गुजरात ग्राऊंड रिपोर्ट - 'दलितांची जीन्स आणि मिशी त्यांना खटकते'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियांका दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गुजरातची राजधानी गांधीनगरपासून 20 किलोमीटर अतंरावर राहणाऱ्या कुणाल महेरिया याला यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुका विशेष महत्त्वाच्या वाटत नाहीत.
लिंबोदरा गावातल्या दलित वस्तीत राहणारा कुणाल म्हणतो, "भाजप सरकार असो की काँग्रेस सरकार असो, दलितांच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही." कुणालच्या या बोलण्यामागची खरी कथा थोडी वेगळी आहे.
"त्या दिवशी रात्री मी माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी घरातून निघालोच होतो, तेवढ्यात दरबार मोहल्ल्यात राहणाऱ्या भरत वाघेलाच्या बाईकचा आवाज माझ्या कानी पडला. मी रस्त्यातून चालतच होतो, गाडीचा आवाज ऐकून मी एका कोपऱ्यातून चालू लागलो."
कुणाल पुढे म्हणाला, "मी बाजूनं चालत होतो तरी सुद्धा त्यानं मोटरसायकल माझ्या दिशेनं आणून माझ्या अंगावर आणली. मी लांब झालो तर तो शिव्या देऊ लागला आणि म्हणाला तू स्वतःला समजतो कोण? तसंच मी लहान जातीचा असूनही माझी त्याच्यासमोर बोलण्याची हिंमत कशी काय झाली? असे प्रश्न त्यानं रागात विचारले."
धीरगंभीर आवाजात हे सांगितल्यावर आपल्या दोन खोल्यांच्या घरात बसलेला कुणाल शांत झाला. त्याचे वडीलही त्याच्यासोबत बसले होते. कुणाल त्यानंतर मात्र आपल्या मोबाईल उलट-सुलट फिरवत खाली बघू लागला.
उच्च जातींशी संघर्ष
पुढे बऱ्याच वेळानं कापऱ्या आवाजात कुणाल बोलू लागला. "मी त्याला बोललो की, मला भांडण करायचं नाही. आणि मी माझ्या रस्त्यानं चालू लागलो. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं त्याची बाईक माझ्यासमोर आणून उभी केली. मला त्याचं बोलणं टोचत होतं."
"त्यानं नंतर त्याच्या बाईकला बांधलेला झेंडा काढून मला शिव्या देत मारहाण सुरू केली. आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, तो मात्र वारंवार मला धमक्या देत माझ्या जातीवरून बोलत होता."
या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात गुजरातमध्ये दलित युवकांना मारहाणीच्या तीन वेगळ्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी एक घटना ही कुणाल महेरियासोबत घडली होती.
याप्रकरणी तिथल्या कालोल तालुक्याच्या पोलीस ठाण्यात भारत वाघेलाच्या विरोधात भारतीय दंडविधानाच्या 323 व्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
"पोलीस एकदा आले आणि भरतसह त्याच्या मित्रांना त्यांनी पुन्हा असं न करण्याबद्दल समज दिली. त्यानंतर ते त्याला काहीच बोलले नाहीत." अशी माहिती कुणालनं दिली.
कुणाल पुढे म्हणाला, "घटनेनंतर मी जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या वडिलांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं. सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माझ्या पाठीवरच्या जखमा पाहून पोलिसांत तक्रार द्यावी लागले असं सांगितलं. आम्ही पोलिसात तक्रारही नोंदवली. पोलिसांचा तपास मात्र अजून सुरुच आहे."

