प्रेस रिव्ह्यू : टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींना वेळेची मर्यादा

फोटो स्रोत, Getty Images
सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखवू नयेत असा आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यानं काढला.
यासंदर्भात समाजाच्या विविध स्तरातून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. दिवसभरात सातत्यानं प्रसारित होणाऱ्या कंडोमच्या जाहिराती विशिष्ट वयोगटातल्या व्यक्तींसाठी आहेत.
लहान मुलांसाठी या जाहिरातीचं प्रसारण उचित नसल्यानं कंडोमच्या जाहिराती दिवसभरात दाखवण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश मंत्रालयानं दिले आहेत.
या जाहिरातींमध्ये अनेकदा काही आक्षेपार्ह दृश्यांचाही समावेश असतो. ही दृश्यं लहान मुलांनी पाहणं योग्य नसतं. त्यामुळे हे निर्देश देण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
आरोग्यसेवा महागली
राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला रास्त दरात आरोग्यसेवा देणाऱ्या सरकारी हॉस्पिटलमधील आरोग्यसेवा महागल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
या दरवाढीत महत्त्वाच्या सेवा महागणार असून यात नोंदणी शुल्क, लहान शस्त्रक्रिया, मधुमेह, कर्करोग, पोटाचे विकार, हृदयरोग, आदी आजारांच्या उपचारांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, DIPTENDU DUTTA
राज्यात सरकारची वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित 20 हॉस्पिटलं आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभागानं या रुग्णालयांमधील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा निर्णय नोव्हेंबरमध्ये झाला होता. पण त्याची अमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे.
या निर्णयानंतर आता लहान शस्त्रक्रिया 350 ते 1100 रुपये, मोठ्या शस्त्रक्रिया साडेतीन हजार ते 11 हजार रुपये, विविध चाचण्यांसाठी 200 ते 1700 रुपये आकारण्यात येणार असल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे.
देशभरात एका वर्षात 1.60 कोटी गर्भपात
आरोग्यासंबंधीच एक महत्त्वाची बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे. 2015 या वर्षात देशभरात तब्बल 1.60 कोटी गर्भपात झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. 'लँसेट' या वैद्यकीय विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या जर्नलच्या अहवालाची माहिती या वृत्तात दिला आहे.
केंद्र सरकारनं 2015मध्ये झालेल्या गर्भपातांची संख्या फक्त सात लाख एवढीच सांगितली होती, असंही या बातमीत नमूद केलं आहे. ही संख्या प्रत्यक्षात 20 पटींनी जास्त आहे.
विशेष म्हणजे या 1.60 कोटी गर्भपातांपैकी 81 टक्के एवढे जास्त गर्भपात घरच्या घरी केले जातात.
सरकारी आकडेवारीत केवळ सरकारी हॉस्पिटल्समध्ये झालेल्या गर्भपातांची नोंद होते. त्यापेक्षा कितीतरी जास्त गर्भपात देशात होत असले, तरी ते सरकारी आकडेवारीत नमूद होत नाही, असं इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेसचे डॉ. चंद्रा शेखर यांनी स्पष्ट केल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी विधान भवनावर मोर्चा काढणार
'सकाळ'नं दिलेल्या वृत्तानुसार शेतकरी कर्जमाफी, यवतमाळमधील विषारी कीटकनाशक फवारणीचे बळी अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवारी नागपूर येथे विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत.
या मोर्चात शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांचाही समावेश असेल, असं 'सकाळ'नं म्हटलं आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते दीक्षाभूमीजवळ जमणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनवटे कॉलेजजवळ जमतील. सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघणार आहे.
सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात असलेल्या असंतोषाला वाचा फोडण्याचं काम या मोर्चाद्वारे करणार असल्याचं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
अमित ठाकरेंच्या साखरपुड्याला 'उद्धवकाकां'ना आमंत्रणच नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाच्या म्हणजे अमित ठाकरे यांच्या साखरपुड्याला उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. उद्धव यांच्यासंह त्यांची पत्नी आणि मुलगा आदित्य हेदेखील या समारंभाला हजर नव्हते, असं वृत्त एबीपी माझाच्या वेबसाइटनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Mitali Borude/facebook
महालक्ष्मी रेसकोर्सच्या टर्फ क्लबवर झालेल्या या साखरपुड्याचं आमंत्रण उद्धव यांना नसल्याचंही एबीपी माझानं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर खूपच कमी प्रसंगी दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. अमित ठाकरे यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने दोघे एकत्र येतील, अशी अटकळ होती. पण तसं काहीच झालं नसल्याचं 'एबीपी माझा'नं नमूद केलं.
'विनानिमंत्रण पाकिस्तानला जाणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रीयत्वाचे धडे देऊ नयेत'
गुजरातमधील संभाव्य पराभवानं पंतप्रधान नरेंद्र मोदी बिथरले असून, राजकीय फायद्यासाठी ते माजी पंतप्रधान आणि लष्करप्रमुखपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत असल्याचं सडेतोड प्रत्युत्तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं आहे.
विनानिमंत्रण पाकिस्तानला जाणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रीयत्वाचे धडे देऊ नयेत अशा शब्दांत सिंग यांनी आपल्या भावना मांडल्या. यासंदर्भातलं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images/Sean Gallup
राजकीय कुरघोड्या करण्यात ऊर्जा वाया घालवण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी आपल्या पदाला शोभेल अशा परिपक्वतेनं वागावं आणि पदाचा मर्यादाभंग केल्याबद्दल देशवासियांची माफी मागावी असं सिंग यांनी सुनावलं आहे.
काँग्रेसमधून निलंबित ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसूरी यांच्या उपस्थितीत 6 डिसेंबरला झालेल्या बैठकीचा उल्लेख करून आणि पाकिस्तान लष्कराच्या माजी अधिकाऱ्याचा ट्वीटचा संदर्भ देऊन मोदींनी गुजरात निवडणुकीमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे.
महिलांच्या आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात महिला सर्वाधिक आत्महत्या करतात. 'लोकमत'नं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या या अहवालाचा हवाला देत याबाबतचं वृत्त दिले आहे.
'लोकमत'च्या वृत्तानुसार जानेवारी ते डिसेंबर 2016 या वर्षात देशभरात 4485 महिलांनी स्वत:चं जीवन संपवलं. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे 768 महिला महाराष्ट्रातल्या आहेत.

फोटो स्रोत, AFP
बदलती जीवनशैली, कामाचा वाढता तणाव, कौटुंबीक हिंसाचार, हुंड्यासाठी झळ, मानसिक दबाव, प्रेमसंबंधांमधील तणाव या कारणांमुळे या आत्महत्या होत असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.
महाराष्ट्राखालोखाल मध्य प्रदेशमध्ये 565 आणि तेलंगणात 560 महिला आत्महत्या करतात. या काळात गोव्यात फक्त एकाच महिलेनं आत्महत्या केल्याचेही एनसीआरबीच्या अहवालात म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








