टीव्ही पाहून तलवार बनवायला गेला अन् इमारती जाळून बसला

फोटो स्रोत, WRGB
टीव्हीवर खाना खजाना किंवा मास्टर शेफ पाहून आपण अनेकदा घरी खाद्य पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी हे पदार्थ बिघडतात तर कधीकधी ते चांगले झाले म्हणून कौतुक होतं.
अमेरिकेतही एका व्यक्तीनं टीव्हीवर बघून घरी चक्क तलवार बनवण्याचा प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न असा फसला की पूर्ण इमारतच जळून भस्मसात झाली.
अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतात कोहोस नावाचं एक छोटं शहर आहे. तिथल्या जॉन गोम्स नावाच्या एका 'हौशी लोहारानं' टीव्हीवर 'फोर्ज्ड इन फायर' नावाची एक मालिका पाहिली.
फोर्ज्ड इन फायर हा हिस्टरी चॅनेलवर येणारा एक रिअॅलिटी टीव्ही शो आहे, ज्यात इतिहासातून प्रेरणा घेऊन जगातली सर्वोत्तम तलवार बनवण्याची स्पर्धा होते.
टीव्हीवर बघितल्याप्रमाणं या व्यक्तीनं तलवार बनवण्यासाठी प्रथम धातू वितळवण्याचा प्रयत्न केला. त्यातच इमारतीला आग लागली आणि बघता बघता पूर्ण इमारत जळून खाक झाली.

फोटो स्रोत, Dan Kitwood/getty
कोहोसचे महापौर शॉन मॉर्स सांगतात की ही शहराच्या इतिहासातील सर्वांत भयंकर दुर्घटना आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या दुर्घटनेमध्ये तीन इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि अन्य 18 इमारतींचं नुकसान झालं.
अग्निशमन दलाच्या तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली पण एका तासानंतर पुन्हा आग सुरू झाली, असं CBS वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे.
सुदैवानं या आगीमध्ये मनुष्यहानी झाली नाही. अग्निशमन दलातील एका अधिकारी आणि 20 लोकांना रुग्णालयात नेण्यात आलं.

फोटो स्रोत, Google
पोलिसांनी जॉनला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर निष्काळजीपणामुळं इतरांचा जीव धोक्यात घालणं आणि मालमत्तेला आग लावण्याचे गुन्हे नोंदवले आहेत.
महापौर मॉर्स म्हणतात, "आम्ही लोकांना नेहमी सांगत असतो की आगीशी खेळ करू नका. पण लोक ऐकतच नाहीत. ते म्हणतात 'होऊन होऊन काय वाईट होईल?'. मग हे असं काही घडतं. बघितलं ना आगीशी खेळ केल्यामुळं कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान झालं, अर्ध शहर जळालं."
जॉन गोम्सच्या मुलाने मात्र आपल्या वडिलांच्या या कृतीचा फेसबुकवरून बचाव केला आहे. "माझ्या वडिलांचा घर जाळण्याचा उद्देश नव्हता. पण ही दुर्घटना घडली," असं त्यानं फेसबुकवर लिहिल्याचं अल्बनी टाइम्सनं म्हटलं आहे.
पोलिसांनीही या पोस्टला दुजोरा देत म्हटलं आहे की आग लावण्याचा जॉनचा उद्देश नव्हता, ती एक दुर्घटना होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








