जहाजाखालच्या रडर ब्लेडजवळ लपून 14 दिवसांचा धोकादायक प्रवास, शेवटी घडलं असं काही...

जहाज

फोटो स्रोत, CHEF MOHSIN QURESHI

    • Author, जोएल गुंथेर
    • Role, बीबीसी न्यूज

चार नायजेरियन व्यक्तींना ऑइल टँकरच्या जहाजात लपून युरोपला जायचं होतं, पण ते जहाज ब्राझीलला पोहोचेल हे त्यांना माहीत नव्हतं. दोन आठवड्याच्या या प्रवासात त्यांना आपला जीव गमवावा लागला असता.

27 जूनच्या मध्यरात्रीनंतर रोमन एबिमरने शुक्रवारसाठी जेवण बनवलं. तो अंधारात लागोसला निघाला. त्याच दिवशी डॉकयार्डवर 190 मीटर लांबीचा जड ऑइल टँकर जहाज तयार होता. त्याला वाटलं की तो त्याला नायजेरियातून युरोपला घेऊन जाईल. कसं तरी जहाजाच्या रडर ब्लेडपर्यंत पोहचणं हे त्याचं ध्येय होतं, कारण जहाजावरून चोरून प्रवास करणाऱ्यांसाठीच ही एकमेव जागा होती.

या जहाजापर्यंत पोहोचण्यासाठी मच्छिमारांच्या बोटीत बसून जावं लागत असे.

"तो मच्छिमार चांगला होता त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नाहीत.तो मला जहाजाजवळ सोडणार होता."

मच्छीमार रडर ब्लेडच्या जवळ जातो. 35 वर्षीय एबिमर जहाजाच्या खालच्या बाजूनं रडार ब्लेडवर चढले.दोरीच्या साहाय्यानं त्यानी खाद्यपदार्थ असलेली पिशवी बाहेर काढली. तिथेच काही वेळ घुटमळल्यानंतर अंधारात आणखीन तीन चेहरे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्याच युक्तीनं जहाजावर चढणारा एबिमर हा चौथा व्यक्ती होता.

ते सांगतात की,"सुरुवातीला मला भीती वाटली. पण ते कृष्णवर्णीय आफ्रिकन म्हणजेच माझे भाऊच असल्याचं ते सांगतात."

त्यानंतर 15 तास त्यांनी शांतपणे आपलं डोकं रडर ब्लेडच्या बाजूला ठेवलं आणि विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी 28 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता जहाजाच्या जड मोटर्स सुरु झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

त्यांना वाटलं ते सर्व युरोपला जात आहेत आणि आणि आठवडाभरात ते पोहचतील.

'कॅन व्हेव' या तेलाच्या टँकरने बंदर सोडलं आणि समुद्रातील त्यांचा प्रवास सुरु झाला.

दोन आठवड्याच्या या धोकादायक प्रवासात ते मृत्यूच्या उंबरठयावर होते.

पहिला दिवस

लागोस सोडल्यानंतर रडर ब्लेडवर असलेले आरामासाठी जागा शोधत होते, त्यांनी आजूबाजूला पाहिलं. तिथे फारशी जागा उपलब्ध नव्हती. जहाजाची दिशा बदलणार रडर ब्लेड पुढे-मागे फिरत होतं. ते सर्व झोपायला गेले.

रडर ब्लेडच्या भागात जहाजात समुद्राच्यावर दोन जाळ्या लटकत होत्या.

भूमध्य समुद्र पार करण्यासाठी ते रडर ब्लेडवर राहून आपला जीव का धोक्यात घालत होते? ते इतरांना समजणार नाही. पण ज्यांनी आपल्या जीवनातली आशाच गमावली आहे, ते समजू शकतात.

जहाज

फोटो स्रोत, VICTOR MORIYAMA/BBC

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"नायजेरियात नोकरीची संधी नाही, पैसे नाहीत. माझ्या आईची आणि धाकट्या भावाची जबाबदारी माझ्यावर असल्यानं माझ्यापुढे दुसरा पर्याय नाही."

ते पुढे सांगतत, "मी कुटुंबातील मोठा मुलगा आहे. माझे वडील 20 वर्षांपूर्वी वारले. मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी पण ते करू शकलो नाही. लागोसच्या रस्त्यावर मी नोकरी शोधण्यात तीन वर्ष भटकत राहिलो."

