मणिशंकर अय्यरांच्या घरी झालेल्या त्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं?

मणीशंकर अय्यर, नरेंद्र मोदी, काँग्रेस, भाजप, गुजरात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांमुळे मणीशंकर अय्यर यांच्या घरी झालेली बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेली एक बैठक चांगलीच चर्चेत आहे. नेमकं काय झालं या बैठकीत? या बैठकीला उपस्थित पत्रकार आणि लेखक यांनी बैठकीचा मांडलेला गोषवारा.

गुजरातच्या राजकारणात फोडणी घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या एक खळबळजनक आरोप केला - "काँग्रेस आणि पाकिस्तानचे माजी अधिकारी यांच्यात हातमिळवणी झाली आहे."

"गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे आणि अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पाकिस्तानचे माजी अधिकारी प्रयत्नशील आहेत," असा आरोप मोदी यांनी केला होता.

त्यासाठी मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे उच्चायुक्त, माजी परराष्ट्र मंत्री, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी उपस्थित होते, असंही मोदी रविवारी बनासकांठामधल्या पालमपूरमध्ये एका सभेत म्हणाले.

या आरोपांच्या दोनच दिवसांपूर्वी अय्यर यांनी मोदी यांनी 'नीच' म्हटलं होतं. नंतर त्यांनी "माझं हिंदी खराब आहे" असं सांगत माफी मागितली होती.

पण त्यानंतर काही तासांतच त्यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आलं.

अय्यर यांच्या घरी झालेल्या त्या गोपनीय बैठकीत उपस्थित असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार प्रेम शंकर झा यांनी केला आहे. बीबीसी प्रतिनिधी कुलदीप मिश्र यांनी त्यांच्याशी बातचीत केली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या बैठकीत गुजरात किंवा अहमद पटेल यांच्याविषयी काहीच चर्चा झाली नाही.

मग काय झालं त्या बैठकीत?

कधी झाली बैठक?

अय्यर यांच्या घरी 6 डिसेंबरला झालेली ही बैठक तब्बल तीन तास चालली असं झा यांनी सांगितलं. या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसूरी उपस्थित होते.

मणीशंकर अय्यर, नरेंद्र मोदी, काँग्रेस, भाजप, गुजरात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसूरी मणीशंकर यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

"ही खासगी बैठक होती. कसूर आणि अय्यर जुने मित्र आहेत. भारत-पाकिस्तान संबंध कसे सुधारता येतील, यावर या बैठकीत चर्चा झाली," असं झा यांनी सांगितलं.

"कसूरी बैठकीला उशिरा पोहोचले. त्यानंतर जेवणाचा बेत झाला. जेवणाआधी दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर जेवणादरम्यानही साधारण तेवढाच वेळ चर्चा झाली," असं झा यांनी पुढे सांगितलं.

कोणत्या मुद्यावर चर्चा?

काँग्रेसचे नेते आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवर मोदी यांनी घणाघाती आरोप केले आहेत. यासंदर्भात झा म्हणाले, "भारत-पाकिस्तान संबंध कशा पद्धतीने सुधारता येतील यावर बोलणं झालं."

मणीशंकर अय्यर, नरेंद्र मोदी, काँग्रेस, भाजप, गुजरात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मणीशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत काश्मीरप्रश्नी चर्चा झाली.

"दोन्ही देशांच्या दुरावलेल्या संबंधांचं मूळ काश्मीर प्रश्नात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर तपशीलवार बोलणं झालं."

गुजरातवर चर्चा झाली का?

या बैठकीत गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सविस्तर चर्चा झाल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला होता. अहमद पटेलना गुजरातचे मुख्यमंत्री करण्याची इच्छा पाकिस्तान लष्कराचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांची होती, असं मोदी यांचं म्हणणं होतं.

मणीशंकर अय्यर, नरेंद्र मोदी, काँग्रेस, भाजप, गुजरात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अहमद पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवावे असं पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.

मात्र या बैठकीत गुजरातवर काहीही चर्चा झाली नसल्याचं झा यांनी स्पष्ट केलं. "गुजरात निवडणुका असा विषयही चर्चेत निघाला नाही. गुजरात असा उल्लेखही बैठकीत झाला नाही," असं त्यांनी सांगितलं.

याव्यतिरिक्त अहमद पटेल यांचा संदर्भ बैठकीत निघाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोण हजर होतं या बैठकीला?

प्रेम शंकर झा म्हणाले, "या बैठकीला माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह उपस्थित होते. मी काश्मीर प्रश्नी लेखन केलं आहे, आणि अय्यर माझे मित्र आहेत. त्यामुळे या बैठकीचं आमंत्रण मलाही होतं. आम्ही भेटलो तर देशद्रोही ठरतो का? कोणाला भेटणं देशद्रोह होऊ शकतो का?"

मणीशंकर अय्यर, नरेंद्र मोदी, काँग्रेस, भाजप, गुजरात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

प्रेम शंकर झा वरिष्ठ पत्रकार असून काश्मीर विषयावर त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे. गेली 29 वर्षं ते काश्मीरवर लिखाण करत आहेत.

प्रेम शंकर झा हे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचे सल्लागारही होते.

मोदींना या बैठकीबद्दल कसं कळलं?

या बैठकीची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली नसल्याचं भाजपचं म्हणणं होतं. परराष्ट्र मंत्रालयाला बैठकीची माहिती देण्याची आवश्यकताच नाही, असं झा म्हणाले.

"कसूरी आणि अय्यर महाविदयालयीन काळापासूनचे मित्र आहेत. दोघांकडेही आता औपचारिक अधिकाराचं कोणतंही पद नाही. आम्ही देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला एकमेकांना भेटण्याचा अधिकार आहे. मित्रांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींनी एकमेकांना भेटणं गुन्हा आहे का?" असा सवाल झा यांनी केला.

मणीशंकर अय्यर, नरेंद्र मोदी, काँग्रेस, भाजप, गुजरात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मणीशंकर अय्यर यांच्या घरी झालेली बैठक वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

मग पंतप्रधान मोदींना या बैठकीबद्दल कसं कळलं?

झा सांगतात, "या बैठकीत लपवण्यासारखं काहीच नव्हतं. मी अय्यर यांच्या घराबाहेर गाडी थांबवली तेव्हा वीसएक माणसं तिथे होती. आम्हाला किमान सहा ईमेल आले. आम्ही दोन-तीन वेळा फोनवर बातचीत केली. ही माणसं मणिशंकर यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहेत."

या बैठकीला उपस्थित असणाऱ्या कसूरी यांच्याबद्दल झा म्हणाले, "कसूरी नेहेमीच भारतात येत असतात. दोन वर्षांपूर्वी कसौलीमध्ये झालेल्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. त्यावेळीही ते आले होते. भारत सरकारद्वारेच त्यांना व्हिसा दिला जातो. आम्ही भेटू नये असं सरकारला वाटत असतं तर त्यांनी कसूरी यांना व्हिसा दिला नसता," असंही ते म्हणाले.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)