गावात विचित्र आवाज आल्यामुळे ‘रबराचा चेहऱ्याच्या’ माणसाला अटक झाली आणि ड्रग्सचं रॅकेट सापडलं

बॉसवेलने पोलिसांना 17 खोटी नावं आणि पत्ते दिले
फोटो कॅप्शन, बॉसवेलने पोलिसांना 17 खोटी नावं आणि पत्ते दिले
    • Author, मॅट मरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

यूकेतल्या वेल्स प्रदेशातल्या एका खेड्यात चाळीस वर्षांपूर्वी ‘रबराचा चेहरा असणाऱ्या’ एका माणसाला एका माणसाला अटक झाली आणि त्यातून पुढे आलं एका आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचं सत्य.

ही त्याचीच कहाणी.

1993 साली 'ऑपरेशन सील बे' नावाची एक मोहीम राबवली गेली. एका गुप्त बंकरमध्ये ड्रग्सचं एक आंतरराष्ट्रीय रॅकेट चालायचं, ते नष्ट करण्यासाठी ही मोहीम राबवली गेली होती.

रॉबिन बॉसवेल आणि एक डॅनिश अभिनेता सोरेन बर्ग-आरबँक हे दोघं मिळून हे रॅकेट चालवायचे.अकरा वर्षं ते पोलिसांपासून लपून छपून राहात होते.

सोरेन बर्ग-आरबँक वेश बदलण्यात पटाईत होता. ड्रग व्यापारासाठी तो युरोपातल्या पोलिसांच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये होता.

एका गावातल्या शेतकऱ्यांनी आणि मच्छिमारांनी गावात काहीतरी विचित्र घडतंय अशी तक्रार केली आणि त्याला अटक झाली.

1985 साली 35 वर्षांचा सोरेन बर्ग-आरबँक एका आलिशान बोटीवर ऐशोआरामाचं आयुष्य जगत होता. त्याचे इटली आणि स्वित्झर्लंडमध्ये मोठमोठे बंगले होते. पण पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो न्यूपोर्टमधल्या पेम्ब्रुकशायर नावाच्या छोट्याशा गावात येऊन राहिला.

डॉन इव्हान्स तेव्हा तिथल्या पोलिसांचे प्रमुख होते. ऑपरेशन सील बे त्यांच्याच नेतृत्वाखाली चालवलं गेलं. त्यांच्या मदतीला होते डेप्युटी सुपरिटेंडन्ट डेरिक डेव्हिस.

या घटनेबदद्ल चाळीस वर्षांनी बोलताना इव्हान्स म्हणाले, सोरेन बर्ग-आरबँक आणि त्याच्या गँगला अटक झाली कारण पेम्ब्रुकशायरमधल्या लोकांचा चौकस स्वभाव.

सोरेन बर्ग-आरबँक
फोटो कॅप्शन, सोरेन बर्ग-आरबँक ड्रग व्यापारासाठी तो युरोपातल्या पोलिसांच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये होता
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणतात, “या गँगने स्थानिक लोकांना कमी लेखलं. त्यांना वाटलं या अडाणी लोकांना काय समजणार, पण तिथल्या लोकांची निरिक्षणशक्ती तगडी होती, ते चौकस बुद्धीचे होते. या प्रकरणात आम्ही 540 स्थानिक लोकांचे जबाब नोंदवले.”

सू वॉर्नर आणि त्यांचे आईवडील न्यूपोर्ट किनारपट्टीवरच्या एका लहानशा शेतावर राहायचे. त्यांनी पहिल्यांदा तिथे घडणाऱ्या संशयास्पद हालचालींची कल्पना पोलिसांना दिली.

रॉबिन बॉसवेल, सोरेन बर्ग-आरबँक आणि त्याच्या गँगमधले इतर गुंड स्थानिक पबमध्ये वारेमाप पैसा उधळायचे. यामुळे गावकऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेल, सू सांगतात.

“ते सतत पार्टी करायचे आणि ड्रिंक्ससाठी पैसे देताना सरळ 50 पाऊंडांच्या नोटा काढायचे. त्या लहानशा गावात ही रक्कम मोठी होती. त्यांच्याकडे खूप पैसे असायचे आणि आलिशान कार्स होत्या. लोकांना अंदाज आला की यांचं काहीतरी भलतंच सुरू आहे.”

त्या पुढे म्हणतात, “एके दिवशी माझ्या वडिलांनी गावातल्या आणखी काही लोकांसोबत पहारा द्यायचं ठरवलं. ते रात्रीच्या वेळी जवळच्या एका टेकडीवर चढले आणि त्यांना दिसलं की दोन लोक एका जागेपाशी सतत असतात, तिथेच झोपतात. इथून विचित्र आवाज यायचे. याच ठिकाणी गँग आपले ड्रग्स ठेवायची. गावकऱ्यांना आता हळूहळू सगळा प्रकार लक्षात यायला लागला.”