"नायजेरियात दररोज गुन्हेगारी आणि पाप यांच्यासोबत संघर्ष होतो,असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. लोकांना मारलं जातं. दहशतवादी हल्ले आणि अपहरणाच्या घटना घडतात. मला त्यांच्यापेक्षा चांगलं भविष्य हवं आहे," तो सांगतो.

रडर ब्लेडच्या मागे लपलेल्यांमध्ये ओपेमिपो मॅथ्यू यी हे चर्चचे पाद्री आणि एक व्यापारी आहेत. त्यांना दोन मुलं आहेत.दुष्काळग्रस्त नायजेरियाला पूर आल्यानं भुईमूग आणि पामची झाडं नष्ट झाली. नुकसान भरून काढण्यासाठी विम्याशिवाय दुसरं कोणतंच उत्पन्न नाही.

" माझा व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यानं माझं कुटुंब रस्त्यावर आलं आहे. म्हणूनच हा निणर्य घ्यावा लागला," असं यी सांगतात.

नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत अनियमितता आणि मतदानाची हेराफेरीचे आरोप झाल्यानंही योग्य निर्णय घेतल्याचं ते सांगतात.

" निवडणूक हीच आमची आशा आहे,आणि नायजेरियात काय चाललं आहे आम्हाला माहीत आहे. संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट आहे."

जहाज प्रवास

त्यामुळं घरच्यांना न सांगताच आधी मी बहिणीच्या घरी गेलो आणि थेट बंदर गाठलं.

इथे आल्यानंतर 'कॅन व्हेव' जहाज निघण्याच्या तयारीत होतं.

यी यांच्याप्रमाणेच बरेच लोक आर्थिक मंदी आणि बेरोजगारीमुळं नायजेरिया सोडत आहेत. सहारा वाळवंट आणि भूमध्य समुद्र ओलांडून कित्येक लोक देश सोडून जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार देशातून पलायन करताना 1,200 लोकांचा मृत्यू झालाय.

लोक अनधिकृत आणि लपून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. एबिमर आणि ओपेमिपो मॅथ्यू यी आणि इतर दोघं रडर ब्लेडवर बसले होते. ते स्पेनमधील कॅनरी बेटावर पोहचण्यासाठी 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार होते.

विल्यम आणि जीझ हे दोघेही या प्रवासात होते. प्रवासाची सुरुवात खूप अस्वस्थ आणि भीतीदायक होती. यी हा कमी बोलणारा.

तो देवाची प्रार्थना करत होता. जहाज चालत असताना जागं राहण्याचा प्रयत्न केला.

अटलांटिक महासागरात त्यांनी 5,600 किलोमीटरचा प्रवास केला, पण ते युरोपपर्यंत पोहचू शकले नाहीत. जहाज ब्राझिलला पोहोचलं होतं.

पाचव्या दिवशी काय झालं?

जर्जर झाल्याल्या जहाजातून भूमध्य सागराचा प्रवास करण्यापेक्षा पायी सहार वाळवंट ओलांडणं अधिक सुरक्षित आहे. पाचव्या दिवशी एबिमर आणि यी यांना समजलं की ते गंभीर संकटात आहेत.

त्यांना योग्य अन्न आणि झोपही मिळालं नाही. त्यामुळं त्यांना ग्लानी आली होती.

शौचालय नसल्यानं त्यांना युरिनसाठी त्यांना कमरेला दोरी बांधून रडर ब्लेडपर्यंत जावं लागत असे. समुद्राला भरती आल्यानंतर लाटा जोरदार आदळत होत्या.

"जेव्हा मोठ्या लाटा यायच्या तेव्हा आम्ही सर्वजण घाबरायचो," असं यी सांगतात.

जहाज प्रवास

फोटो स्रोत, VICTOR MORIYAMA/BBC

"मी या आधी कधीही महासागर पाहिला नव्हता, पण मी वादळावरची डॉक्युमेंट्री पहिली होती. ज्यात मोठ्या लाटा जहाजांना पुढे-मागे ढकलताना पहिल्या आहेत."

"या परिस्थितीत झोपणं अशक्यचं होतं. कारण रडर ब्लेड 24 तास फिरत राहते. तुम्हाला सतर्क राहावं लागतं," एबिमर सांगतात.

