100 women: अंटार्क्टिका मोहिमेतल्या भारताच्या हिमकन्या

सुदिप्ता

फोटो स्रोत, Sudipta sengupta

फोटो कॅप्शन, सुदिप्ता गुप्ता
    • Author, मेरी हिल्टन
    • Role, 100 वूमन, बीबीसी

कित्येक दशकं अंटार्क्टिका खंडांवर महिलांचं पाऊल पडलं नव्हतं. अंटार्क्टिकाची सफर फक्त पुरुषच करत असत. याचा अर्थ असा नाही की महिलांना हे धाडस करण्याची इच्छा नव्हती किंवा त्यांनी प्रयत्न केले नव्हते.

खरी गोष्ट ही आहे की कित्येक दशकं तर महिलांना या ठिकाणी जाण्याची परवानगीच नव्हती. 1914मध्ये सर अर्नेस्ट शॅकलटन हे अंटार्क्टिका मोहिमेवर जाणार होते.

"तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या," अशी विनंती 3 'स्पोर्टी मुलींनी' केली होती. "फक्त पुरुषचं का? आम्ही का नाही?" अशी विचारणा त्यांनी केली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती.

"1937ला ब्रिटनमधून अंटार्क्टिकावर एक मोहीम जाणार होती. या मोहिमेसाठी एक दोन नव्हे तर तब्बल 1,300 महिलांनी अर्ज केला होता. त्यांना सुद्धा अंटार्क्टिकाला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. याचा सबळ पुरावा आहे," असं अंटार्क्टिका इतिहासतज्ज्ञ मॉर्गन शॉग यांनी म्हटलं.

रशियन भूगर्भशास्त्रज्ञ मारिया क्लेनोव्हा या पहिल्या महिला आहेत ज्यांना अंटार्क्टिकावर संशोधन करण्याचा बहुमान मिळाला. 1956मध्ये त्यांनी या ठिकाणी संशोधन केलं. दहा वर्षानंतर अर्जेंटिनाच्या महिला संशोधकांनी या ठिकाणी संशोधन केलं.

काही देश या बाबतीत मुळातच कूर्मगतीनं वाटचाल करत होते. 1960 ते 1970च्या काळात अमेरिका आणि इंग्लंडच्या महिलांना अंटार्क्टिकावर जाण्याची असलेली बंदी उठली.

महिला आणि पुरुषांना एकाच ठिकाणी राहावं लागेल, याचा त्रास महिलांना सहन करावा लागेल असा 'नैतिक' पवित्रा घेऊन त्यांना या मोहिमेपासून दूर ठेवलं जात असे. अंटार्क्टिकावर संशोधनासाठी जाणाऱ्या पहिल्या ब्रिटिश महिला ठरल्या जेनेट थॉम्पसन. ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेच्या टीममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.

"जेनेट यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या पत्नींना जेव्हा कळलं की या मोहिमेत एक महिला देखील आहे तेव्हा त्यांनी भुवया उंचावल्या. आपण एक गंभीर संशोधक म्हणून या मोहिमेवर जात आहोत, असं जेनेट यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या पत्नींना समजावून सांगितलं तेव्हाच त्या महिलांचा जीव भांड्यात पडला," अशी आठवण शॉग सांगतात.

अंटार्क्टिका

फोटो स्रोत, Getty Images

एकदा तर ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेनं हद्दचं पार केली. महिलांसाठी अंटार्क्टिकावर दुकानं, सलून आणि इतर सुविधा उपलब्ध नाहीत असं कारण देऊन त्यांनी महिलांना परवानगी नाकारली होती.

तरीही, अंटार्क्टिकावर संशोधनासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये कमालीची चिकाटी आणि दृढनिश्चय पाहायला मिळतो.

अंटार्क्टिकावर संशोधन करणाऱ्या महिलांमध्ये भारताच्या महिलांचाही समावेश आहे. भूगर्भशास्त्रज्ञ सुदिप्ता सेनगुप्ता यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं.

अंटार्क्टिकावर जाऊन संशोधन करण्याची आपली इच्छा असल्याचं सेनगुप्ता यांनी भारताच्या ओशियन डेव्हलपमेंट विभागाला 1982मध्येच सांगितलं होतं.

एका वर्षानंतर सेनगुप्ता आणि सागरी जीवशास्त्रज्ञ आदिती पंत या दोघी अंटार्क्टिकावर संशोधनासाठी गेल्या. अंटार्क्टिकामध्ये भारताचं पहिलं संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री स्थापन करण्याचं काम त्यांच्या हाती होतं.

या मोहिमेवर आपण एक शोभेची वस्तू म्हणून जाणार नाही, हे पटवून देण्यासाठी मला संघर्ष करावा लागला अशी आठवण त्या सांगतात.

"माझ्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या मी योग्यपणे सांभाळल्या. संशोधन आणि शारीरिक श्रमांच्या कामाची जबाबदारी मी योग्यरित्या पेलली. एखाद्या पुरुषाप्रमाणं तुम्ही देखील सक्षम आहात, असाच विचार तुम्हाला करावा लागतो," असं सेनगुप्ता म्हणतात.

मोनिका

फोटो स्रोत, MOnika uskeppeliet

दरम्यान, जर्मनीमध्ये असणाऱ्या मोनिका पुस्केप्पेलीट यांना देखील मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं. सर्वांग गोठावणाऱ्या थंडीत आठ ते नऊ महिने संशोधन करण्याचं काम मोनिका यांना आव्हानात्मक वाटलं. म्हणून 1984मध्ये त्यांनी जर्मनीच्या पोलार रिसर्च इंस्टिट्यूटला अर्ज केला.