स्थानिक मच्छिमारांनाही संशय येत होता. त्यांना खाडीजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांनी न्यूपोर्ट पोलिसांना कळवलं. त्यांना आधी वाटलं की हे संशयित लोक व्हेल आणि डॉल्फिन्सची शिकार करणारे असतील.

सू वॉर्नर
फोटो कॅप्शन, सू वॉर्नर आणि त्यांचे आईवडील यांनी पहिल्यांदा तिथे घडणाऱ्या संशयास्पद हालचालींची कल्पना पोलिसांना दिली.

या गँगच्या सदस्यांनी स्थानिक मच्छिमारांना सांगितलं होतं की ते ग्रीनलँडला जाणार आहेत. तिथे ते व्हेल आणि सील माशांवर एक डॉक्युमेंट्री बनवणार आहेत. पण स्थानिक मच्छिमारांचा त्यावर विश्वास बसला नाही आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी सर्च वॉरंट आणलं आणि एका स्थानिक शेतकऱ्याला घेऊन या लोकांच्या अड्ड्यावर गेले. या शेतकऱ्याने एक दगड उचलून जवळच्याच एका गुहेत फेकला. तो दगड एका पोकळ ठिकाणी आदळल्याचा आवाज आला.

जिथून आवाज आला तिथली दगड माती बाजूला करून तिथे खणल्यानंतर पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. खाली एक गुप्त बंकर होतं.

इव्हान्स म्हणतात, “खूप वेळ घेऊन ते बंकर बांधलंय असं लक्षात येत होतं. त्याला लाकडी खांबानी आधार दिला होता आणि फायरबर ग्लास रेझिनेने ती लाकडं एकमेकांना चिकटवली होती. तिथली दगडमाती बाजूला करून हे बांधकाम करायला खूप वेळ लागला असेल असं लक्षात येत होतं. हे सगळं सामान त्यांनी बोटीने आणलं असावं.”

पोलिसांना तिथे 80,000 पाऊंड्स मुल्याची उपकरणं, शक्तीशाली पावरबोट मशीन्सची इंजिन्स, बांधकामाचं साहित्य आढळून आलं.

आधी पोलिसांना वाटलं की हे बंकर IRA या कट्टरतावादी संघटनेचं असावं, पण या छापेमारीच्या काही महिने आधीच गांजाचं एक मोठं बंडल न्यूपोर्टच्या किनाऱ्यावर वाहून आलं होतं त्यामुळे पोलिसांना संशय होता की या बंकरचा आणि ड्रग तस्करीचा काहीतरी संबंध असावा.

ऑपरेशन सील बेच्या अधिकाऱ्यांना वाटत होतं की या वॉटरप्रुफ बंकरमध्ये साधारण 70 लाख पाऊंड किंमतीचे ड्रग्स साठवले जाऊ शकतात.

रॉबिन बॉसवेल हा सोरेन बर्ग-आरबँकसोबत काम करायचा आणि या सर्व ड्रग्स तस्करीमागचा मुख्य मेंदू त्याचा होता. पोलिसांनी त्याचं वर्णन सार्वजनिक केलं

पोलिसांना भूमिगत बंकर सापडलं

फोटो स्रोत, DON EVANS

फोटो कॅप्शन, पोलिसांना भूमिगत बंकर सापडलं

दोन लहान मुलं आणि त्यांच्या आईला बॉसवेलच्या वर्णनाशी जुळणारा माणूस दिसला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तातडीने त्या माणसाला अटक केली, तो बॉसवेलच निघाला.

त्याने पोलिसांना 17 खोटी नावं सांगितली आणि खोटे पत्ते दिले.

“त्याला अटक केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा आम्हाला काहीही माहिती देणार नाहीये, फक्त खोटं सांगून आमची दिशाभूल करेल. पण त्याच्या बुटांवर फायबर ग्लास रेझिनचे शिंतोडे आढळून आले. बॉसवेलचा संबंध त्या बंकरशी आहे हे सिद्ध करण्यासाठी एवढं पुरेसं होतं,” इव्हान्स म्हणतात.

बॉसवेलला अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बर्ग-आरबँकला अटक झाली. फिशगार्ड जवळ पोलिसांना तो दिसला.

