प्रेस रिव्ह्यू : फडणवीस सरकारच्या अर्धा डझन मंत्र्यांना डच्चू?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं याच महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचं निश्चित केलं आहे. त्यावेळी मंत्रिमंडळातील काही निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाईम्सनं हे वृत्त दिलं आहे. वृत्तानुसार, इतर पक्षातील काही नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

भाजपच्या मंत्र्यांचा कार्यअहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवून घेतला आहे. त्यानुसार, अर्धा डझन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं जाईल. यात काही ज्येष्ठ मंत्र्यांचाही समावेश आहे.

ह निर्णय घेताना आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक मंत्र्याची खातेनिहाय कामगिरी तसंच पालकमंत्री म्हणून केलेलं कामही विचारात घेतले जाणार आहे.

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर काँग्रेसची टीका

"सिंचन घोटाळ्यचा मुद्दा पुढे करून भाजप राज्यात निवडून आली. त्यानंतर या विभागातील चौकशीचा मुद्दा पुढे करून राजकीय सौदेबाजी केली जात आहे, असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं", अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

लोकसत्तानं याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर मंगळवारी टीका केली. या सरकारचं काम निजाम राजवटीच्या पुढं गेलं असल्याचंही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

.. तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नाही कापणार

एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार हा दंड म्हणून कापला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

एबीपी माझा डॉट कॉमच्या वृत्तानुसार, जे कर्मचारी संपकाळातील चार दिवसांसाठी आठ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील, त्यांची कोणतीही पगारकपात केली जाणार नाही, असं रावते यांनी सांगितलं.

मंत्रालयात झालेल्या परिवहन विभागाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

'एफटीआयआय'मध्ये लैंगिक शोषण?

गुलाबी गॅंग या चित्रपटाच्या दिग्दर्शक निष्ठा जैन यांनी एफटीआयआयमध्ये चालणारा गैरप्रकार फेसबुकवरून जाहीर केला आहे.

ई-सकाळनं यासंबंधीची बातमी दिली आहे. पुण्यातील एफटीआयआयमधल्या शिक्षकांवर लैंगिक शोषणाबद्दल काही आरोप झाले आहेत.

एफटीआयआयनं मात्र आपल्या शिक्षकांनाच पाठिंबा देत आपल्या शिक्षकांचं रेकॉर्ड 'क्लीन' असल्याचं म्हटलं आहे.

निष्ठा जैन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये एका प्राध्यापकांच नाव घेतं घडलेला प्रसंग लिहला आहे.

जयूपर महापालिकेत राष्ट्रगीत, वंदे मातरम बंधनकारक

राजस्थानातील जयपूर महापालिकेनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् म्हणणं बंधनकारक केलं आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सकाळी कार्यालय सुरू होताना राष्ट्रगीत म्हटलं जाईल. कार्यालय सुटताना वंदे मातरम् म्हटलं जाईल. जयपूरचे महापौर अशोक लाहोटी यांनी या निर्णयाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं असं म्हटलं आहे.

हा निर्णय महापौर लाहोटी आणि महापालिका आयुक्त रवी जैन यांनी घेतला. देशाप्रती प्रेम आणि देशभक्ती जागृत होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं महापालिकेनं काढलेल्या पत्रात म्हटलं आहे.

प्रफुल पटेल यांची निवड रद्द

दिल्ली उच्च न्यायालयानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची अध्यक्ष निवड रद्द केली आहे.

झी 24 तासच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

दिल्ली उच्च न्यायालयानं माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं नव्यानं पाच महिन्यात निवडणूक घ्यावी असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. फुटबॉल महासंघानं घेतलेल्या निवडणुकीत राष्ट्रीय क्रीडा संहितेचं उल्लंघन झाल्याचं मत न्यायालयानं नोंदवल्याच या वृत्तात म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)