वीरप्पनच्या साथीदारांनी झाडलेली गोळी डोक्यात घेऊन जगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट

 लॉयला इग्नेशियस

फोटो स्रोत, HANDOUT

फोटो कॅप्शन, लॉयला इग्नेशियस
    • Author, एम. सुबा गोमती
    • Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी

भारताच्या इतिहासात 'मोस्ट वॉन्टेड' असणाऱ्यांची यादी वीरप्पनचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. वीरप्पनला पकडण्यासाठी सुरक्षा दलाचा प्रचंड मोठा ताफा एकेकाळी तैनात करण्यात आलेला होता.

या शोधमोहिमेचा एक भाग म्हणून वीरप्पनला पकडण्यासाठी तामिळनाडू ॲक्शन फोर्समध्ये सामील झालेल्या तरुणांची एक तुकडी 17 फेब्रुवारी 1996 रोजी तामिळनाडू-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या ओसूरजवळ गस्तीवर होती.

त्या दिवशी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ओसूरजवळ असलेल्या अरबियालम जंगल परिसरात वीरप्पनचे साथीदार लपून बसल्याची माहिती या टास्क फोर्सला मिळाली. ही बातमी कळताच या तुकडीतले 10 जवान त्या ठिकाणी पोहोचले.

टास्क फोर्सच्या या तुकडीला पाहून बिथरलेल्या वीरप्पनच्या साथीदारांनी गोळीबार सुरु केला. या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर इतरांना गंभीर जखमी झाल्यामुळे दवाखान्यात दाखल करावे लागले.

टास्क फोर्सच्या या ऑपरेशनचा भाग असणारे निवृत्त पोलीस अधिकारी लॉयला इग्नेशियस त्या चकमकीबद्दल सांगताना म्हणतात की, "तिथे तीन-चार प्रकारच्या बंदुका घेऊन जवळपास 15 लोक उभे होते. गोळीबार झाला तेव्हा एक गोळी माझ्या डोक्याच्या मागच्या भागात घुसली आणि मला वाटलं होतं मी मरेन. मी तिथेच बेशुद्ध पडलो.

मी तीन दिवसांनंतर शुद्धीवर आलो तेंव्हा म्हैसूरच्या बसप्पा हॉस्पिटलमध्ये होतो."

बंदुकीच्या गोळीने डोक्याला झालेली जखम

लॉयला इग्नेशियस वयाच्या 32 व्या वर्षी या स्पेशल टास्क फोर्समध्ये सामील झाले. त्याकाळी नुकतंच लग्न झालेले पोलीस दलातील जवान या स्पेशल टास्क फोर्समध्ये जायला तयार व्हायचे नाहीत.

लॉयला यांनी या फोर्समध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या लग्नाला अवघी काहीच वर्षे झालेली होती.

फेब्रुवारी 1997 मध्ये वीरप्पनच्या साथीदारांसोबत झालेल्या चकमकीत लागलेली ती गोळी आजही लॉयला यांच्या डोक्यात आहे.

लॉयला म्हणतात की, "ती गोळी माझ्या कवटीच्या आरपार गेली होती आणि मेंदूजवळ जाऊन पोहोचली होती. त्यामुळे सुरुवातीला मला प्रचंड वेदना होत होत्या. माझं शरीर वैद्यकीय तपासण्यांना प्रतिसादच देत नव्हतं. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की डोक्यातून ती गोळी काढणं जोखमीचं ठरेल."

त्यावेळच्या आठवणी सांगताना लॉयला म्हणतात की, "मी खूप नशीबवान ठरलो. गोळी डोक्यात घुसूनसुद्धा माझ्या मेंदूला कसलीही इजा झाली नव्हती हे पाहून डॉक्टरांनादेखील आश्चर्य वाटलं होतं."

अशा घटनांमधून जिवंत राहणं ही घटना अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचं डॉक्टरांनी लॉयला यांना त्यावेळी सांगितलं होतं.

 लॉयला इग्नेशियस

फोटो स्रोत, HANDOUT

फोटो कॅप्शन, लॉयला इग्नेशियस

त्यावेळी तीन महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या लॉयला यांच्या पत्नीने वर्तमानपत्रात 'वीरप्पनच्या साथीदारांनी पोलीस दलातील जवानाला चकमकीत ठार मारल्याची' बातमी वाचली.

ही बातमी वाचून घाबरलेल्या त्यांच्या गर्भवती पत्नीने दीड वर्षांच्या त्यांच्या बाळाला काखेत घेऊन थेट सत्यमंगलम गाठल्याचं लॉयला सांगतात.