पोलीस नजरेला पडताक्षणी त्याने आपल्या खांद्यावरची बॅग फेकून दिली आणि धूम पळत सुटला. शेतातून वेडावाकडा पळत राहिला, पोलीस त्याच्या मागावर होतेच. एके ठिकाणी त्याने बांधावरच्या कुंपणावरून उडी टाकली. पण दुसऱ्या बाजूला थेट 70 फुट खोल खड्डा होता, त्याच्या लक्षात आलं नाही आणि तो सरळ खड्ड्यात पडला.

बंकरमध्ये अनेक मौल्यवान उपकरणं सापडली

फोटो स्रोत, DON EVANS

फोटो कॅप्शन, बंकरमध्ये अनेक मौल्यवान उपकरणं सापडली

त्याच्या नशीबाने त्याने पडताना एका झाडाची बाहेर आलेली फांदी धरली त्यामुळे तो वाचला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. तब्बल 11 वर्षं पोलीस त्याच्या मागावर होते, आणि अखेरीस त्याला अटक झाली होती.

पोलिसांनी त्याच्या खांद्यावरचा बॅगही जप्त केली. त्यात एक शक्तीशाली रेडियो आढळला ज्यावरून ड्रग स्मगलर एकमेकांशई संपर्क साधायचे.

तो रेडियो हस्तगत करून पोलीस त्यावर येणाऱ्या संदेशाची वाट पाहू लागले. काही तासातच त्यावर एक आवाज आला, “आई, आई... मला यायचं आणि माझ्या हातावरची धूळ धुवून टाकायची आहे.”

सोरेन बर्ग-आरबँक
फोटो कॅप्शन, सोरेन बर्ग-आरबँक वेश बदलण्यात पटाईत होता. त्याचे वेगवेगळे अवतार

इव्हान्स म्हणतात, “आम्हाला कळून चुकलं होतं की खाडीच्या किनाऱ्यावर एक बोट आलीये आणि त्यात ड्रग्स आहेत.”

पोलिसांनी खाडीजवळ सापळा रचून त्या बोटीवरचा माल हस्तगत केला.

ऑपरेशन सील बे राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना कधीच वाटलं नव्हतं की, यामुळे ड्रग तस्करीची एक आंतरराष्ट्रीय साखळी समोर येईल. यात न्यूपोर्टपासून लंडन, फ्रान्स, स्पेन आणि स्कँडेनेव्हियातले लोक गुंतलेले होते.

“ही एक मोठी साखळी होती, ती आम्ही उद्धवस्त केली,” माजी डेप्युटी सार्जंट जॉन डॅनियल्स म्हणतात.

"बर्ग-आरबँकची आलिशान बोट आम्हाला सापडली नाही, पण इतर पुरावे होते, त्याव्दारे आम्ही ड्रग्स तस्करीचं रॅकेट मोडून काढलं. म्हणजे असं समजा की खून झालाय, पण मृतदेह आढळला नाही. पण त्यात इतर पुरावे सापडल्यामुळे तुम्ही गुन्हा सिद्ध केला,” ते पुढे म्हणतात.

डॅनियल्स सांगतात, “एका छोट्या गावातल्या पोलिसांनी एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीला आणलं, ही फार मोठी गोष्ट होती.”

ऑपरेशन सील बेच्या अधिकाऱ्यांनी बॉसवेलच्या अकाऊंटमधला पैसा ट्रेस केला. आयल ऑफ मॅन इथल्या एका बँकेत त्यांना बॉसवेलच्या नावाने 7 लाख 57 हजार पाऊंड डिपॉझिट झालेले आढळले. हे पैसे दोन सुटकेसमध्ये भरून बॉसवेलने बँकेत नेले होते.

आता निवृत्त झालेले इव्हान्स ऑपरेशन सील बे चे प्रमुख होते
फोटो कॅप्शन, आता निवृत्त झालेले इव्हान्स ऑपरेशन सील बे चे प्रमुख होते

पोलिसांनी बँक मॅनेजरचीही चौकशी केली. त्याने घाबरत घाबरत मान्य केलं की इकडे लोक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून लाखो रुपये आणतात त्यामुळे आम्हाला या व्यवहाराबद्दल संशय आला नाही.

पोलिसांनी लाखे पाऊंड्स किंमत असणाऱ्या फेरारी, रेंज रोव्हर आणि रोल्स रॉईल्स अशा आलिशान गाड्याही जप्त केल्या.

बर्ग-आरबँकला आठ वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली. बॉसवेलला 10 वर्षांची कैद झाली. त्यांच्या गँगमधल्या इतर सदस्यांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं.

न्यायालयाने न्यूपोर्ट पोलिसांचं आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांचं कौतुक केलं की त्यांच्या चौकसपणामुळे एक मोठी गँग पकडली गेली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.