दिवसांमागून दिवस जात होते. दिवस आणि रात्र होत होती. आम्ही अशक्त असल्यानं बोलतही नव्हतो. एमिबरने त्याच्या घड्याळाकडे पाहून दिवस आठवण्याचा प्रयत्न करायचे.

रडर ब्लेडजवळची जाळी मजबूत असली तरी सैल झाली होती. खाद्यपदार्थ ही संपत आले होते. प्यायला पुरेसं पाणी ही नव्हतं. घसा कोरडा पडला होता. भुकेनं व्याकूळ झालो होतो. पण आमचं लक्ष फक्त पाण्यात पडू नये याकडेच होतं, तशी काळजी आम्ही घेतं होतो.

दहा दिवसांचा प्रवास

दहावा दिवस आला तेव्हा चौघांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यादिवशी सकाळी पुरेल एवढेच अन्नपदार्थ शिल्लक होते. प्यायचं पाणीही संपत आलं होतं. आम्ही अन्न पुरवून खात होतो, त्यामुळं भूक लागली होती.

"ही खूप कठीण परिस्थिती होती" असं यी सांगतात.

"माझा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. माझ्या आयुष्यात पाहिलांदाच मी अशा परिस्थितीचा सामना केला. तेव्हाच मला पाणी म्हणजे काय? ते समजलं."

"तहान भागवण्यासाठी आम्ही समुद्राचं खार पाणी प्यायलो. एवढचं कमी की काय तर भूक भागवायला टूथपेस्टही खाल्ली."

जहाज प्रवास

फोटो स्रोत, Reuters

बाराव्या दिवशी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या एक व्यक्तीला खारं पाणी प्यायल्यानं उलट्या झाल्या.

"तो अशक्त झाला होता. तो समुद्राच्या पाण्यात पडणार अशीच स्थिती होती. खाली पाहिलं तर खोल पाणी दिसत होतं.त्यांच्यात मी एकटाच तसा धीट होतो. "तो खाली पडणार तेवढ्यात मी त्याला आधार दिला," असं एमिबर सांगतात.

तहान आणि भुकेनं व्याकुळ असल्यानं ते मृत्यूच्या जवळ जात होते. परिस्थितीपासून स्वतःचे लक्ष विचलीत करण्यासाठी एमिबर रडर ब्लेडवर स्वतःचे पाय पालथे टाकून बसले होते. यातून काही मार्ग निघेल का याचा विचार ते करत होते.

तेराव्या दिवशी समुद्रात एक व्हेल मासा दिसला.

"असं दृश्य पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ होती," असं सांगत एमिबर हसतात.

"जर मी माझ्या देशात कुणाला सांगितलं की व्हेल मासा पहिला आहे,तर त्यांना वाटेल मी खोट बोलत आहे."

पण यामुळं माझी तहान भूक नाहीशी झाली,एमिबर सांगतात.

शेवटच्या दिवशी काय झालं?

चौदाव्या दिवशी जहाजाची जड इंजिन्स मंदावली होती. एमिबर हा रडार ब्लेडच्या काठावर होता. धूसरसा भूप्रदेश नजरेत येत होता. मग इमारती दिसू लागल्या. नंतर एक बोट दिसू लागली. क्रू बदलादरम्यान त्यांना कुणीतरी रडर ब्लेड वर पाहिलं.

तिथं कुणी तरी आहे? ते कोण आहेत? त्यांनी आरडाओरडा सुरु केला

एमिबर यांना त्यांना उत्तर द्यायचे होते, पण त्यांचा घसा कोरडा पडला होता. त्यानंतर जहाज तिथून निघालं दोन तासानंतर आणखीन प्रकाश डोळ्यावर आला. तिथं पोलीस आले होते. पोलिसांनी एमिबर यांना पिण्यासाठी ताज्या पाण्याची बॉटल दिली.

"तुम्ही ब्राझीलमध्ये आहात," तो म्हणाला.

आम्ही सुखरुप पोहचलो होतो. तिकडच्या लोकांनी मदत केली. त्यांच्या घरी बोलावलं. विल्यम आणि जिझ दोघंही नायजेरियाला परत जायला तयार झाले. पण एमिबर आणि यी यांनी ब्राझीलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

"आम्ही इथं आंनदी आहोत, ही एक नवीन सुरुवात आहे." यी म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)