ते म्हणतात की, "मला शोधण्यासाठी हेलनने सत्यमंगलम गाठलं. मी तिथे नव्हतो त्यामुळे नंतर तिला म्हैसूर आणि चेन्नईला जावे लागले आणि अखेर तीन दिवसांनी ती मला पाहू शकत होती. या हल्ल्याचा माझ्यापेक्षा जास्त परिणाम हेलनवर झाला होता."

पुन्हा स्पेशल टास्क फोर्समध्ये येता आलं नाही

1989 च्या सुमारास वीरप्पनचा शोध पोलिसांनी सुरु केला होता आणि 1993 मध्ये वॉल्टर देवराम यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू सरकारने या विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती.

1993 मध्ये लॉयला इग्नेशियस या विशेष पथकात सामील झाले आणि 1996 मध्ये झालेल्या या चकमकीपर्यंत ते तिथेच कार्यरत होते.

लॉयला म्हणतात की, “त्या दिवशी झालेल्या कारवाईमध्ये ग्रेड 1 कॉन्स्टेबल सेल्वराज यांचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक तमिळ सेल्वन, मोहन नवाज, रघुपती, एलंगोवन यांच्यासह इतर काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते."

"ज्या ठिकाणी ही घटना घडली होती ते ठिकाण म्हणजे एक छोटंसं गाव होतं. त्या गावातून फोनवर संपर्क साधणं कठीण होतं. त्यानंतर मधेश्वरन हिल येथील कर्नाटक मुख्यालयाशी संपर्क साधण्यासाठी बचाव पथकाला तीन तास लागले."

पोलीस फोर्स

फोटो स्रोत, HANDOUT

फोटो कॅप्शन, पोलीस फोर्स

"ज्या दिवशी ही चकमक घडली त्यादिवशी एक गोळी माझ्या डोक्याच्या मागच्या भागातून कवटीत घुसली आणि मेंदूजवळ लागली. मला शुद्धीवर यायला तीन दिवस लागले. माझ्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मी विनंती करूनही मला स्पेशल टास्क फोर्समध्ये पुन्हा घेतलं नाही. त्यानंतर मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कामावर रुजू झालो."

'मी पुन्हा एकदा सामान्य आयुष्याची सुरुवात केली होती '

नंतर 2000 मध्ये पोलिस निरीक्षक, 2010 मध्ये पोलिस उपअधीक्षक आणि 2014 मध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून बढती मिळाली.

लॉयला याबाबत सांगतात की, "त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या जयललिता यांनी 1996 च्या चकमकीत कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा निर्णय घेतला होता. पण सरकार बदललं आणि ही पदोन्नती दिली गेली नाही. 2001 मध्ये पुन्हा माजी मुख्यमंत्री असणाऱ्या जयललिता सत्तेवर आल्या आणि त्याकाळी स्पेशल टास्क फोर्सच्या कारवाया जोरात सुरू होत्या."

 वीरप्पनच्या शोधकार्यात सामील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या

फोटो स्रोत, HANDOUT

फोटो कॅप्शन, वीरप्पनच्या शोधकार्यात सामील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"यासोबतच वीरप्पनच्या शोधकार्यात सामील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या. 2004 मध्ये झालेल्या वीरप्पनच्या हत्येनंतरही या मोहिमेत सहभागी असणाऱ्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना घरे आणि बढती देण्यात आली, त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला. वीरप्पनला पकडले तेंव्हा मी स्पेशल टास्क फोर्सचा भाग नव्हतो तरीही मला या योजनांचा लाभ देण्यात आला."

टास्क फोर्सनंतरचा पोलीस दलातील कामाचा अनुभव सांगताना लॉयला म्हणतात की 1997 पर्यंत त्यांना अधूनमधून डोकेदुखी होत होती. त्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्वपदावर आलं.

"त्यानंतर मला कसल्याही वेदना जाणवल्या नाहीत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी दहा वर्षं औषधं घेत होतो. त्यानंतर मी स्वतःच ही औषधं घेणं बंद केलं. मी स्पेशल टास्क फोर्समध्ये काम करायचो त्यावेळी माझं वय 32 होतं. माझ्यावर झालेल्या हल्ल्यातून मी बाहेर आलो आणि त्यानंतर 26 वर्षं तिरुनेलवेली, रामनाथपुरम, शिवगंगाई, थुथुकुडी, चेन्नई, कृष्णगिरी अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये कामं केली. निवृत्तीनंतर मी तिरुनेलवेली येथे माझ्या कुटुंबासह समाधानी आयुष्य जगत आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)