मोनिका यांनी अर्ज केल्यानंतर इतर महिलांनीही उत्सुकता दाखवली. आम्हाला देखील संशोधन करायचं आहे असं त्या म्हणाल्या. पण त्यांना विरोध झाला.

"आपल्या मोहिमेमध्ये त्यांना महिला आणि पुरुषांची सरमिसळ करायची नव्हती," असं मोनिका सांगतात. "महिलांना या मोहिमेवर नेणं हे निदान या शतकात तरी शक्य नाही असं आम्हाला सांगितलं गेलं."

गंमत म्हणजे या मोहिमेवर जाण्यासाठी महिलांना शतक सरण्याची वाट पाहावी लागली नाही. पाच वर्षानंतर म्हणजेच 1989मध्ये मोनिका यांच्या नेतृत्वात महिलांची एक टीम संशोधनासाठी अंटार्क्टिकावर गेली.

जर्मनीचं संशोधन केंद्र अंटार्क्टिकावर आहे. जॉर्ज वॉन नेयूमेयर असं या केंद्राचं नाव आहे. या ठिकाणी सर्व पुरुष संशोधक काम करत होते. त्यांच्याकडून सर्व कामं आपल्या हाती घ्यायचं, ही जबाबदारी मोनिका यांच्यावर पडली.

आपल्यानंतर सर्वच महिला या ठिकाणी काम करणार म्हटल्यावर पुरुषांच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली असं मी म्हणणार नाही पण त्यांना आमचं येणं नक्कीच आवडलं नाही असं त्या म्हणतात.

मोनिका यांच्या नेतृत्वात आलेल्या या टीमनं अंटार्क्टिकावर 14 महिने घालवले. अक्षरशः 9 मीटर बर्फाखाली त्यांना दिवस काढावे लागले असं त्या म्हणतात.

"ही मोहीम खरंच आव्हानात्मक होती असं त्या म्हणतात. बाह्य जगाशी संपर्क साधण्यासाठी आमच्याकडं केवळ एक रेडिओ होता. पण हा अनुभव आल्हाददायक होता," असं त्या म्हणतात.

"निसर्गाचा आदर करणं म्हणजे काय? याची जाणीव तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी होते. तुम्हाला सतत सावध रहावं लागतं. जर तुम्ही निसर्गाचा आदर ठेवला नाही तर तुम्ही संपलात असं समजा," असं त्या सांगतात.

ही तर झाली काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आता काय परिस्थिती आहे?

'इथं राहणं म्हणजे तुमच्या स्वतःच्याच डॉक्युमेंटरीमध्ये जगण्यासारखं आहे,' अशी बोलकी प्रतिक्रिया डॉ. जेस वॉकअप यांनी दिली.

"तुमच्या भोवताली सील, पेंग्विन आणि कधीकधी व्हेलही असतात. त्यांच्यासोबत राहण्याचा आनंद तुम्हाला लुटता येतो," असं त्या म्हणतात.

वॉकअप या रोथेरा स्टेशनच्या बेस लीडर आहेत. त्यांनी अंटार्क्टिकामध्ये आता तीन 'हिवाळे' पाहिले आहेत.

"पहिल्या मोहिमेत असताना माझ्या टीममध्ये मी एकटीच महिला होते. पण मला कधी माझ्या पुरुष सहकाऱ्यांनी हे कधी जाणवू दिलं नाही," असं त्या म्हणतात.

पण या मोहिमेला येणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण कमीच आहे असं वॉकअप यांना वाटतं. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये संशोधन केंद्राचं काम चालू ठेवण्यासाठी तंत्रज्ञांची गरज असते. प्लबंर्स, इंजिनिअर्स आणि मेकॅनिक हे बहुतांशवेळा पुरुष असतात म्हणून संशोधन केंद्रावर पुरुष अधिक प्रमाणात दिसतात.

"पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया फक्त 10 ते 25 टक्के याच प्रमाणात दिसतील. मी ज्या महिलांसोबत काम केलं त्यांच्याशी माझी चांगली गट्टी जमली असा माझा अनुभव आहे," असं त्या सांगतात.

मिशेल

फोटो स्रोत, Michelle koutinik

गेल्या काही वर्षांमध्ये महिलांसाठी परिस्थिती सुधारल्याचं मत प्रा. मिशेल कुतनिक यांनी मांडलं आहे. मिशेल या 2004 पासून नियमितपणे संशोधनासाठी अंटार्क्टिकावर येतात.

जरी महिलांचं प्रमाण खूप नसलं तरी या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी काही आदर्श नक्कीच होते असं मिशेल मानतात. मिशेल या मॅकमुद्रो संशोधन केंद्रात काम करतात. सध्या त्या हिमनगांचा अभ्यास करत आहेत.

आता अंटार्क्टिकात संशोधन करणं ही फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही. त्याच बरोबर इतर क्षेत्रातही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे.

नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अॅंड ओशियन रिसर्च

फोटो स्रोत, NAtional centre for antartic and ocean research

या वर्षी पहिल्यांदाच भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेअंतर्गत असलेल्या दोन्ही संशोधन केंद्रांवर महिलांची उपस्थिती होती.

"तुम्ही जेव्हा एखाद्या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार असतात त्यावेळी तुम्हाला हे जाणवत नाही. पण थोडं मागं वळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं की हा एक महत्त्वाचा क्षण होता," असं सेनगुप्ता यांनी बीबीसीला सांगितलं.

हे पाहिल का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)