करणाऱ्या अन्य वाहिन्यांवरही कारवाई केली जावी, असं आयोगानं म्हटल्याचा बातमीत उल्लेख करण्यात आला आहे.
यावर पलटवार करत काँग्रेसने निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप केला आहे. मोदींनीसुद्धा एका खासगी व्यावसायिक सभेत राजकीय भाष्य केलं, मग त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
2. सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल
नागपूर अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि बोंडअळीच्या प्रश्नावरून 'हल्लाबोल आंदोलन' करून महाराष्ट्र सरकारला घेरलं होतं. त्यामुळे विधानसभेचं कामकाज होऊ शकलं नव्हतं.

फोटो स्रोत, ROBYN BECK/AFP/Getty Images
मग बुधवारी सरकारने सिंचन घोटाळा प्रकरणात काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यानंतरच विरोधकांनी तलवारी म्यान केली आणि विधानसभेचं कामकाज सुरू झालं, असं वृत्त 'लोकसत्ता'ने दिलं आहे.
अधिवेशनातून आणखी एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र टाईम्सनं दिली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील बोगस कंपन्या शोधून त्यांचे आर्थिक व्यवहार थांबवण्याबाबत केंद्र सरकारने सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्यात 60 हजारांहून अधिक बोगस कंपन्या असल्याचं उघडकीस आलं आहे.
बंद पडलेल्या या कंपन्यांचे पुढील कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ नयेत, यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आल्याचं राज्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत सांगितलं.
3. आधार जोडणीस 31 मार्चपर्यंत मुदत
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी पॅन क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2018 पर्यंत वाढवली आहे.
या आधी ही मुदत 31 डिसेंबर, 2017 होती.

अनेक निवेदनं आणि रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून आधार जोडणीची अंतिम मुदत 31 मार्च करण्यात आल्याचं अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
4. स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन 'कलवरी'
माझगाव डॉकमध्ये बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पीन पाणबुडी 'कलवरी' आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्सच्या DCNS कंपनीच्या सहकार्याने सहा पाणबुड्या निर्मितीची प्रकल्प माझगाव डॉकमध्ये सुरू आहे.
फ्रान्सबरोबर तीन अब्ज डॉलरच्या कराराद्वारे डिझेल-इलेक्ट्रिकवरील पाणबुड्यांची भारतात निर्मिती करण्याचा निर्णय झाला होता.
या करारानुसार 2013 साली पहिली पाणबुडी नौदलात दाखल होणं अपेक्षित होते. मात्र त्यासाठी तब्बल 4 वर्षांचा उशीर होऊन अखेर गुरुवारी 'कलवरी' नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाली आहे.
5. अमरनाथ यात्रेदरम्यान मंत्रोच्चार आणि जयजयकारावर बंदी
राष्ट्रीय हरित लवादानं (NGT) अमरनाथ यात्रेदरम्यान करण्यात येणारे मंत्रोच्चार, जयजयकारावर तसंच घंटा वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश अमरनाश श्राइन बोर्डला दिले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, NGTने अमरनाथला शांतता क्षेत्र जाहीर करण्याचा आदेश देतेवेळी या सूचना दिल्या आहेत.
अमरनाथ हे पर्यावरणीय तसंच धार्मिक दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्यानं NGTच्या या आदेशाचं काहींनी स्वागत तर काहींनी यावर टीका केली आहे. दिल्ली भाजपने यावर आक्षेप घेत NGT हिंदूविरोधी अजेंडा चालवत असल्याची टीका केली आहे. विश्व हिंदू परिषदेनंही NGT वर टीका करत हिंदूंच्या भावना दुखावणं बंद करा, अशी सरकारला विनवणी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