फोटो स्रोत, Getty Images
25 सप्टेंबरला लिंबोदरा गावात दलित युवक पियुष परमार आणि दिगन मेहरिया यांना झालेल्या मारहाणीनंतर कुणालला मारहाण झाली होती. त्यावेळी 21 वर्षांचा पीयुष आणि 17 वर्षांचा दिगन त्यांच्या गावातील एका गरब्याच्या कार्यक्रमाला गेले होते.
याबाबत सांगताना कुणाल म्हणाला, "गावातल्या दरबार ठाकूर समाजाच्या लोकांना ते गरब्याला आले हे आवडलं नाही. या समाजातल्या काही तरुणांनी पियुष आणि दिगन दलित असल्याबद्दल, त्यांनी मिशी ठेवल्याबद्दल, शर्ट जींन्सच्या आत खोचल्याबद्दल टोमणे मारले. तेव्हा या दोघांची त्या तरुणांशी बाचाबाची झाली."
"त्यादिवशी काही झालं नाही. पण दुसऱ्या दिवशी पीयुष आणि दिगनला तुम्ही दलित असूनही आमच्याशी उलट का बोललात म्हणून त्यांनी मारहाण केली. दिगन आणि पियुषनं गावातील पोलीस चौकीत यासाठी अर्ज दिला, पण काही झालं नाही."
हे सांगून तो पुढे म्हणाला, "दरबार समाजातले ते तरुण दिगनला आणि पियुषला येता-जाता त्रास देत असत. दिगनला त्यामुळे अकरावीची परिक्षाही धड देता आली नाही. मला मारहाण झाल्यानंतर 3 दिवसांतच दिगनच्या पाठीवर ब्लेडनं हल्ला झाला. त्यानंतर मला वाटलं की आता परत माझा नंबर लागणार आहे."
आरोप मागे घेण्यासाठी दबाव
दिगनच्या पाठीवर ब्लेडनं हल्ला झाल्यावर पोलीस तक्रार करण्यात आली. पण, या तक्रारीच्या काही दिवसांनंतर दिगन आणि त्याच्या कुटुंबानं या घटनेची जबाबदारी स्वतःवरच घेत तक्रार मागे घेतली.
कुणालचे वडील रमेश भाई याबाबत बोलताना म्हणाले, "दिगन आणि पियुषवर सगळे आरोप मागे घेण्यासाठी खूप दबाव होता. ब्लेडच्या हल्ल्यानंतर सगळे घाबरले होते आणि दबावातही होते. त्यांच्या परिवारांनी आता तक्रार मागे घेतल्यानं ते मीडियासोबत बोलत नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images
लिंबोदरा गावात दलितांवर होणाऱ्या या हल्ल्यांमागच्या नेमक्या कारणाबद्दल सांगताना कुणाल म्हणाला, "पहिले आमची सगळ्यांची कुटुंबं दरबार समाजातल्या लोकांकडे मोलमजुरी करायची. पण, आता आमच्या घरातले सगळेच जण नोकरी करतात. याचाच त्यांना राग येतो."
कुणालचे वडील रमेश हे गांधीनगरमध्ये ऑटो चालवतात. तर, कुणाल स्वतः टेलीकॉम कंपनी रिलायन्स-जिओमध्ये कर्मचारी म्हणून काम करतो.
"दरबार समाजाच्या लोकांना आम्ही मिशा ठेवलेलं आवडत नाही, आम्ही जीन्स आणि शर्ट घातलेला आवडत नाही, आम्ही शांततेत नोकरी करून पैसे कमावतो हे त्यांना आवडत नाही. तसंच आम्ही या छोट्या घरात राहतो हे देखील त्यांना आवडत नाही. आम्ही त्यांची चाकरी करत नाही याचा त्यांना सगळ्यात जास्त राग आला आहे."

फोटो स्रोत, PIYUSH PARMAR
लिंबोदरा गावात दलित युवकांवर असे हल्ले झाल्यानंतर सोशल मीडियावर 'जातीयवादाच्या विरोधात आणि दलितांच्यासोबत', 'मी पण दलित' अशा आशयाचे हॅशटॅग वापरून अभियानाला सुरुवात झाली.
या अभियानाला प्रतिसाद देत देशभरातील युवकांनी मिशीतले आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली.
स्वतःच्या गावात कैद्यासारखं जगणं
"सोशल मीडियावर जे समर्थन मला मिळालं ते माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मला हिंमत मिळाली. पण शेवटी मला एकट्यानेच मला माझं आयुष्य जगायचं आहे. सोशल मीडियावरुन कुणी मला हे विचारत नाही की मी एकटा ऑफिसला कसा जाणार? कुणी रस्त्यात मला मारून टाकलं तर? मी रोज घाबरून ऑफिसला जातो."
29 सप्टेंबरला झालेल्या या घटनेनं कुणाला आतून हादरवून टाकलं आहे. या घटनेनंतर तो ज्या मनोवस्थेतून जात होता. त्याबद्दल त्यानं सांगितलं, "पहिले मी रोज 5 किलोमीटर धावायला जायचो. पण, आता नाही जात. रात्री मला 9 पेक्षा जास्त उशिर झाला तर माझ्या आई-वडिलांचा जीव टांगणीला लागतो. आमच्या गावात आम्हाला कैद्यासारखं जगावं लागत आहे."
गुजरात विधानसभा निवडणुकांचं या दलित युवकांना तसं काही देणं-घेणं नाही. पण, जिग्नेश मेवाणीचं नाव घेतल्यावर तो म्हणतो की, "जिग्नेशभाईनं आमची मदत केली. त्यांचा फोन मला आला होता. घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे असं त्यांनी मला सांगितल."

फोटो स्रोत, FACEBOOK
"त्यांच्याकडून आम्हाला हिंमत मिळाली. पण, राजकारण आणि निवडणुकांमधून आम्हाला कोणतीही आशा नाही. राज्यात भाजपचं सरकार आहे आणि आमच्या इथले आमदार काँग्रेसचे आहेत. पण, कुणीच आमच्यासाठी पुढे आलं नाही. त्यामुळे दलितांचं कुणी ऐकणार नाही."
गुजरातमध्ये दलितांची संख्या ही जवळपास 7 टक्के आहे. पण, अजून स्वतःचा एखादा दबाव गट ते बनवू शकलेले नाहीत.
तुम्ही हे पाहिलं का ?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










